छिन्नमानस : (शिझोफ्रेनिया). ही एक कार्यिक चित्तविकृती असून ती इतर चित्तविकृतींच्या मानाने अधिक प्रमाणात आढळून येते [⟶ चित्तविकृती]. लहान वयात होणारी छिन्नमानस वा मनोऱ्हास विकृती (डिमेन्शिया प्रीकॉक्स) हे तिचे पूर्वीचे वर्णन तितकेसे बरोबर नाही. कारण तिची पूर्वचिन्हे जरी लहानपणी दिसून येत असली, तरी प्रत्यक्ष विकृती मात्र प्रौढ वयात — सामान्यतः पंचविशीच्या सुमारास— दृग्गोचर होत असते. छिन्नमानस ही रूढ होऊन बसलेली संज्ञाही तितकीशी अन्वर्थक नाही. कारण या विकृतीत व्यक्तीचा ‘स्व’ दुभंगलेला नसतो, तसेच तिच्या ठिकाणी वियोजनमूलक निराळे व्यक्तिमत्त्वही निर्माण झालेले नसते.
या विकृतीची चाहूल दोन ते तेरा वर्षे या वयात तसेच पौगंडावस्थेत लागू शकते. एखाद्याचा सहवास नकोसा वाटणे, एखाद्या विशिष्ट विचारानेच पछाडल्यागत होणे, वैफल्य सहन करण्याच्या क्षमतेचा अभाव, शिक्षा व टीका यांविषयी बेपर्वाई, अनिश्चयात्मक वृत्ती, कामुक प्रेरणेची निर्लज्ज अभिव्यक्ती, शब्दांचे विपरीत अर्थ करण्याची प्रवृत्ती, कुणी तरी अदृश्य बाह्य शक्ती स्वतःवर हुकमत गाजवत आहे अशा तक्रारी इ. या विकृतीची पूर्वलक्षणे असल्याचे दिसून आले आहे.
‘छिन्नमानस ’ हे काही विकृतींच्या समूहास अनुलक्षून दिलेले नाव आहे. व्यक्तिमत्त्वाचे विघटन वा ऱ्हास करणाऱ्या चित्तविकृतींच्या एका गटास हे नाव देण्यात आलेले आहे.
प्रकार : छिन्नमानसाचे (१) साधा, (२) बधिर,(३) गलितगात्र व (४) संभ्रमयुक्त असे प्रमुख चार प्रकार पडतात. बालवयीन, तीव्र, चिरकारी, भावातिशयप्रधान (अफेक्टिव्ह) व अवशिष्ट असेही आणखी काही प्रकार त्यांच्या बालवयीन बाधेनुसार, तीव्रतेनुसार, दीर्घकालीनतेनुसार केले जातात. या प्रत्येक प्रकाराचा विशिष्ट लक्षणसमुच्चय असतो. त्याची कारणेही भिन्न भिन्न असतात व साध्यासाध्यतेच्या दृष्टीनेही या प्रकारांमध्ये फरक असतो. उदा., पहिल्या तीन प्रकारांत व्यक्तीचे वय २५ ते ३० वर्षे, शरीर अशक्त व हृदय आकाराने लहान असते, चौथ्या प्रकारात मात्र तसे नसते. तसेच पहिल्या व चौथ्या प्रकारांत आनुवंशिकतेचा भाग कमी असतो, पण दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये तो अधिक असतो. दुसरा प्रकार उपचारास कमी दाद देतो, तर तिसरा चांगली दाद देतो.
एफ्. जे. कालमान याने ही विकृती असलेल्या जुळ्यांचा तसेच ही विकृती असलेल्या मातापित्यांचा व त्यांच्या मुलांचा अभ्यास करून या विकृतीशी वंशदायाचा संबंध प्रस्थापित केला आहे. क्रेच्मर व शेल्डन यांनी कृषकाय वा सडपातळ शरीरयष्टीचा छिन्नमानसाशी असलेला संबंध सुचवला आहे परंतु तो साक्षात नसून दूरान्वयाने असावा, असे तज्ञ मानतात. अधिवृक्क ग्रंथीस्त्रावाची कमतरता या विकृतीस कारणीभूत असते, की ती या विकृतीचा परिणाम असते, याविषयी तज्ञांत मतभेद आहेत. मेंदूत निर्माण होणारी काही रासायनिक द्रव्ये तिला कारणीभूत असावीत, या कल्पनेस पुष्टी देणारा काही अप्रत्यक्ष पुरावा व काही प्रायेगिक पुरावा उपलब्ध झाला आहे. ही विकृती जडलेल्या व्यक्तींच्या पूर्वेतिहासावरून स्वभावपिंड, अयोग्य संगोपन, सदोष शिस्त, प्रेरणांच्या संबंधांतील विविध संघर्ष इ. मानसिक सामाजिक घटकांचे कारणपर महत्त्वही स्पष्ट झाले आहे.
उपचार : छिन्नमानस विकृतीची पूर्वलक्षणे लहानपणी किंवा वयात येण्याच्या सुमारास दिसून आल्याबरोबर प्रतिबंधक उपचार करणे इष्ट असते. विकृतीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, तरुण व्यक्तींच्या बाबतीत, इन्शुलिनने गुंगी आणणे काही अंशी उपयुक्त ठरते. मेट्रॅझॉलद्वारा तसेच विद्युत् प्रवाहाद्वारा आणलेल्या आकडीचा यात फारसा उपयेग होत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. खोलवर रुजलेली व इतर उपचारांना दाद न देणारी छिन्नमानस विकृती असेल, तर मेंदूच्या अग्रखंडावर शस्त्रक्रिया करून पाहण्यात येते. तथापि व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर भलताच व अनिष्ट परिणाम होऊन बसण्यावर धोकाही या शस्त्रक्रियेत असतो, हे विसरून चालत नाही. या विकृतीच्या प्राथमिक अवस्थेत मनोविश्लेषणात्मक मानसोपचारपद्धतीचा उपयोग होण्यासारखा असतो परंतु ही विकृती बळावल्यानंतर मात्र तो होईल की नाही, याविषयी अनेक तज्ञ साशंक आहेत. एक सहायक उपचारतंत्र म्हणून, व्यक्तीस इतर व्यक्तींच्या समवेत कार्यव्याप्त ठेवणे मात्र उपयुक्त ठरते.
पहा : अपसामान्य मानसशास्त्र मानसोपचार.
संदर्भ : 1. Arieti, S. Interpretation of Schizophrenia, New York, 1955.
2. Broen, W. E.Jr.Schizophrenia: Research and Theory, NewYork, 1968.
3. Hoskins, R. G.The Biology of Schizophrenia, New York, Norton, 1946.
4. Jackson, D. D. Ed. The Etiology of Schizophrenia, New York, 1960.
अकोलकर, व. वि.
“