जंबीर फुलपाखरू : लेपिडॉप्टेरा गणाच्या पॅपिलिओनिडी कुलातील ही सुंदर, चमकदार रंगाची फुलपाखरे होत. त्याचा रंग दीप्त काळा किंवा अगदी गर्द निळा हिरवा असून त्यावर पिवळ्या, नारंगी, लाल, हिरव्या किंवा निळ्या खुणा असतात. मागच्या पंखाच्या मागील कडेवर विटकरी रंगाचा ठिपका असतो आणि पंखाचा मागील भाग शेपटीसारखा लांबट असतो. त्यांचा प्रसार मुख्यतः उष्ण कटिबंधीय अरण्यांत असून ती उपोष्ण कटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधात आढळतात. पॅपिलिओ आणि ट्रॉयडिस हे यांचे दोन महत्त्वाचे वंश होत. त्यांच्या सु. ८५० जातींची नोंद झाली आहे. पॅपिलिओ डिमोलियस ही भारतातील प्रमुख उपद्रवी जाती होय.
मादी कोवळ्या पानांवर लहान, गोलाकार, फिकट पिवळी, एकएक सुटी अशी अंडी घालते. ती ३–७ दिवसांत उबून अळ्या बाहेर पडतात. सुरुवातीला त्यांचा रंग गर्द पिवळा असून त्यांवर वेडेवाकडे पांढरे ठिपके असतात. दोन आठवड्यांत पूर्ण वाढ होऊन त्यांचा रंग गर्द हिरवा होतो. त्या ३५ मिमी. लांब दंडगोलाकार असून त्यांचा पुढील भाग वशिंडासारखा असतो. त्या झाडांवर कोषावस्थेत जातात. कोषावस्था हिवाळ्यात सु. दोन-तीन महिन्यांची असते, मात्र उन्हाळ्यात हा काळ कमी असतो.
यांच्या अळ्या सिट्रस वंशातील वनस्पतींची कोवळी पाने खातात. कधीकधी रोपांची सर्व पाने खाल्लेली आढळतात. विशेषतः पावसाळ्यात त्यांचा उपद्रव जास्त होतो. संत्रे, मोसंबी, लिंबू या पिकांशिवाय बेल, कढीलिंब याही झाडांना त्यांचा उपद्रव पोहोचतो. अळ्यांच्या नियंत्रणासाठी १०% बीएचसी किंवा कार्बारिल भुकटी मारतात.
पोखरकर, रा. ना.
“