छाटणी, झाडांची :फुलझाडे आणि फळझाडे यांना योग्य वळण आणि आकार देण्याकरिता, तसेच झाडाचे मुख्य खोड आणि त्यावरील फांद्या यांची ठेवण मजबूत राखण्यासाठी झाडावर योग्य तितक्याच जोमदार फांद्या ठेवून बाकीच्या रोगट, अशक्त, एकमेकींत गुंतलेल्या, निरुपयोगी फांद्या कापून टाकण्याच्या क्रियेला छाटणी म्हणतात. छाटणीमुळे झाडाचा विस्तार योग्य प्रमाणात विरळ होऊन हवा आणि सूर्यप्रकाश यांचा फायदा विस्ताराला मिळतो. त्यामुळे न छाटता राखलेल्या फांद्या जोमदारपणे वाढतात आणि त्यांना लागलेली फळे पक्व होईपर्यंत नीटपणे पोसली जातात. काही फुलझाडांच्या व फळझाडांच्या बाबतीत चांगली दर्जेदार व मुबलक फुले-फळे मिळावी म्हणून योग्य काळी नियमितपणे छाटणी करावी लागते. काही वेळा झाडावर खूप बहार येऊन वाजवीपेक्षा जास्त फलधारणा होते व त्यामुळे झाडाच्या अंतर्गत अन्नव्यवस्थेवर ताण पडून त्याची शक्ती क्षीण होऊन नुकसान होण्याचा संभव उद्‌भवतो. अशा प्रसंगी फलधारणा मर्यादित करण्याकरिता छाटणी करणे आवश्यक ठरते. फांद्याप्रमाणेच पाने, फुले आणि जमिनीतील मुळ्या (जारवा) यांचीही छाटणी करतात.

फांद्यांची छाटणी :कोवळ्या झाडांना वळण देण्याकरिता व माथा संतुलित राखण्यासाठी फांद्यांची छाटणी करतात. छाटणी योग्य प्रकारे झाली नाही किंवा जरूरीपेक्षा जास्त प्रमाणात झाली, तर पालेवाढ जोरदार होऊन फलधारणेला विलंब होतो व फुले-फळे कमी येतात.

कलमे व रोपे यांचे स्थलांतर करताना त्यांची काही मुळे तुटणे अपरिहार्य असते. ती कायम जागी लावण्यापूर्वी मधल्या काळात त्यांच्या पानांमधून बाष्पीभवनाने पाणी निघून जाते व त्याची भरपाई मुळांकडून होऊ शकत नाही. यामुळे बाष्पीभवनाची क्रिया कमी करण्यासाठी पाने विशिष्ट प्रमाणात छाटतात. 

मुळ्यांची छाटणी :एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत यूरोपात व विशेषतः इंग्लंडमध्ये फळझाडांच्या मुळ्यांना नियमितपणे छाटणी देण्याचा प्रघात होता. फळझाडांच्या मुळ्या छाटल्यास झाडावर मुबलक फळे येतात, अशी त्याकाळी फळबागायतदारांची समजूत असे. भारतातसुद्धा संत्रा, मोसंबी, पेरू व अंजीर या फळझाडांना ताण देतेवेळी त्यांचा जारवा तोडण्याची प्रथा अजून काही ठिकाणी आहे. भारी जमिनीत नुसता ताण दिल्याने झाडांना बहार येत नाही अशा विचाराने झाडांचा जारवा तोडतात. पण संशोधनान्ती असे आढळून आले आहे की, जारवा तोडल्यामुळे जमिनीतून अन्नपाणी शोषणाऱ्या मूलरोमांची (मुळांवरील बारीक केसासारख्या तंतूंची) संख्या घटते व त्यामुळे झाडाच्या वाढीवर आणि फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. सतत अनेक वर्षे जारवा तोडल्यास झाडाचे आयुष्य कमी होते. म्हणून फळबागशास्त्रज्ञांनी ही प्रथा बंद करण्याची शिफारस केली आहे.  

छाटणीच्या पद्धती :फळझाडांना लहानपणी वळण देण्याकरिता करावयाच्या छाटणीच्या मुख्यतः तीन पद्धती आहेत : (१) झाडाचा शेंडा विशिष्ट उंचीपर्यंत वाढू देऊन नंतर तो छाटतात. त्यामुळे झाडाची उंची मर्यादित राहून झाडाचा माथा भरगच्च राहतो. (२) झाडाचा शेंडा न छाटता तसाच वाढू देतात व फक्त बाजूच्या फांद्या छाटतात. त्यामुळे झाडाची उंची अमर्यादित राहून विस्तार वाढ भरीव होत नाही. (३) वरील दोन्ही पद्धतींचा समन्वय करूनही छाटणी देतात, म्हणजे झाडाची वाढ काही काळ अमर्यादित ठेवून त्याचा शेंडा छाटतात. या पद्धतीमुळे दोन्ही पद्धतींच्या छाटणीचा फायदा मिळतो. 

छाटणी करण्याचे मुख्यतः दोन प्रकार आढळतात : (अ) झाडांच्या फांद्यांचा वरचा भाग छाटणे, (आ) फांद्यांची त्यांच्या बुंध्यापासून छाटणी करणे. पहिल्या प्रकारच्या छाटणीमुळे फांदीच्या झाडावर उरलेल्या भागावरील सुप्तावस्थेतील डोळ्यांमधून जोमदार नवीन फूट निघते व तिच्यावर फुले-फळे येतात.  

सर्वच झाडांना नियमितपणे छाटणी देणे आवश्यक असते असे नाही. फळझाडांना द्यावयाची छाटणी ही त्यांची वाढ, कोणत्या वाढीवर फळधारणा होते इ. गोष्टींवर अवलंबून असते. त्यांचा अभ्यास करून नियमित आणि योग्य प्रमाणात फळे यावीत म्हणून छाटणीची वेळ आणि प्रकार ठरवितात. आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी यांसारख्या झाडांवर पाने नेहमी असणे आवश्यक असल्यामुळे वाळलेल्या, रोगट व एकमेकींत गुंतलेल्या फांद्या छाटणे यापेक्षा जास्त छाटणीची आवश्यकता नसते. प्रमाणाबाहेर छाटणी केल्यास फळे येणाऱ्या शाखाच कापल्या जाऊन विपरीत परिणाम होतो. उदा., संत्र्याच्या झाडाला जुन्या वाढीवर नवीन फूट आणि फुले येतात. प्रमाणाबाहेर छाटणी होऊन ही जुनी वाढ तोडली गेल्यास अनिष्ट परिणाम होतो. फुलांचा बहार चांगला येत नाही. पानगळ होणाऱ्या झाडांच्या बाबतीत करावयाची छाटणी सदापर्णी झाडांपेक्षा जास्त व नियमितपणे करावी लागते. अंजीर, बोर, द्राक्ष या फळझाडांची नियमितपणे छाटणी करावी लागते. शोभेची झाडे, झुडपे व कुंपणे यांच्या झाडांचा जोम कायम राहण्याकरिता व त्यांचा आकार सुव्यवस्थित ठेवण्यासाठी वेळोवेळी छाटणी करणे जरूर असते. गुलाबाच्या झुडपाला त्याच्या जातीप्रमाणे व प्रकारानुसार चांगली फुले येण्यासाठी दरसाल कमीजास्त प्रमाणात छाटणी द्यावी लागते.  

 

छाटणीचा हंगाम वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांकरिता वेगवेगळा असतो. परंतु सामान्यपणे फळझाडांना त्यांच्या सुप्तावस्थेत व नवीन फूट येण्यापूर्वी छाटणी देतात. पानगळ होणाऱ्या झाडांच्या बाबतीत त्यांच्या पानगळीचा काळ हा सुप्तावस्थेचा काळ समजतात. 

छाटणीचा परिणाम :छाटणीमुळे पाने, फांद्या यांची संख्या घटल्याकारणाने झाडाच्या एकूण वाढीवर परिणाम होतो. पानांची संख्या घटल्याकारणाने झाडाची अन्न तयार करण्याची क्षमता त्या प्रमाणात कमी होते. त्याचप्रमाणे पानावाटे जी बाष्पीभवनाची क्रिया चालते, ती काही प्रमाणात कमी होऊन झाडामधील पाण्याचा अंश वाढतो. त्यामुळे झाडातील कोशिकांचे (पेशींचे) विभाजन व त्यांच्या संख्येत होणारी वाढ याचे प्रमाणही वाढते व त्याचा परिणाम म्हणून साहजिकच नवीन वाढ जोरात सुरू होते. तसेच झाडाच्या काही फांद्या छाटल्याकारणाने उरलेल्या फांद्यांना व अवयवांना झाडाच्या मुळ्यांनी जमिनीतून शोषून घेतलेल्या अन्न पुरवठ्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे देखील कोशिकांचे विभाजन आणि त्यांच्या वर्धनाची क्रिया वाढीस लागते. छाटणीमुळे झाडाची वाढ जास्त होऊन तिचा जननशक्तीवर परिणाम होत असल्याने छाटणी करताना फार काळजी घ्यावी लागते.

        

पाटील, अ. व्यं.