छंदोरचना : छंदोरचना म्हणजे पद्यरचना. छंदोरचनेच्या मुळाशी भाषेतील ध्वनींची विशिष्ट रचना त्याचप्रमाणे विशिष्ट लयबद्धताही असते. या लेखात वैदिक, संस्कृत, प्राकृत-अपभ्रंश, मराठी व इंग्रजी छंदोरचनांचे विवेचन केले आहे.
वैदिक छंदोरचना :वेदांमध्ये जे मंत्र आहेत, त्यांपैकी बरेचसे छंदोबद्ध आहेत. यजुर्वेदात यजुस् म्हणजे गद्य मंत्र आहेत, तसे छंदोबद्ध मंत्रही आहेत. छंदांचा संबंध वेदपठणाशी जसा आहे, तसा वेदमंत्रांनी करावयाच्या यज्ञकर्माशीही आहे. छंद हे वेदाचे पाय होत, असे पाणिनीय शिक्षेत म्हटले आहे. छंद हे वाणीचे रूप आहे. ब्राह्मणकारांनी छंदांना इंद्रिय आणि वीर्य म्हटले आहे. ऋषी, छंद, देवता आणि ब्राह्मण यांच्या ज्ञानाखेरीज जो यज्ञ करतो, करवितो किंवा वेद शिकवितो, त्याचे वेद ‘यातयाम’ म्हणजेशिळे होतात, असे सामवेदाच्या छांदोग्यब्राह्मणात म्हटले आहे. ‘छन्दस्’ शब्दाची व्युत्पत्ती ब्राह्मणग्रंथांत दिली आहे. ‘छन्दस्’ हा शब्द ‘छद्’ या धातूपासून बनला आहे. बऱ्याच ब्राह्मणग्रंथांत आच्छादन करणे या अर्थी ‘छद्’ या धातूपासून व्युत्पत्ती दिली असून, तिला अनुसरुन आख्यायिकाही सांगितल्या आहेत. माध्यंदिन शतपथ ब्राह्मणात (८·५·२·१) मात्र ‘संतुष्ट होणे, संतुष्ट करणे’ या अर्थी छद् धातूपासून व्युत्पत्ती सांगितली आहे. ऋषींनी छंदोबद्ध मंत्रांच्या उपयोगाने देवतांना संतुष्ट केले म्हणून ‘छन्दस्’ हा शब्द रूढ झाला. काही कोशकारांच्या मते छंद म्हणजे आल्हादकारक. आल्हादित होणे या अर्थाच्या ‘ चद् ‘ धातूपासून ‘छन्दस्’ शब्द ते व्युत्पादितात. ‘च’ चा ‘छ’ होतो.संस्कृत भाषेत छंद हा शब्द नपुसकलिंगी आहे पण छंदांची नावे स्त्रीलिंगी आहेत.
शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ‘छन्दस्’ किंवा छंद आणि ज्योतिष अशी सहा वेदांगे आहेत. त्यांमध्ये छंद हे एक वेदांग आहे. छंद या वेदांगाला ‘छंदोविचिति’ अशीही संज्ञा आहे. पिंगलनागाने रचलेले छंदःसूत्र हे छंदोविषयक वेदांग समजण्यात येते परंतु ते फारसे प्राचीन नसावे. कारण त्यात वैदिक छंदांबरोबर संस्कृतातील लौकिक वृत्तांचाही परामर्श घेण्यात आला आहे. छंदःसूत्रापूर्वीच्या बऱ्याच ग्रंथात वैदिक छंदांचा प्रपंच केलेला आढळतो. शौनकाच्या ऋक्प्रातिशाख्यात सोळा ते अठरा या तीन पटलांत छंदांचा विचार केलेला आहे. कात्यायनाच्या सर्वानुक्रमणीत आरंभीच्या बारा खंडात ऋग्वेदातील छंदांची लक्षणे सांगितली आहेत. सोमयागात होतृप्रभृती ऋत्विजांनी म्हणावयाच्या शस्त्रांच्या निमित्ताने शांखायन श्रौतसूत्रात (७·२७) छंदांची चर्चा केलेली आहे. सामवेदातील गाने ही ऋङ्मंत्रांवर आधारलेली असल्याने सामवेदाच्या निदानसूत्राच्या पहिल्या प्रपाठकाच्या सात खंडांत छंदांचा विषय मांडला आहे. ब्राह्मणग्रंथात यज्ञीय विनियोगाच्या अनुषंगाने निरनिराळ्याछंदांचे वारंवार निर्देश आले आहेत.
‘छन्दस्’ किंवा छंद हा शब्द वृत्त किंवा पद्य या अर्थीही कोशकार देतात. वेद असाही अर्थ ‘छन्दस्’ शब्दाचा होतो. संस्कृतातील वृत्ते ही गेय म्हणजे चालीवर म्हणावयाची असतात. वैदिक छंद हे त्या अर्थाने गेय नाहीत. मंत्रांना उदात्तादी स्वर असतात आणि त्यांना गानाचे मूल्य असते, एवढ्या मर्यादित अर्थाने मंत्रांमध्ये गानाचा अंश असतो. पण तो छंदांचा म्हणून नव्हे, हे खरे असले तरी लय हा जो गानाचा अंश आहे, तो छंदांमध्ये अवश्य असतो. तरीही तो छंदांच्या लक्षणात अंतर्भूत होत नाही. कात्यायनाच्या सर्वानुक्रमणीत (२·६) ‘यदक्षरपरिमाणं तच्छन्द:’ असे छंदांचे लक्षण सांगितले आहे. छंद म्हणजे अक्षरांचे परिमाण होय. वेदांचे जे छंद आढळतात, त्यांचे नियमबद्ध रूप सांगायचे काम उपर्युक्त ग्रंथांत केलेले आहे. ऋषींनी छंदांची कल्पना करून त्यांच्या माध्यमाने मंत्ररचना केली. छंदांचा विकास क्रमाने झालेला असणे अगदी स्वाभाविक आहे. हा विकासक्रम शोधण्याचे प्रयत्न झालेले आहेत. उदा., ई.व्ही. आर्नल्डकृत वेदिक मीटर, दिल्ली, १९६७. वेदांमध्ये ऋग्वेदातील मंत्र हे सर्वांत प्राचीन होत. त्या मंत्रांची रचना एकाच काळी झाली नसल्यामुळे छंदांची निरनिराळी रूपे त्यांत आढळणे स्वाभाविक आहे. वर उद्धृत केलेल्या सर्वानुक्रमणीच्या सूत्रात म्हटल्याप्रमाणे छंदांची मूलभूत कल्पना म्हणजे केवळ अक्षरांची विशिष्ट संख्या होय. कोणते अक्षर ऱ्हस्व असावे व कोणते दीर्घ असावे, यासंबंधी एकरुप निरपवाद नियम त्यात आढळत नाही. मंत्रातील प्रत्येक पाद रचनेच्या दृष्टीने इतर पादांपासून स्वतंत्र असतो. पादाचे पहिले आणि शेवटचे अक्षर यांचा ऱ्हस्वदीर्घाच्या दृष्टीने परस्परांशी मेळ दिसत नाही. मूलतः छंदात ऱ्हस्वदीर्घाचा विचार केला जात नव्हता याचे हे गमक मानले पाहिजे. एका पादाचे दोन भाग केल्यास पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागाकडे लयीच्या दृष्टीने जास्त लक्ष दिलेले दिसून येते व पहिल्या भागात दीर्घ अक्षरे आणि दुसऱ्या भागात ऱ्हस्व अक्षरे योजण्याची प्रवृत्ती आढळून येते. वैदिक छंदांची जगातील अन्य प्राचीन छंदांशी तुलना केली असता वैदिक ऋषींची योग्यता इतर कवींच्या मानाने पुष्कळ मोठी होती, हे निर्विवाद सिद्ध होते.
प्रत्येक छंदाच्या पादातील अक्षरसंख्या शास्त्रकारांनी मंत्रांच्या अवलोकनाने स्थूलमानाने निश्चित केली आहे. एखाद्या पादात अक्षरे कमी पडत असल्यास गुण, वृद्धि, सवर्णदीर्घ, पूर्वरूप-पररूप यांतील संधी पृथक् करुन अक्षरसंख्या वाढवावी तसेच य्, व्, र्, ल् या क्षैप्र वर्णांतील संयोगाचाही विच्छेद करावा, असे त्यांनी सुचविले आहे. उदा., ‘त्र्यम्बकं यजामहे’ यापादात सात अक्षरे आहेत. त्यात ‘त्रियम्बकं यजामहे’ असे म्हणून आठ अक्षरे करावी. ‘तत्सवितुर्वरेण्यम्’ येथे ‘वरेणियम्’ असे म्हणावे. इतके करुनही किंवा हे करण्याला अवसर नसल्यामुळे पादातील अक्षरे कमीजास्त राहिली, तरी फारसे बिघडत नाही. ‘एक किंवा दोन अक्षरांच्या कमीजास्तपणामुळे छंद बिघडत नाही’, असेऐतरेय ब्राह्मणात (१·६) म्हटले आहे. याचाच अनुवाद प्रातिशाख्यादिकांनी केलेला आहे. पाद आणि त्यातील अक्षरे यांचा मेळ घालताना पदपाठ लक्षात घेतला पाहिजे. पदपाठातील पदांचा विच्छेद करुन पादातील अक्षरांची संख्या सांभाळण्याचे धोरण असू नये. छंदात एक अक्षर कमी असल्यास तो छंद निचृत् समजावा एक अधिक असल्यास भुरिज् समजावा दोन अक्षरे कमी असल्यास तो छंद विराट् समजावा दोन अधिक असल्यास स्वराज् समजावा. एकाच अक्षरसंख्येमुळे दोन छंद संभवत असल्यास त्या छंदाच्या नावाचा निर्णय पहिल्या पादातील अक्षरसंख्येवरुन करावा. वैदिक छंद हे प्राधान्याने अक्षरसंख्येवर अवलंबून आहेत, हेच या परिभाषेवरुन दिसून येते. गायत्री आणि जगती यांच्या पादात उपांत्य अक्षर ‘लघु‘ असते, विराट् आणि त्रिष्टुभ् यांच्या पादात उपांत्य अक्षर ‘ गुरू ‘ असते, असे ऋक्प्रातिशाख्यात (१७·२२) म्हटले आहे. पादात अक्षरे किती व छंदांची नावे कोणती, याचा निर्णय वरील वस्तुस्थितीवरुन करण्याला साहाय्य होईल. छंदात अवसान कोठे करावे, यासंबंधी भिन्न भिन्न संप्रदाय आहेत. सामान्यतः छंदात तीन किंवा चार पाद असतात परंतु काही छंद द्विपादही असतात. विराट् छंद एक, दोन, तीन किंवा चार पादांचाही असतो. पादांची संख्या अधिकही असते.
ऋग्वेदाच्या शाकलसंहितेत ज्या चौदा छंदांतील ऋचा आहेत, त्यांचा संग्रह कात्यायनाच्या सर्वानुक्रमणीत केला आहे. ते छंद असे : गायत्री, उष्णिह, अनुष्टुभ् , बृहती, पंक्ति, त्रिष्टुभ्, जगती, अतिजगती, शक्करी, अतिशक्करी, अष्टि, अत्यष्टि, धृति व अतिधृति. गायत्री छंदात प्रत्येकी आठ अक्षरांचे तीन पाद असतात. पुढील छंदांत क्रमाने चार चार अक्षरे अधिक असतात. एका अक्षरापासून सात अक्षरांपर्यंतच्या छंदांची कल्पनाही शास्त्रकारांनी केली आहे. ॐ हा एकाक्षरी दैवी गायत्री छंद आहे. गायत्री छंदाचे पुढीलप्रमाणे वेगवेगळे प्रकार नोंदलेले आहेत व पादांतील अक्षरांची संख्या क्रमशः दिली आहे :
प्रकाराचे नाव |
पादातील अक्षरसंख्या |
||||
पहिला |
दुसरा |
तिसरा |
चौथा |
पाचवा |
|
पादनिचृत् |
७ |
७ |
७ |
— |
— |
अतिपादनिचृत् |
६ |
८ |
७ |
— |
— |
नागी |
९ |
९ |
६ |
— |
— |
वाराही |
६ |
९ |
९ |
— |
— |
वर्धमाना |
६ |
७ |
८ |
— |
— |
वर्धमाना |
८ |
६ |
८ |
— |
— |
प्रतिष्ठा |
८ |
७ |
६ |
— |
— |
द्विपदा विराट् |
१२ |
८ |
— |
— |
— |
त्रिपदा विराट् |
११ |
११ |
११ |
— |
— |
पदपंक्ति |
५ |
५ |
५ |
५ |
६ |
पदपंक्ति |
५ |
५ |
५ |
४ |
६ |
उष्णिग्गर्भा |
६ |
७ |
११ |
— |
— |
अतिनिचृत् |
७ |
६ |
७ |
— |
— |
यवमध्या |
७ |
१० |
७ |
— |
— |
ह्रसीयसी |
६ |
६ |
७ |
— |
— |
द्विपदा |
१२ |
१२ |
— |
— |
— |
उष्णिह हा त्रिपाद छंद असून त्याच्या पादांत अनुक्रमे ८, ८ व १२ मिळून एकुण अठ्ठावीस अक्षरे असतात. उष्णिहचे पुढीलप्रमाणे भेद आहेत :
ककुभ् |
८ |
१२ |
८ |
— |
पुर |
१२ |
८ |
८ |
— |
चतुष्पाद् |
७ |
७ |
७ |
७ |
ककुभ्न्यङ्कुशिरा |
११ |
१२ |
४ |
— |
तनुशिरा |
११ |
११ |
६ |
— |
पिपीलिकमध्या |
११ |
६ |
११ |
— |
अनुष्टुब्गर्भा |
५ |
८ |
८ |
८ |
आठ अक्षरांचा एक पाद अशा चार पादांनी मिळून बत्तीस अक्षरांचा अनुष्टुभ् छंद होतो. अभिजात संस्कृतातील अनुष्टुभ् श्लोक ऱ्हस्वदीर्घांच्या विशिष्ट नियमांनी बांधलेला आहे. वैदिक छंद तितका नियमबद्ध नाही. याचे भेद पुढीलप्रमाणे होतात :
त्रिपाद् |
८ |
१२ |
१२ |
कृति |
१२ |
१२ |
८ |
पिपीलिकमध्या (मध्येज्योति) |
१२ |
८ |
१२ |
काविराट् |
९ |
१२ |
९ |
नष्टरूपा |
९ |
१० |
१३ |
विराट् |
१० |
१० |
१० |
विराट् |
११ |
११ |
११ |
बृहती छंदात एकूण छत्तीस अक्षरे आहेत. पहिल्या पादात बारा आणि पुढील तीन पादांत प्रत्येकी आठ अक्षरे असतात. बृहतीचे भेद पुढीलप्रमाणे:
पथ्या (स्कन्धोद्ग्रीवी) |
८ |
८ |
१२ |
८ |
न्यंकुसारिणी (किंवा उरोबृहती) |
८ |
१२ |
८ |
८ |
उपरिष्टाद् |
८ |
८ |
८ |
१२ |
पुरस्ताद् |
९ |
९ |
९ |
९ |
महाबृहती (किंवा सतोबृहती) (किंवा ऊर्ध्वबृहती) |
१० |
१० |
८ |
८ |
विष्टार |
८ |
१० |
१० |
८ |
पिपीलिकमध्या |
१३ |
८ |
१३ |
— |
विषमपदा |
९ |
८ |
११ |
८ |
पंक्ति हा छंद चाळीस अक्षरांचा असतो. पंक्ति शब्दाचा मूळ अर्थ पाच. यात साधारणपणे किंवा क्वचित चारही पाद असतात. आठ अक्षरांचा एक पाद असे पाच पाद हे पंक्तिछंदाचे मुख्य लक्षण आहे. या छंदाचे भेद पुढीलप्रमाणे :
प्रस्तार |
१२ |
१२ |
८ |
८ |
— |
सतोबृहती (सिद्धाविष्टार) |
१२ |
८ |
१२ |
८ |
— |
विपरीता सतोबृहती |
८ |
१२ |
८ |
१२ |
— |
आस्तार |
८ |
८ |
१२ |
१२ |
— |
विष्टार |
८ |
१२ |
१२ |
८ |
— |
संस्तार |
१२ |
८ |
८ |
१२ |
— |
अक्षर |
५ |
५ |
५ |
५ |
— |
अक्षर |
५ |
५ |
— |
— |
— |
पद |
५ |
५ |
५ |
५ |
५ |
पद |
४ |
६ |
५ |
५ |
५ |
विराट् |
१० |
१० |
१० |
१० |
— |
त्रिष्टुभ् छंदात चव्वेचाळीस अक्षरे असतात. सामान्यपणे याचे चार पाद असतात आणि मुख्यतः प्रत्येक पादात अकरा अक्षरे असतात. याचे पुढीलप्रमाणे प्रकार आहेत :
पुरस्ताज्ज्योति |
११ |
८ |
८ |
८ |
८ |
|
मध्येज्योति |
८ |
८ |
११ |
८ |
८ |
|
उपरिष्टाज्ज्योति |
८ |
८ |
८ |
८ |
११ |
|
अभिसारिणी |
१० |
१० |
१२ |
१२ |
— |
|
विराट्स्थाना |
९ |
९ |
१० |
११ |
— |
|
विराट्स्थाना |
१० |
१० |
९ |
८ |
— |
|
विराङ्रूपा |
११ |
११ |
११ |
८ |
— |
|
महाबृहती |
८ |
८ |
८ |
८ |
१२ |
|
यवमध्या |
८ |
८ |
१२ |
८ |
८ |
|
पंत्त्युत्तरा (किंवा विराट्पूर्वा) |
१० |
१० |
८ |
८ |
८ |
ज्या ऋचेत दोन पाद अकरा अक्षरांचे व दोन पाद बारा अक्षरांचेअसतील अशी ऋचा त्रैष्टुभ् सूक्तात असेल, तर ती त्रिष्टुभ् समजावी जागत सूक्तात असल्यास जगती समजावी. ज्योतिष्मती त्रिष्टुभ् छंदात तीन पाद बारा अक्षरांचे आणि एक आठ अक्षरांचा असतो. आठ अक्षरांचा पाद पहिला असल्यास ती पुरस्ताज्ज्योति, दुसरा किंवा तिसरा असल्यास मध्येज्योति आणि शेवटचा असल्यास उपरिष्टाज्ज्योति होय.
बारा अक्षरांचा एक पाद असे चार पाद मिळून अठ्ठेचाळीस अक्षरांचा जगती छंद होतो. याचे पुढील प्रकार आहेत :
महापंक्ति |
८ |
८ |
८ |
८ |
८ |
८ |
— |
— |
महापंक्ति |
८ |
८ |
७ |
६ |
१० |
९ |
— |
— |
ज्योतिष्मती |
१२ |
८ |
८ |
८ |
८ |
— |
— |
— |
महासतीबृहती (किंवा पंचपदाजगती) |
८ |
८ |
८ |
१२ |
१२ |
— |
— |
— |
विष्टारपंक्ति (किंवा प्रवृद्धपदा) |
८ |
८ |
८ |
१२ |
१२ |
८ |
८ |
८ |
या सात छंदांपैकी गायत्री, अनुष्टुभ्, त्रिष्टुभ् आणि जगती हे छंद अधिक महत्वाचे आहेत. या सात छंदांखेरीज आणखी सात छंदांच्या ऋचा ऋतुसंहितेत आहेत. ते छंद पुढीलप्रमाणे : अतिजगती, शक्करी, अतिशक्करी, अष्टि, अत्यष्टि, धृति आणि अतिधृति. जगतीनंतर क्रमाने चार चार अक्षरे मिळवीत गेले असता हे छंद बनतात. अतिजगतीत ५२ व अतिधृतीत ७६ अक्षरे आहेत. या सात छंदांची पादशः विभागणी अशी आहे :
अतिजगती |
१२ |
१२ |
१२ |
८ |
८ |
— |
— |
— |
शक्करी |
८ |
८ |
८ |
८ |
८ |
८ |
८ |
— |
अतिशक्करी |
१६ |
१६ |
१२ |
८ |
८ |
— |
— |
— |
अष्टि |
१६ |
१६ |
१६ |
८ |
८ |
— |
— |
— |
अत्यष्टि |
१२ |
१२ |
८ |
८ |
८ |
१२ |
८ |
— |
धृति |
१२ |
१२ |
८ |
८ |
८ |
१६ |
८ |
— |
अतिधृति |
१२ |
१२ |
८ |
८ |
८ |
१२ |
८ |
८ |
या एकूण चौदा छंदांखेरीज आणखी सात छंद आहेत. ते ऋग्वेदाच्या शाकलसंहितेत आढळत नाहीत. ऋग्वेदखिल ४·९·१—७ या (आसूरेतु इ.) सात मंत्रांचे ते अनुक्रमे छंद आहेत. त्यांची नावे आणि अक्षरसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
कृति –८०, प्रकृति — ८४, आकृति — ८८, विकृति — ९२, संस्कृति — ९६, अभिकृति — १०० आणि उत्कृति — १०४.
दोन ऋचांचा एक प्रगाथ होतो. असे काही प्रगाथ ऋक्संहितेत आहेत. बृहती आणि सतोबृहती यांचा बार्हत प्रगाथ होतो. ककुभ आणि सतोबृहती यांचा काकुभ् प्रगाथ होतो.
महाबृहती व महासतोबृहती यांचा महाबार्हत प्रगाथ होतो. बृहती आणि विपरीता सतोबृहती यांचा विपरीतोतर प्रगाथ होतो. सामवेदांमध्ये आणखीही काही प्रगाथ आढळतात. त्यांत अनुष्टुभ्, अनुष्टुभ् गायत्री आणि गायत्री या तीन ऋचांचा प्रगाथ अधिक महत्वाचा आहे.
सामवेदातील मंत्राना अनुसरून निदानसूत्रात छंदांचा अधिक विचार केलेला आहे. वर अतिजगतीपासून अतिधृतीपर्यंत जे सात छंद सांगितले, त्यांची नावे निदानसूत्रात (२) अनुक्रमे विधृति, शक्करी, अष्टि, अत्यष्टि, महना, सरित् आणि संपा अशी सांगितली आहेत. त्यानंतर कृतीपासून उत्कृतीअखेरच्या सात छंदांची नावे निदानसूत्रात अनुक्रमे सिंधु, सलिल, अभ्भास्, गगन, अर्णव, आपः आणि समुद्र अशी दिली आहेत. या एकूण चौदा छंदांना निदानसूत्रात कृतच्छंद म्हणजे द्यूतातील परिभाषेनुसार चार या संख्येपासून सुरू होणारे छंद अशी संज्ञा दिली आहे. गायत्रीछंद हा कमीत कमी म्हणजे चोवीस अक्षरांचा आहे. त्याच्या खाली ४, ८, १२, १६ व २० अशी अक्षरे असलेले अनुक्रमे कृति, प्रकृति, संस्कृति, अभिकृति आणि उत्कृति हे पाच छंदही त्या सूत्रात सांगितले आहेत. याशिवाय द्वापर म्हणजे दोन या संख्येपासून सुरू होणारे आणि चार चार अक्षरांनी वाढणारे छंदही निदानसूत्रात आढळतात. हर्षीका, शर्षीका, सर्षीका, सर्वमात्रा व विराट्कामा हे अनुक्रमे २, ६, १०, १४ आणि १८ अक्षरांचे अन्तस्थछंद होत. यांच्यापुढील बावीस अक्षरांपासून चार चार अक्षरांनी १०२ पर्यंत वाढणारे द्वापरछंद पुढीलप्रमाणे सांगितले आहेत. राट्, सम्राट, विराट्, स्वराट्, स्ववशिनी, परमेष्ठा, अन्तस्थाः, प्रत्न, अमृत, वृषा, जीव, तृप्त, रस, शुक्र, अर्ण, अंश, अंभस्, अंबु, वारि, आपः आणि उदक. ही सर्व नावे ऋक्प्रातिशाख्यातही नोंदलेली आहेत.
काशीकर, चिं. ग.
संस्कृत छंदोरचना: संस्कृत छंदोरचना म्हणजे पद्यरचना, वैदिक वाङ्मयापासून सुरू झालेली आहे. ती मूलतः अक्षर (संख्या) निष्ठ आहे. त्यातील अनुष्टुभ्, त्रिष्टुभ् इ. छंदांमधून अक्षरसंख्या तेवढी ठरलेली असे. त्या अक्षरांचे तत्तत्स्थानीय लघुगुरुत्व निश्चित नसे. हळूहळू ते निश्चित होत गेले आणि अभिजात संस्कृत काव्यात ते निश्चित झाले व अक्षरांची संख्या आणि त्यांचे लघुगुरुत्व निश्चित असणारी पद्यरचना होऊ लागली. संस्कृतमध्ये याप्रमाणे मुख्यतः दोन प्रकारची रचनाच झालेली आहे. अक्षरसंख्या-नियम नसलेली, तथापि मात्रासंख्या नियत असणारी रचना संस्कृतमध्ये फारच अल्प व अपवादभूत आहे. तिचे मूळ प्राकृत पद्यरचनेमध्ये आहे.
संस्कृतमधील पद्यरचनाही चतुष्पदीच आहे. चार चरण मिळून एकश्लोक होणे व अशी अनेक श्लोकांची मिळून सबंध कविता होणे, हाच नियम बहुधा संस्कृत पद्यरचनेमध्ये आढळतो. म्हणून त्यातील पद्याचे लक्षण चार-चार चरणांचे असे सांगण्यात येते. चारही चरण सारख्याच अक्षरसंख्येचे आणि लघुगुरुक्रमाचे असले, की ते सम पद्य होते. एखादे अक्षर कमी, पण नियतत्वाने पहिल्या आणि तिसऱ्या चरणात एकच रीत आणि दुसऱ्या व चौथ्या चरणांतही सारखी, परंतु एखाद्या अक्षराने वेगळी रचना असल्यास ते अर्धसम पद्य होते कारण चरण १ व २ हे दोन्ही मिळून एकत्र घेतले, तर चरण ३ व ४ हे अगदी तसेच येतात. म्हणजे श्लोकाचा पहिला अर्ध त्याच्या दुसऱ्या अर्धासारखाच होतो. चारपैकी एखादाच चरण वेगळा असला, की ती रचना वा श्लोक विषम होतो. तथापि अशी रचना संस्कृतमध्ये अपवादभूतच म्हणावी लागेल. चार चरणांतील एखाद्या अक्षराचे लघुगुरुत्व नियत नसले आणि तरीही त्यांच्या गेयतेत लक्षात येण्याजोगा फरक नसला, तर अशा श्लोकास उपजातिवर्गामध्ये घालण्यात येते. सम वृत्तांमध्ये मालिनी, वसंततिलका, मंदाक्रांता, शिखरिणी इ. खूप वृत्ते येतात. अर्धसम वृत्ते त्यामानाने फारच कमी आहेत. वियोगिनी, माल्यभारिणी ही त्यातील बरीच योजिली गेलेली वृत्ते आहेत. विषम चतुष्पदी,‘उद्गाता’ सारखीएखादीच. उपजातींमध्ये इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, किंवा वंशस्थ व इंद्रवज्रा यांचे परस्परमिश्रण हीच वृत्ते मुख्यतः आली आहेत.
पद्य गेय होण्यास त्यास एकेक पादात किमान आठ अक्षरे असणे सोयीचे असले, तरी संस्कृत छंदःशास्त्रज्ञांनी एकाक्षरीपादापासून पंचेचाळीस अक्षरी पादापर्यंतच्या वृत्तांची नोंद करुन ठेविली आहे. पिंगला ( ख्रिस्ती शकाच्या आरंभाच्याही आधीचा ) पासून ते हेमचंद्रा ( ख्रिस्ती शतक अकरावे) पर्यंत ९५० वृत्तांची नोंद झालेली आहे. यातली ६०० हून अधिक सम, सु. ५० अर्धसम, ३६ विषम आणि ४२ मात्रासंख्याक आहेत. वृत्तांची संख्या एवढी सांगितली गेली असली, तरी प्रत्यक्ष लेखनात ती पुष्कळच कमी आहे. सोळाव्या शतकापर्यंतच्या काळात सहाशे समवृत्तांपैकी केवळ शंभर वृत्ते प्रत्यक्षात योजिली गेली होती आणि त्यांपैकी पंचवीसच सातत्याने वापरलेली होती. अर्धसमवृत्तांपैकी फक्त वियोगिनी, माल्यभारिणी व पुश्चिताग्रा अशी तीनच वापरात होती व विषम रचनेत ‘उद्गाता’ तेवढेएकच होते असे आढळून आले आहे.
वैदिक छंदांचे लक्षण त्यांतील पादांची अक्षरसंख्या सांगितल्याने होऊ शकले, तरी त्या छंदांत पुढे अक्षरांचे तत्तत्स्थानीय लघुगुरुत्व अगदी नियत झाले, तेव्हा त्या लघुगुरुत्वाची कल्पना देणेही आवश्यक वाटू लागले कारण त्यामधील भिन्नभिन्न गेयतेचे स्वरूप नुसती अक्षरसंख्या सांगून नीटपणे स्पष्ट होत नसे. वृत्तपादांतील अक्षरसंख्या जेंव्हा आठावरून १९ ते २१ पर्यंत वाढली, तेव्हा हे करणे फार विस्ताराचे होऊ लागले. तेव्हा त्या पादांचे भाग वा तुकडे करून त्यांचे स्वरूप सांगण्याने ते थोडक्यात होते, असे लक्षात आल्यामुळे त्यांचे तसे तुकडे पाडून ते सोपे करण्यात येऊ लागले. ते तुकडे साहजिकच जेवढे अधिक अक्षरी असतील तेवढे कमी पडून त्याचे लक्षण अधिक लाघवाने करता येणे शक्य होई. हे तुकडे वा खंड त्रिकांचे म्हणजे त्र्यक्षरी, करण्यास पिंगलापासून प्रारंभ झाला व हेच गण विशेष सोयीचे आहेत असे आढळून आले. या गणांचे स्वरूप त्यांतील अक्षरांच्या लघुगुरुत्वावरूनच ठरे. लघुगुरुत्वाच्या दृष्टीने हे गण आठच प्रकारचे होऊ शकतात. चार अक्षरी खंड घेतले, तर १६ निरनिराळ्या स्वरूपाचे गण होतात. उलट दोन अक्षरी खंड घेतल्यास ते चारच वेगवेगळ्या स्वरूपाचे खंड (गण) होतील. चार अक्षरी खंड घेतल्यास १६ निरनिराळी नावे स्वीकारावी लागतील. उलट दोन अक्षरी गण घेतल्यास ही नावे जरी चारच लागली, तरी प्रत्येक वेळी खंड-संख्या अधिक सांगावी लागेल. शार्दूल-विक्रीडितासारख्या १९ अक्षरी वृत्तांत ते ९ वेळा तरी सांगावे लागतील. तेव्हा गणनासंख्या ही बेताचीच व खंडही बेताचे व्हावेत म्हणून त्र्यक्षरी गणच मान्य झाले असावेत. तिनाचा भाग जाऊन ज्या वृत्तांत १ वा २ अक्षरे शिल्लक राहतील त्यांचे लगत्व (लघुगुरुत्व) सांगितले म्हणजे झाले. या दृष्टीने आदि-मध्य-अन्ती एकेक लघु आल्यास त्या गणांस य-र-त आणि तशाच क्रमाने एकेक गुरू येत असल्यास त्यांना भ-ज-स अशी नावे देऊन व सर्वगुरू गणास म, व सर्वलघू गणास न असे नाव देऊन निर्वाह करण्यात आला. उरलेल्यांपैकी लघुस ‘ल’ व गुरूस ‘ग’ म्हटलेकी काम होई. संस्कृतमधील वृत्तांची लक्षणे एवढ्याने निश्चितपणे करता येऊ लागली. आजही त्यांच्याबाबत तीच पद्धती बहुमान्य व रूढ आहे. मात्र या गणांची नावे निरनिराळ्या छंदःशास्त्रकारांनी वेगवेगळी दिलेली असतात. काहींनी गणही एकेका अक्षरापासून ५-६ अक्षरांपर्यंत सांगितले.
परंतु एवढ्याने वृत्तलक्षणकाराचे काम संपत नसे. साधारणपणे मोठ्या म्हणजे १५ ते त्यापुढील अक्षरसंख्येच्या वृत्तांत गेयतेच्या किंवा म्हणण्याच्या सुकरतेच्या दृष्टीने मध्येच एखाददुसरा अल्पसा विराम घेणे इष्ट असते. असे विराम ‘यति’ नावानेओळखले जातात. १७ अक्षरी हरिणी, पृथ्वी, मंदाक्रांता आणि शिखरिणी यांत वेगवेगळ्या स्थानी ‘यति’ (स्त्रीलिंगी) सांगितल्या आहेत. हरिणी व मंदाक्रांता यांत त्या दोन-दोन दर्शविल्या आहेत. श्रुतिसुख-विराम, वाग्विराम, जिव्हेष्ट विश्रांतिस्थान या शब्दांनी त्यांचे वर्णन करण्यात आले आहे. पादान्ती नियतविराम येतोच. एवढे सांगितले की वृत्तलक्षण पूर्ण होते.
प्रत्येक वृत्ताचे नामकरण अर्थात निराळे येईच. काही वेळा एकच नाव अनेक वृत्तांना किंवा एकाच नावाची अनेक वृत्ते असल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या छंदःशास्त्रकारांनी आपापल्या ग्रंथांतून आपली नावे दिल्याने हे होणे स्वाभाविक होते.
जी काही थोडी मात्रावृत्ते संस्कृतमध्ये आली आहेत, त्यांत ‘आर्यावर्ग’ सर्वांत अधिक प्रमाणात आलेला आहे. ती मात्रावृत्ते असल्याने त्यांच्या लक्षणात मात्रागणच सांगण्यात येतात. हे बहुधा चतुर्मात्रिक गण असतात. म्हणजे एका गणात दोन ‘गुरु’ वा एक ‘गुरु’दोन ‘लघु’ किंवा चारही ‘लघु’ अक्षरे येऊ शकतात. मात्रावृत्तास ‘जाति’असे नाव पिंगलाने दिले आहे. एका आर्या वर्गात आर्या, गीति, उपगीति, आर्यागीति व उद्गीति असे पाच प्रकार आहेत. मूळ आर्या ही विषम ‘जाति’ म्हणावी लागेल. कारण तीमध्ये पहिला व तिसरा हे चरण १२ मात्रांचे, दुसरा १८ मात्रांचा आणि चौथा १५ मात्रांचा असतो. ‘गीति’ (मोरोपंती आर्या) ही अर्धसमजाति ठरेल. तीमध्ये १ व ३ हे चरण १२ मात्रांचे आणि २ व ४ हे १८ मात्रांचे आहेत. ‘उद्गीति’ ही आर्येच्या उलट म्हणजे दुसरा चरण १५ मात्रांचा व चौथा १८ मात्रांचा असतो. आर्येला प्राकृतात गाथा असेही नाव आहे. जातींमधील मात्रासमक वर्गात चतुर्मात्रिक गणांनी लक्षण चांगल्या प्रकारे सांगता येते, पण वैतालीय वर्गातील मात्रिक रचना तशा नियमित करता आलेल्या नाहीत.
छंदोविचारामध्ये यमक-विचार येऊ शकत नाही. संस्कृतमध्ये यमके मराठीसारखी आवश्यक नाहीत व केवळ शब्दालंकार म्हणूनच त्यांचा विचार होतो. सामान्यतः ती असतही नाहीत. प्राकृतात अंत्ययमक असे व त्यामुळे त्या धर्तीची म्हणजे ‘जाति’ पद्धतीची जी स्त्रोत्ररचना संस्कृतमध्ये झाली, तीतून ती यमके आढळतात.
संस्कृत छंदःशास्त्राचा इतिहास दीर्घ, समृद्ध आणि फार प्राचीन काळापासून सुरू होणारा आहे. सर्वात जुना उपलब्ध छंदोविचार पिंगलाच्या छंदःसूत्रात येतो. तो ख्रिस्तशकाच्याही आधीचा सूत्रकार आहे आणि त्याच्या सूत्रांना वेदांग म्हणून मान्यता मिळालेली आहे. तथापि त्यानेही आपल्या आधीच्या क्रौष्टुकी, यास्क व ताण्डिन या छंदःसूत्रकारांचा वैदिक छंदांच्या संदर्भात आणि सैतव, काश्यप, रात व माण्डव्य यांचा संस्कृत छंदाच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे. त्यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकातील भरताच्या नाट्यशास्त्रात काही छंदोविचार येतो. नंतरच्या कालात जयदेवाचा जयदेवच्छंदः (इ.स. ६०० च्या आगेमागे), जानाश्रयी छंदोविचिति (इ.स.सु. ६००), अज्ञातकर्तुक जातिसमुच्चयः हा छंदोग्रंथ, विरहांकाचा वृत्तजातिसमुच्चय (इ.स. सातवे शतक-प्रारंभ), स्वयंभूचा स्वयंभूच्छंदः (नववे शतक), जयकीर्ति (इ.स.सु. १००) याचे छंदोनुशासन, नंतर हेमचंद्राचे छंदोनुशासन (अकरावे शतक), केदारभट्टाचा वृत्तरत्नाकर (अकरावे शतक), अज्ञात जैन आचार्यकृत रत्नमंजूषा (अकरावे-बारावे शतक) व कोणा पिंगलोपनामधारी ग्रंथकाराचा प्राकृत पिंगल ग्रंथ (चौदावे शतक), अशी छंदोविचारासंबंधीची दीर्घ परंपरा सांगता येते. यांतून जवळजवळ सर्व संस्कृत-काव्यकालीन वृत्ते आली आहेत. थोडी वेगळी वृत्ते पुढील छंदोग्रंथात मिळतात. उदा., वराहमिहिरकृत बृहत्संहिता अज्ञात लेखकांचे कविदर्पण आणि अजित शांतिस्तव, गंगादासकृत छंदोमंजरी तसाच मंदारमरंदचंपू आणि अज्ञातकर्तृक छंदःकौस्तुभ, राजशेखरकृत छंदःशेखर, रत्नशेखरकृत छंदःकोष, जिनप्रभलिखित छंदोलक्षणानि, दामोदरमिश्रकृत वाणीभूषण व नंदिताढ्यकृत गाथालक्षण. तसेच मा. त्र्यं. पटवर्धन यांच्या छंदोरचनेमध्येही आणखी काही वृत्ते सटीप-सोदाहरण दिली आहेत. एकंदर सर्व वृत्तसंख्या ९९३ भरते. छंदोग्रंथकारांत जयदेव, स्वयंभू, जयकीर्ति, हेमचंद्र, नंदिताढ्य, रत्नशेखर हे जैन होते. यांनी मूळ संस्कृत परंपरा टिकविली, त्यांतील अनेकांनी प्राकृत-अपभ्रंशातील गणवृत्ते व मात्रावृत्तेही दिली. काहींनी गणनामे, लघुगुरुनामे ही वेगळी दिली आहेत व वृत्तनामे निरनिराळी सांगितली आहेत.
निरनिराळ्या कवींचे प्रभुत्व एकेका वृत्तावर विशेष असते किंवा त्यांची ती वृत्ते विशेष प्रिय असतात, असे क्षेमेन्द्राने सुवृत्ततिलक या ग्रंथात आपले मत नोंदून ठेवले आहे. त्याच्या मते कालिदासाची मंदाक्रांता, भवभूतीची शिखरिणी, रत्नाकराची वसंततिलका, पाणिनीची उपजाति, भारवीचे वंशस्थ, राजशेखराचे शार्दूलविक्रीडित ही अशी वृत्ते आहेत. इतर वृत्तांत त्यांनी रचना केली नाही असे अर्थातच नाही. मराठीमध्येही ज्ञानेशाची ओवी, तुकयाचा अभंग, मोरोपंतांची आर्या आणि वामनाचा सुश्लोक असे म्हटले गेले होतेच.
काही वृत्ते काही विशिष्टभाववर्णनास विशेष अनुकूल असतात, असेही मानिले गेले आहे. भरताच्या मते शार्दूलविक्रीडित हे धैर्य, उत्साह, पराक्रम यांचे व्यंजक आहे. हेमचंद्राच्या मते शृंगारास द्रुतविलंबित, वीरास वसंततिलका, रौद्रास स्त्रग्धरा व सर्वत्र शार्दूलविक्रीडित अनुरूप आहेत.
प्राकृत-अपभ्रंश छंदोरचना :संस्कृत साहित्यात वाल्मीकी जसा आद्य श्रेष्ठ कवी, तसा प्राकृतात हाल सातवाहन होय अशी परंपरागत समजूत आहे व ती प्राकृतपैंगलाचा टीकाकार लक्ष्मीधर याने ‘संस्कृते वाल्मीकीः ।प्राकृते सातवाहनः।’ या रूढ उक्तीच्या उल्लेखाने दर्शविली आहे. हालाच्या (सु. पहिले शतक) गाहा सत्तसईच्याही अगोदर बौद्ध व जैन या धर्मातील ‘सुत्त’ साहित्यछंदोबद्ध झालेले होते. दुर्दैवाने पिंगल—हेमचंद्र यांसारख्या वैदिक-जैन पंथीय छंदोविवेचकांनी प्राचीन आर्ष-भिख्खुकालीन संस्कृत-प्राकृत छंदोविकासाकडे लक्ष दिलेले नाही. आर्ष संमिश्र उपजातींप्रमाणेच सुत्तकालीन साहित्यांतही उदीयमान-विकसनशील अवस्थेतले जे संमिश्र छंदोबंध आहेत, त्यांत आनुष्टुभ्-त्रैष्टुभ् रचनेशी एकजीव झालेल्या ‘गाथा’ (आर्या) छंदाचे घटक आढळतात. गाथा सप्तशतीतील विकसित गाथारचनेपूर्वीचा उपलब्ध प्राचीनतम अवशेष तोच होय. प्राकृत रचना संस्कृताच्या वैभवकाळातही लोकप्रिय असल्या पाहिजेत, कारण संस्कृत कवी व छंदःशास्त्रज्ञ यांनी त्यांचा स्वीकार केला आणि त्यांचे छंद संस्कृतातही आणले. असे असले तरी, हे छंद साहित्यिक आणि प्रतिष्ठित दरबारी प्राकृतातील होते, लौकिक बोलीतील ते छंद नव्हते. भरताने गेय छंदांमध्ये प्राकृत छंदांचा उल्लेख केलेला नाही. लौकिक प्राकृतच काय, पण साहित्यिक प्राकृतामधील ग्रंथही अगदी थोडेच उपलब्ध आहेत. विरहांक व हेमचंद्र यांनी संस्कृतेतर छंद देताना प्राकृत छंद प्राकृतात व अपभ्रंश छंद अपभ्रंश भाषेत दिले आहेत. देशी भाषांतून रचना सुरू झाल्यावरही (म्हणजे तेराव्या-चौदाव्या शतकानंतरही) अपभ्रंश रचना चालू राहिल्या होत्या, याचे कारण ‘कलिकालसर्वज्ञ’ हेमचंद्राचार्यांनी त्यांचे केलेले नियमन व पुनरूज्जीवन होय.
सुत्तकालीन प्राकृत रचनांमध्ये जैनधर्मीय सूयगड आणि बौद्धधर्मीय सुत्तनिपात हे ग्रंथ अतिप्राचीन समजले जातात. त्यांतील सूयगड ग्रंथात अनुष्टुभ्, त्रिष्टुभ्, वैतालीय आणि संमिश्र अशी ‘गाथानुष्टमी’ रचना इ. आढळतात. याचे विवेचन छंदोग्रंथात नाही, पण केशव हर्षद ध्रुव यांच्या पद्यरचनांनी ऐतिहासिक आलोचना या ग्रंथाधारे जी माहिती मिळते, ती पुढे दिली आहे :
(१) अनुष्टुभ् : जे केइ तसा (तसआ) पाणीचिद्वन्ति अदुथावरा ।
परियाए (पर्याअे) अत्थिसेञ्त्र् जेणते तसथावरा ।।
सूयगड – १. १. ४. ८ प्रा. छंद
यातील संभाव्य उच्चारित पदे कंसात दिल्याप्रमाणे पाहिजेत. वैदिक अनुष्टुभातून अभिजात अनुष्टुभात होणारे परिवर्तन यात दिसते.
(२) त्रिष्टुभ् : निसम्म से भिक्खु समीहियट्ठं ।
पडिभाणवं होइ विसारअेय।।
आयाणअट्ठी वोदाणमोणं ।
उवेच्च सुद्धेण उवेदू मोक्सं ।। सूय.—१.४.१७.
यातील ‘पडिभाणवं’ हे पद ‘पड्मभाणवं’ व ‘वोदाण’ हे ‘वउदाण’ असे स्वाभाविकपणे होत असावे. लघुप्रयास व स्वरभक्तिदर्शक उच्चारण यात दिसते. वैदिक त्रिष्टुभाकडून इंद्रमाला उपजातीकडची वाटचाल यात आहे.
(३) वैतालीय : सीआदेम पडि दुगुञ्छिणो ।…
गिहिमत्ते असणं न भुञ्जइ ।। सूय.—१.२.२.२०.
यात ‘मत्ते’ पुढे येणाऱ्या ‘अ’ चा उच्चार होत नसावा. काव्यकालीन ‘वियोगिनी’ चे हे पूर्वीचे रुप होय.
(४) अनुष्टुभ्-गाथा संयोग : सयणासणेही भोगेहि ।
इत्थीओ अेगया निमन्तेन्ति ।।
अेयाणि चेव से जाणे ।
पासाणि विरुवरुवाणि ।। सूय.-१.४.१.४.
यातील ‘सयणा’ उच्चारतः ‘सय्णा’ होते. हा प्रथम चरण व पुढचा तिसरा चरण अनुष्टुभाचा आणि इत्थीओ इ. चरण १८ मात्रांचा व पासाणि वगैरे चरण १५ मात्रांचा अशी ही ‘अनुष्टुभी गाथा’ आहे.
झाणजोगं समाहट्टु । … आ मोक्खाअे परिव्वअेज्जासि ।।
सूय.-१-१.८.२६.
यामध्ये मात्र अनुष्टुभी तीन चरण आणि अंत्य चरण गाथेचा (१८ मात्रांचा) आहे.
जैन सौत्त वाङ्मयातील सूयगडात वैदिक त्रिष्टुभासारखी रचना ४६ वेळा व त्रैष्टुभी उपजाती त्याच्या दुप्पट (९२) वेळा सापडते व त्यात जवळजवळ सुघटित इंद्रवज्रावृत्त पंचवीस वेळा येते पण उपेन्द्रवज्रा दिसत नाही.
बौद्ध सुत्तनिपातात छंदांचे वैचित्र्य अधिक आहे, त्यात सूयगडातले अनुष्टुभ्, त्रिष्टुभजगती, वैतालीय व संयुक्त अनुष्टुभगाथा या छंदांचे दहाही प्रकार आलेले आहेत. विशेष म्हणजे उपेन्द्रवज्रा, इंद्रवंश, वंशस्थ व औपच्छंदसिक ही ‘वृत्तरूपे’ही तेथे आढळतात. सुत्तनिपातात आलेली याहूनही वेगळी छंदोरूपे म्हणजे त्रिष्टुभ् + अनुष्टुभ्, अनुष्टुभ् + वैतालीय, वैतालीय+जगती वगैरे मिश्र छंद. यापैकी काहींची उदाहरणे अशी :
(५) अनुष्टुभ्-त्रिष्टुभ् संयोग : असंहीरं असंकुप्पं ।
यस्स नीत्थ उपमा क्वचि ।।
अद्धा गमिस्सामि न मेSत्थ कङ्खा ।
एवं मँ धारेहि अधिमुत्तचित्तं ।।
सु. नि. ५.१८.२६.
यांतील पहिले दोन चरण अनुष्टुभाचे व पुढचे दोन त्रिष्टुभाचे आहेत. एकच अनुष्टुभ् किंवा एकच त्रैष्टुभ चरण असलेल्या चतुष्पद्या सु.नि. ५. १८. १२ व २. ८. ४ या स्थळी आढळतात.
(६) अनुष्टुभ्-वैतालीय संयोग : (१) अज्ज पण्णरसो उपोसथो ।
दिव्या रन्ति उपटि्ठता ।।
सु.नि. १. ९. १.
(२) वाहेत्वा सव्वा पापानि ।
विमलो साधुसमाहितो ठितत्तो ।। .
.
यांतील (१) यामध्ये प्रथमचरण वैतालीय (वियोगिनी) छंदाचा विषम चरण –‘अज्ज’ द्विलघू होऊन ठरतो व पुढचे तिन्ही चरण अनुष्टुभ् छंदाचे आहेत. (२) यामध्ये प्रथम चरण अनुष्टुभाचा व पुढचे तिन्ही वैतालीय (= औमपच्छंदसिक) छंदाचे समचरण आहेत
.
(७) वैतालीय-जगती : दूरतो आगतोSसि सभिया ।
पञ्हे पुच्छितुमभिकङखमानो ।।
सु. नि. १. ६. २.
यातील प्रथम चरण व तृतीय चरण वैतालीयाचे आणि द्वितीय-चतुर्थ चरण १२ अक्षरी जगतीचे आहेत. वैकल्पिक रीत्या ते अनुक्रमे वियोगिनी (प्राथमिक रूप) व औपच्छंदसिक (प्राथमिक) छंदाचेही म्हणता येतील.
इंद्रवंशा (सु.नि. २. १४. २६.) व औपच्छंदसिक (सु.नि. १. १. १.) चतुष्पदी स्वरूपात दिसतात. इतर बौद्ध ग्रंथांमध्येही असे संमिश्र प्रयोग आहेत.
(८) अनुष्टुभ्-गाथा : सच्चेन मेसमो नत्थि । असा मे सच्च पारमित्त ।।
चरियापिटकं (वट्टपोतकं)
दिरसतिपरदारेसु। तं पराभव तो सुखं ।।
पराभवसुत्तं (कोंसाबी – लघुपाठ).
(९) त्रिष्टुभ-जगती (?): सत्ताहमेवाहं पसन्नचित्तो ।
पुञ्ञत्थिको अचरी ब्रह्मचरियं ।
कण्हदीपायानचरियं (चरिया पिटकं)
(१०) सुत्तनिपातीतील पुढील चतुष्पदी सोळा मात्रांच्या चरणांची असावी :
यावदुखा निरया इध वुत्ता । तत्थSपि ताव चिरं परिरक्खे ।।
तस्मा सुचिषेसल साधुगुणेसु । वाचं मनं सततं परिरक्खे ।।
सु. नि. ३. १०. २२.
यातील दुसऱ्या चरणातील मात्रा निश्चितपणे सोळा आहेत. ही रचना अभिजात प्राकृतातील (व पुढे संस्कृतातील) ‘मात्रासमक’आणि त्यापुढील ‘पद्धति’ यांची पूर्वगामीच म्हणावी लागते.
कालिदासाच्या मालविकाग्निमित्र नाटकातील दुसऱ्या अंकामधील ‘दुल्लहोपिओ’ ही चतुष्पदी २२ मात्रिक चरणांची आहे. त्याचा छंद कोणता याविषयी नक्की काही सांगता येत नाही. विक्रमोर्वशीय नाटकाच्या दुसऱ्या अंकातील उर्वशीची प्रेमपत्रिका ‘सामिअ संभाविदा’ अशी मात्रागणी आहे. तिचा छंदही निश्चित नाही. ही गीते पुढे नियमित झालेल्या ‘विलंबित’ व ‘ललित’ गलितकांची पूर्वरूपे असावीत.
भासाच्या प्रतिज्ञा यौगंधरायण नाटकाच्या तिसऱ्या अंकामध्ये ‘णंपच्छ विसेसपिण्डिदा’ ही चतुष्पदी ‘वैतालीय’ या प्राकृत आदिम छंदात आहे, तर कालिदासाच्या शाकुंतलमध्ये पाचव्या अंकात आलेली ‘रागपरिवाहिणी गीति’ ही ‘अपरवक्क’ वृत्तात आलेली आहे. हे गणवृत्त वैतालीयाच्या वर्धित रूपातूनच आकारलेले आहे.
गाथा वर्गातील प्राकृत रचना अमाप आहेत. त्यांचे संमिश्र पूर्वरुप वर आलेच आहे. पण ‘गाथे’ चा पूर्ण विकास होऊन तयार झालेला ‘आर्या’छंद हाल सातवाहनाच्या गाहा सत्तसईत दिसतो. उदा., गाथा (आर्या) :
उच्चिणसु पडिअकुसुमं माधुण सेहालिअं हलिअसुण्हे ।
अह ते विसम विराओ ससुरेण सुओ वलअलदो ।।
गाहा सत्तसई
‘गाथा’ छंदाचा प्रचार प्राकृतात खूपच होता. गाथावर्गाच्या एकंदर छंदांचे वर्णन करणारा गाथालक्षणानि हा नंदिताढ्य (इ.स. अकरावे शतक) याचा स्वतंत्र ग्रंथ त्यानंतर तयार झाला. प्रवरसेनाच्या (पाचवे शतक) सेतुबंध काव्यात एकंदर १,२९० पैकी १,२४६ श्लोकबंध ‘आर्यागीति’ छंदात आहेत. पण आठव्या शतकातील वाक्पतिराजाचे गउडवहो काव्य गाथा-आर्याछंदात आहे. गाथा वर्गातील उपगीति पोटभेद राजशेखराच्या कप्पूरमंजरीमध्ये वापरलेला आहे. विमलसूरिरचित पउमचरिय (काव्यातच म्हटल्याप्रमाणे) ‘गाहाणिबद्ध’ आहे, म्हणजे गाथावर्गीय छंदात आहे आणि त्यातील ‘ललितागीति’ व ‘चंद्रिकागीति’ हे विरळपणे आढळणारे भेद वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सेतुबंध काव्यात ४४ श्लोकबंध ‘गलितक’ वर्गातील आहेत पण ते अपभ्रंश छंद असून मागाहून प्रक्षिप्त केलेले असावेत.
प्राकृत छंद इसवी सनाच्या पूर्वीपासून आठव्या शतकापर्यंत उपयोगात येत होते. या छंदात अंत्यप्रास म्हणजे यमक आवश्यक नव्हते. उच्चारतः ‘अे’ अनेक वेळा ऱ्हस्व असे. ‘ह’— कार व ‘य’— कार जोडलेली अक्षरे आली, तरी तत्पूर्वीच्या लघूचे गुरु अक्षर होत नसे. अपभ्रंश छंदात तशी सूट अनेक प्रकारे घेतली जाऊ लागली.
गाहा सत्तसईपासून कालिदासाच्या नाटकापर्यंत (इ.स. चौथे शतक) प्राकृत छंद होते, नंतर दहाव्या शतकापर्यंत प्राकृताच्या जोडीला अपभ्रंश साहित्य आले. त्यानंतरही अपभ्रंशरचना जैनांच्या साहित्यात चालू राहिली, देशी भाषांचा जमाना तेराव्या शतकापासून सुरु झाला होता, तरीही प्राकृत छंदांचे विवरण वृत्तजातिसमुच्चय, कविदर्पण, स्वयंभूछंद, छंदःशेखर, जयकीर्तिकृत छंदोनुशासन, हेमचंद्राचे छंदोनुशासन, गाथालक्षण, छंदःकोष, प्राकृतपैंगल या ग्रंथांतून मुख्यत्वे केलेले आहे. एकंदरीने पाहता असे दिसते, की प्राकृत छंद हे लोकगीतांतून उद्भवले असले, तरी साहित्यातील त्यांचा आविष्कार शुद्धशिष्ट साहित्यिक प्रयोगातून झाला. उलट अपभ्रंश छंद हे लौकिक परंपरांतून विकास पावले व त्यांचे गेयत्वही तत्कालीन परंपरेला धरून राहिले. नवव्या-दहाव्या शतकानंतर प्राकृत-अपभ्रंश छंद दर्शविताना त्या त्या भाषेत रचना केली गेली. संदेशरासक ग्रंथासारख्या त्यानंतरच्या काव्यातही ‘गाथा’ छंदाचा प्रयोग करताना प्राकृतनिष्ठ शैलीचा उपयोग केलेला आहे. अद्दहमाण (अब्दुल रहमान) या मुसलमान कवीचे हे काव्य जवळजवळ अखेरचे अपभ्रंश काव्य होय. (तेरावे शतक). चौथ्या-पाचव्या शतकांपासूनच्या प्राकृत ग्रंथातून अपभ्रंशही येऊ लागले होते. विशेष महत्वाचे अपभ्रंशनिष्ठ साहित्य म्हणजे बौद्ध सिद्ध कवींच्या स्फुट गेय रचना. त्यांत सोरठा, अरिल्ल, उल्लाला, रोला व विशेषतः दोहा या अपभ्रंश छंदांचा उपयोग आढळतो. महापुराण, जसहरचरिउ, पउमचरिउ, रिठ्ठणेमिचरिउ, भविसयत्तकहा वगैरे ग्रंथांमध्ये ‘कडवक’ (कडवे) रचनांची दीर्घ प्रबंधकाव्ये आहेत. यांपैकी महापुराण – जसहरचरिउ यांचा कर्ता पुष्पदंत हा राष्ट्रकूटांच्या मान्यखेट राजधानीत राजाश्रय घेऊन होता. स्वयंभू हा पउमचरिउचा समर्थ कवीही तेथे होता. त्याचा पुत्र त्रिभुवन यानेही तेथेच आश्रय मिळवून काव्यरचना केली आहे. मराठीपूर्वीची महाराष्ट्रातील भाषा व साहित्य अपभ्रंश होते ह्या वस्तुस्थितीचेच यामुळे निदर्शन होते.
अपभ्रंश रचना प्रथम कालिदासाच्या विक्रमोर्वशीयामध्येच पाचव्या अंकात बारा वेळा अन्योक्तिरूपाने आलेल्या आहेत. त्यांपैकी सात समचतुष्पादी रचना आहेत, प्रत्येक चरण ४ चतुर्मात्रकांचा आहे आणखी तीन समचतुष्पादी रचनांत प्रतिचरणी अनुक्रमे १०, २१, व २४ मात्रा आहेत. एक रचना जिला पुढच्या काळात दोहा नाव मिळाले, तशी आहे. राहिलेली द्विपदी रचना प्रतिपादी ४६ मात्रा असलेली आहे. नंतरच्या काळात १६ मात्रिक चरणांच्या रचना अनेक निघाल्या व त्यांना ‘पद्धडिका’ हे सामान्य पद्य-रीति-वाचक नाव मिळाले. तेराव्या शतकातील संदेशरासक काव्यात प्राकृत गाथाआर्या छंदांबरोबरच नंतरचे नवे प्रचारात आलेले अपभ्रंश छंद आहेत. जानाश्रयी या कालिदासानंतर निर्माण झालेल्या छंदोग्रंथात काही व त्यानंतर वृत्तजातिसमुच्चय व स्वयंभूछंद यांमध्ये यांतील बरेचसे अपभ्रंश छंद आले पण अत्यंत व्यवस्थितपणे सर्व छंदांचे नियमन व वर्णन करण्याचे महान कार्य हेमचंद्राच्या छंदोनुशासन ग्रंथात केले गेले. त्यानंतरच्या दोनशे वर्षांत रूढ झालेले अपभ्रंश छंद व काही देशी छंद प्राकृतपैंगल या ग्रंथात नोंदलेले आहेत. प्राकृत-अपभ्रंश छंदांची संख्या सु. ६०० भरते त्यांतून प्रत्यक्ष संस्कृत-प्राकृतातून आलेले जवळजवळ २५ छंद सोडले, तर उरलेले सु. ५७५ छंद फक्त अपभ्रंश भाषेतील आहेत. ह. दा. वेलणकर यांनी तयार केलेल्या प्राकृतवृत्तरूपसूचिमध्ये समद्विपदी, विषमद्विपदी, समचतुष्पदी, विषमचतुष्पदी, अर्धसमचतुष्पदी, पंचपदी, षट्पदी, अष्टपदी ही शुद्ध वृत्ते व द्विभंगी, त्रिभंगी, चतुर्भंगी, पंचभंगी,अष्टभंगी, द्वादशभंगी ही मिश्रवृत्ते असे व्यापक वर्ग दिलेले आहेत. एकंदर ६०० वृत्तांपैकी १०-१२ गणवृत्ते सोडली, तर बाकीची मात्रावृत्ते आहेत. अभिजात प्राकृत मात्रावृत्तांचे नियमन फक्त एक चतुर्मात्रक गणकल्पून व लघु-गुरू सांगून केल्याचे मागे पाहिलेच आहे पण अपभ्रंश छंदांचे शास्त्र सांगताना स्वयंभूने द्विमात्रक (द), त्रिमात्रक (त), चतुर्मात्रक (च), पंचमात्रक (प), व षण्मात्रक (छ) असे मात्रागण योजिलेले आहेत. हेमचंद्राने हेच मात्रागण दर्शविले आहेत पण छ ऐवजी ष कल्पिला आहे. छंदोनुशासनात हेमचंद्राने सर्व छंदःसूत्रे संस्कृतात दिली आहेत पण संस्कृत व अपभ्रंशवृत्तांची उदाहरणे त्या त्या भाषेत रचून दिली आहेत, त्यामुळे प्राकृत-अपभ्रंश वृत्तांना स्वतंत्र प्रतिष्ठा मिळाली.
अपभ्रंश काव्यात अंत्यप्रास म्हणजेच यमक वापरले जाते. अपभ्रंश रासाबंध-काव्ये ही लघुभावकाव्ये-प्रशस्तिकाव्ये असल्यामुळे यमक अलंकार हे त्यांचे एक आवश्यक अंग बनले. प्राकृतातून आलेल्या गाथा-रचनांत व वैताली यांत यमक आवश्यक नाही. प्रदीर्घ अपभ्रंश संधिकाव्ये ही दहाव्या शतकानंतरची वाढ असून त्याला बाराव्या शतकात बहर आला. हेमचंद्राने कुमारपालचरिय लिहिल्यानंतर या संधिकाव्यातही यमक कायम राहिले.
हेमचंद्राने छंदोनुशासनाच्या चौथ्या अध्यायात प्राकृत छंदांचे वर्णन केले आहे. आर्या-गलितक-खंजक शीर्षक वर्णन त्यात येते. गाथा-गीतिका छंदोवर्ग व त्याचे प्रस्तार, २४ गलितक चतुष्पद्या, सु. ३५ खंजक चतुष्पद्या, काही मिश्र छंदांचे शीर्षकवर्गीय द्विभंगी, त्रिभंगी प्रकार, असे छंद यात आहेत. गलितक-खंजक मात्रादृष्ट्या सारखेच पण ‘गलितका’त अनुप्रास व यमक असतात, तर ‘खंजका’त फक्त अनुप्रास असतात. यातील शीर्षक ही मिश्र मात्रावृत्ते मागध भाटकवींना षट्पद व सार्धच्छंद या नावाने परिचित होती. या मिश्र प्रशस्तिपर छंदातील ‘मात्रा’ नामक छंद, उल्लाल, द्विपदी, वस्तूक आणि दोहक यांच्या संयोगाने बनलेली ‘शीर्षके’ द्विभंगी वर्गात येतात असे सांगून व परंपरेला मान देऊन फक्त ‘रड्डा’ युक्त शीर्षकेच तो वर्णितो.
या तथाकथित प्राकृत छंदापैकी गाथा-प्रस्तार सोडून बाकीची अपभ्रंशातही आहेत. ‘शीर्षकां’ची घटकवृत्ते अपभ्रंश वृत्तेच आहेत. पुढे पाचव्या अध्यायात अपभ्रंशातील वृत्त आलेली आहेत. तेथे बारा ‘रासक’ प्रस्तार, एक अर्धसम ‘रास’ छंद, ‘मात्रा’ छंद, ‘रड्डा’ हा संमिश्र छंद,काही सर्वसम चतुष्पद्या, ‘धवल’ छंद व ‘धवल-मंगल’, ‘फुल्लडक’ –‘झंबटक’ या संज्ञा हे छंदोविषय चर्चिलेले आहेत. सहाव्या अध्यायात षट्पदी-चतुष्पदी छंद आहेत षट्पदीत षट्पदजाति, उपजाति व अवजाति हे वर्ग आलेले आहेत. यानंतर ११० तऱ्हेच्या अर्धसम चतुष्पद्या व नऊ प्रकारच्या सर्वसम चतुष्पद्या येतात. सातव्या अध्यायात लहानमोठ्या द्विपद्या येतात. हेमचंद्राने २८-मात्रिक चरणांची ‘कर्पूर’ व २७- मात्रिक चरणांची ‘कुंकुम’ या द्विपद्या खास नमूद केल्या असून त्या मागध भाटकवीत उल्लाल नावाने प्रचलित असल्याचे सांगितले आहे.
प्राकृतपैंगल ग्रंथात शेवटच्या अवस्थेतील अपभ्रंश पद्य व छंद दृष्टीस पडतात, यापूर्वीच्या छंदोग्रंथात न मिळणाऱ्या काही वेगळ्या छंदांची नावे-रूपे यात दिलेली आहेत. त्यांपैकी महत्त्वाचे उल्लेख पुढीलप्रमाणे आहेतः मधुभार, दीपक, आभीर, हाकलि, सिंहावलोक, प्लवंगम, गंधानक (गंधाण), हीर, झुलना (मात्रिकछंद), चौबोला, चौपेया, मरहठ्ठा, दुर्मिला (दुमिल्ल), त्रिभंगी छंद जलहरण, लीलावती, मदनगृह इत्यादी. प्राकृतपैंगल व वाणीभूषण यांमध्ये मुळातील काही मात्रिक ताललयीचे छंद अक्षरगणवृत्तात समाविष्ट झालेले आहेत. उदा., चर्चरी, गीता, सुंदरी, दुर्मिला, किरीट, त्रिभंगी वगैरे छंद. हिंदी-गुजराती व काही प्रमाणात मराठी या देशी भाषांमध्ये प्राकृतपैंगलाचा प्रसार झालेला होता. पण गुजरात-राजस्थानात याच्या जोडीला छंदांच्या जैन परंपराही जीव धरून होत्या. प्राकृतपैंगलात दिलेले पादाकुलकांचे लक्षण वाणीभूषणात मागाहून आले व ते पिंगलादींहून भिन्न आहे. संस्कृत ‘पादाकुलक’ मात्रासमक भेदांच्या संयुक्त चरणांचे असते, फक्त वरील दोन ग्रंथांतच त्याची मुक्त मात्रिक नियुक्ती दर्शविली आहे. मोरोपंताला वाणीभूषण उपलब्ध झालेले होते आणि त्यामुळेच चार चतुर्मात्रकांचे पादाकुलक मराठीत आले.
जैन अपभ्रंश प्रबंधकाव्यात संधि-नामक विभाग असत. ‘कडवक’ हे या संधीचे अंतर्गत पोटभाग होत. महापुराण वगैरे अनेक प्रदीर्घ काव्यांतील ‘संधी’लाच करकंडुचरिउ काव्यात ‘परिच्छेद’ म्हटले आहे. प्रत्येक संधीच्या सुरुवातीस व प्रत्येक कडवकाच्या शेवटी जो विशिष्ट षट्पद-चतुष्पद छंदोबंध येई त्याला ‘ध्रुवा’, ‘ध्रुवक’ किंवा ‘घत्ता’ म्हणत. असा छंद जेव्हा कडवकाच्या शेवटी येऊन कडवकातील वर्ण्य विषयाचाच उपसंहार करतो, तेव्हा त्या षट्पद-चतुष्पद रचनेला ‘छड्डणिक’ म्हणत. कडवकात एकाच तऱ्हेचा छंदोबंध पाहिजे असा नियम नव्हता पण बहुधा तसे असे. कडव्यात किती छंदश्चरण असावेत याला एकच नियम नसे पण त्यात अतिशय विषम संख्या नसे.
अपभ्रंशकाव्यात मात्रावृत्तांबरोबर काही गणवृत्तेही उपयोजिलेली आहेत. काहीतरी चाल व ताल सहजी चपखल बसेल अशी गणवृत्तेच बहुधा त्यांत आहेत. काहींत मात्रिक स्पर्शही जाणवतो,म्हणजे एखाद्या गुरूच्या जागी दोन लघूंची योजना असते. मात्र मालिनी, शार्दूलविक्रीडित अशी वृत्ते संस्कृत काव्यांच्या वारशाने आलेल्या छंदोनिष्ठांचा अनुकार म्हणून आलेली असावीत. दहाव्या शतकातील जैन कवी धनपालकृत भविसयत्तकहा व चौदाव्या शतकातील अब्दुल रहमान (अद्दहमाण) रचित संदेशरासक या दोन अपभ्रंश काव्यांतील छंदोरूपे या दृष्टीने नमूद करण्यासारखी आहेत.
भविसयत्तकहामध्ये मुख्यत्वे येणारी मात्रावृत्ते सोळा आहेत. ‘पज्झडिआ’ व ‘ओडिल्ल-अरिल्ल-अल्लिला’ ही दोन प्रधान मात्रावृत्ते आहेत. ‘सिंहविलोकिता’ चा प्रयोगसंख्यादृष्टीने त्यानंतर येतो. मग प्लवंगम हा खास छंद. त्यानंतरच्या क्रमात ‘कलहंस’ व ‘काव्य-रोला’ हेछंद येतात. उल्लाला हा दोह्याच्या विषमचरणखंडाचा, प्रारंभी द्विमात्रक योजून येणारा छंद लक्षात राहण्यासारखा आहे. ‘द्विपदी-दुवइ’ हा२८ मात्रिक चरणाचा छंद त्यात आहे. तो साकीच्या दीर्घ चरणाच्या घटनेचा आहे. मग येतो ‘मरहठ्ठा’ हा छंद. याच्या चरणात १०, ८ व ११ मात्रांचे तीन खंड असतात. ‘घत्ता’ नामकविशिष्ट छंद ‘मरहठ्ठा’ ला गुरूची जोड दिल्याने होतो. यांशिवाय ‘मन्मथतिलक’ सारखे सात छंद आलेले आहेत. गणवृत्तातील ‘मन्दर’, ‘सोमराजि’ ही षडक्षरी वृत्ते, बारा-अक्षरी ‘भुजंगप्रयात’ व ‘स्त्रग्विणी’ (लक्ष्मीधर) आणि पंधरा-अक्षरी चरणांचे ‘चामर’ वृत्त ही पाच वृत्ते येतात. पुष्पदंताच्या जसहरचरिउमध्येही भुजंगप्रयात व स्त्रग्विणी आहेत. शिवाय ‘वितान’,‘पंक्तिका’ व ‘चित्रा’वृत्त ही आहेतच. संदेशरासकातील मात्राछंदात ‘गाथा’ (आर्या) खास लक्षणीय आहे. ‘सवैया’ हे तालगतिनिष्ठ गणवृत्त त्यात आहे. ‘शार्दूलविक्रीडित’ ही क्वचित येते. ‘मालिनी’चा प्रयोगही आढळतो. ‘नंदिनी’ (तोटक) व ‘भ्रमरावलि’ ही ताललयींची गणवृत्तेही त्यात आहेत.
महापुराण-जसहरचरिउ यांत कित्येक ठिकाणी अशी रचना आहे, की जी ग्रंथगत नामाप्रमाणे आढळत नाही. उदा., ‘आरूढा महासवार वाहिया तुरंगा ।।’महा. संधि. ७२/८ याचे नाव संपादकांनी किंवा लेखनिकाने (?) ‘हेला’ दिले आहे पण हेमचंद्राच्या (छंदो.४/२७) ‘हेला’ शी या रचनेचा मेळ बसत नाही. मराठीतील आरतीपरिलीनाशी ती निगडित वाटते. मात्रिक ‘विलासिनी’ किंवा गणवृत्त ‘श्येनी’, ‘विदग्धक’ ही हेमचंद्राची छंदोरूपे मराठीतील ‘शुद्धकामदा’सारखी आहेत, पण ‘कामदा’ हे नाव कोठल्याही प्राचीन छंदोग्रंथात आढळत नाही. वर प्राकृतपैंगलमधील छंदोरूपे दिली आहेत, त्यांत अनुक्रमे मराठी ‘पादाकुलक’, ‘फटका’, (हरिभगिनी), ‘साकी’ (लवंगलता) व ‘शंकराभरण’ (झंपा) चालीची ‘मोहमाया’, ‘वीरभद्र’ जातीरूपे प्रतीत होतात पण मानसोल्लास, संगीतरत्नाकर यांत आलेले काही पद्यप्रकार या अपभ्रंशवृत्तातही आढळत नाहीत. उदा., ‘प्रबंधः चतुरंगक:, ‘त्रिपदी’‘उवी’, ‘ओवी’,‘राहडी’, ‘दन्तिका’ (मानसोल्लास, विनोदविंशति-२+क्रीडाविंशति विभाग), ‘ओवी’ (संगीतरत्नाकर) मात्र या दोन्ही ग्रंथात ज्या धवल गीताचे वर्णन आहे व ‘चच्चरी’ गीतही आहे, ती अपभ्रंशछंदोग्रंथात आलेली आहेत. या दोन ग्रंथापैकी तिसऱ्या सोमेश्वराचा मानसोल्लास हा ग्रंथ हेमचंद्राच्या छंदोनुशासनाच्या काळातील आणि शार्ङ्गदेवाचा संगीतरत्नाकर त्याच सुमाराचा आहे. म्हणजे नवव्या-दहाव्या शतकांपासून देशीभाषांत (गीयते देशभाषया, सं. र. ) स्वतंत्र पद्ये रचली जाऊन बाराव्या शतकापर्यंत सर्वत्र पसरून ग्रंथांतरी त्यांच्या संज्ञा व संहिताही (मानसोल्लासातील मराठी व इतर गीते) नमूद झाल्याशिवाय, या गेय अपभ्रंश रचनांमधून देशीभाषांतील तालनिष्ठ छंदांचा-पद्यांचा स्त्रोत आकार घेऊ लागला एवढेच नाही, तर त्यातील अनेक संगीतानुकूल रचनांचे संस्कृतीकरणही झाले. जयदेवाचे गीतगोविंद हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे पण याच्या आधीच्या काळात म्हणजे आठव्या-नवव्या शतकांत शंकराचार्यादिकांनी स्तोत्रादी रचनांत अपभ्रंश गेय रीतीच अनुवादिली. चर्पटपंजरी, द्वादशपंजरिकादी रचना याचीच साक्ष देतात.
या अपभ्रंश रचना गुजरात-राजस्थानमध्ये, जैन पंथामुळे, चौदाव्या शतकापर्यंत चालू राहिल्या. महाराष्ट्रात देशी भाषेला लौकर वेग मिळाला पण अपभ्रंशपरंपरा मात्र लुप्त झाली.
मराठी छंदोरचना:मराठी छंदोरचनेचे मूळ मराठी वाङ्मयाप्रमाणेच संस्कृत-प्राकृत-अपभ्रंश या भाषांतील छंदोरचनेमध्ये, म्हणजेच पद्यरचनेपर्यंत, मागे जाते. प्रारंभीच्या ओवी-अभंगादी मराठी छंदांचा वैदिक छंदांशी असलेल्या संबंधाचा मागोवा वि. का. राजवाडे यांनी घेतलेला आहे. मराठीमधील वृत्तरचना अभिजात संस्कृतमधील वृत्तरचनेवरूनच घेतली आहे. काही मात्रारचना शुद्ध मराठी असली, तरी बरीच विदग्ध मात्रारचना प्राकृत पद्यरचनेवरुन घेतलेली असावी.
सर्वत्र पद्यरचनेप्रमाणे लयबद्ध शब्दरचना हे मराठी पद्यरचनेचे सामान्य लक्षण आहे, असे म्हणता येईल. सारी लयबद्धता रचनेमधील कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या नियततेमधून निर्माण होते. केव्हा ती अक्षरसंख्येच्या, केव्हा मात्रासंख्येच्या, तर केव्हा दोन्ही प्रकारच्या नियततेमधून निर्माण होते. मराठी पद्यरचनेचे यामुळे तीन प्रमुख वर्ग झालेले दिसतील. एकास अलीकडे ‘छंद’ असे अभिधान छंदोरचनाकार मा. त्र्यं. पटवर्धन यांनी दिलेले आहे. कारण वैदिक पद्यरचनेस ‘छंद’असे सामान्य नाव आहे. त्या रचनेस जवळ असणारी ती रचना आहे. ती अक्षरसंख्यानियत (स्थूलपणे) आहे. मात्रारचनेस ‘जाति’ असे त्यांनी म्हटले आहे आणि संस्कृत अभिजात वृत्तरचना जी मराठीमध्ये आली, तिला ‘वृत्त’ असे नाव त्यांनी दिले आहे. या तीन प्रभेदांप्रमाणे, पण त्यांतील बरीच बंधने न मानणारा असा एक ‘मुक्तच्छंद’ नावाचा पद्यवर्ग १९३० नंतरच्या काळात मराठीमध्ये आला आहे. इंग्रजीमधील ‘फ्री व्हर्स’ चे हे मराठी रूपांतर आहे.
यातील कोणत्याही प्रकारच्या लयबद्ध रचनेची एक पंक्ती अथवा तुकडा हा सर्व पद्यरचनेचा मूळ घटक होय. अशा तीन, चार वा अधिक पंक्तींचा एक समूह म्हणजे एक ओवी वा अभंग वा श्लोक किंवा कडवे होते. एका कवितेत असे अनेक समूह, श्लोक, कडवी असतात. एका कवितेत असे बहुतेक सर्व समूह एकाच प्रकारची लयबद्धता स्वीकारून लिहिलेले असतात. पद्यरचनेचे जे पहिले तीन प्रमुख पद्यवर्ग सांगितले, त्यांत लयबद्धतेचे अनेक प्रकार,उपप्रकार असतात. त्यामुळे सध्या असंख्य पद्यप्रकार मराठी छंदोरचनेमध्ये उपलब्ध झालेले आहेत. त्यांत आता मुक्तच्छंदाची भर पडल्याने मराठी कवींस पद्यरूप आत्माविष्काराची काहीच अडचण उरली नाही,असे म्हणता येईल.
‘छंद’ या रचनाप्रकारात अक्षरसंख्येकडे स्थूल मानाने लयबद्धतेचे श्रेय जाते. अनुष्टुभ्, त्रिष्टुभ्,जगती इ. वैदिक छंदांत ही अक्षरसंख्या पुष्कळच नियत आहे. मराठीमध्ये गेय अथवा स्त्रियांच्या ओवीतही बरीचशी तशी आहे. ग्रांथिक म्हणजे ग्रंथांतून आलेली ओवी मात्र पुष्कळच सैल असते. त्या मानाने अभंग छंद अधिक नियत आहे. तथापि त्यातही अनेक वेळा सैल रचना दिसते. एखाद्या अक्षराचा उच्चार दीर्घ करून किंवा निसटता करून म्हणताना ती रचना नियत करून घेता येते. त्यातील गेयता ही अक्षरसंख्यानिष्ठ असल्याने या रचनेत लघुगुरुत्वाला तादृश महत्त्व नाही म्हणून तिला लगत्व (लघुगुरुत्व) भेदातील असेही म्हणण्यात येते. ‘जातिरचना’ मात्रासंख्यानिष्ठ असल्याने मात्रानियततेवर अवलंबून असते (लघू अक्षराची एक मात्रा व गुरू अक्षराच्या दोन मात्रा असा साधारणपणे हिशोब असतो). त्यामुळे तेथे लघुगुरुविचार करावा लागतो. या रचनेत पुष्कळशी रचना अष्टमात्रिक किंवा षण्मात्रिक आवर्तनांच्या पंक्तीमध्ये केलेली आढळते. काही वेळा ती पंचमात्रिक व फारच क्वचित सप्तमात्रिक असू शकते. आर्येत ती चतुर्मात्रिक असलेली दिसते. साकी, फटका,आर्या ही रचना व मराठीमधील असंख्य पदरचना ही ‘जाति’ या वर्गात पडते,अभिजात संस्कृतमधून आलेली ‘वृत्तरचना’ अक्षरांच्या आणि त्यांच्या लघुगुरुत्वाच्या नियततेवर अवलंबून असल्याने तिला ‘गणवृत्ते’ वा अधिक अचूकपणे ‘अक्षरगणवृत्ते’ किंवा थोडक्यात ‘वृत्ते’ असे म्हणण्यात येते. भुजंगप्रयात, मालिनी, वसंततिलका, मंदाक्रांता, पृथ्वी, हरिणी, शिखरिणी,शार्दूलविक्रीडित इ. असंख्य वृत्ते मराठीमध्ये आली आहेत. त्या चारचरणी श्लोकरचनेत प्रत्येक चरणातील अक्षरसंख्या आणि त्यातील प्रत्येक स्थानातील अक्षराचे लघुगुरुत्वही अगदी नियत असते. या शतकात बऱ्याच प्रमाणात आलेला गझल हा फारसी प्रकारही अगदी शुद्ध स्वरूपात माधव जूलिअन् यांनी वृत्तांइतकाच नियमबद्ध करून टाकलेला आहे. मुक्तच्छंदात तो ‘छंद’ असल्याने लघुगुरुत्वाचे बंधन नाही. पंक्तींची लांबीही कमीअधिक असते. तशीच त्यांची एका काव्यखंडातील संख्याही अनियत असते. यापूर्वीच्या बंधनांतून ती मुक्त असल्यानेच या रचनेस मुक्त हे नाव मिळाले आहे. यात यमकांचेही बंधन नसल्याने ती अधिकच मुक्त होते.
मराठी कविता वैदिक छंदांत किंवा संस्कृत वृत्तांत नसलेल्या अंत्ययमकाचे बंधन स्वीकारूनच सुरू झाल्याने ‘मुक्तछंद’ येईपर्यंत यमकबद्धच असे परंतु लयबद्धतेशी संबंध नसल्याने यमकांचा पद्यविचारात विचार करण्याचे खरोखर कारण नाही. ओवीअभंगादी छंदांमधून चरणांत समजण्याकरिता मात्र त्यांचा उपयोग होतो. शिवाय त्यांमुळे रचनेस काही माधुर्यही लाभते. मराठीमध्ये लावणी, कटाव, पोवाडे आणि पदरचना यांमध्ये यमकांचा उपयोग फार केला जातो. त्यांखेरीज ही रचना होतच नाही. एवढ्यामुळेच पद्यरचनाविचारात त्याला स्थान देण्यात येते. नाहीतर पद्यविचारात त्याचा उल्लेखही करण्याचे कारण नाही.
छंद, वृत्त आणि जाति या पद्यप्रकारांत सम, अर्धसम आणि विषम असे आणखी उपभेद येतात. पद्यातील सर्व पंक्ती सारख्याच असल्या की त्यास सम म्हणावयाचे, पंक्तीतील पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे काहीसे वेगळे, परंतु सर्व पंक्तीतील पूर्वार्ध सारखे आणि उत्तरार्ध सारखे असले,की ते पद्य अर्धसम होते. यांतील चारांपैकी एखादा चरण वेगळा असला, तर ते पद्य विषम ठरते. साडेतीन चरणी ओवी किंवा बरेच अभंग हे विषम वर्गात पडतात. तथापि अभंगांत आणि स्त्रियांच्या ओव्यांत सम ओव्या वा अभंगही असतात. ‘आरती’ मधील पद्य बरेचसे सम असते. वृत्तांमध्ये वियोगिनी, माल्यभारा यांसारखी काही थोडी अर्धसम रचना आहे, परंतु बरीच रचना समच असते. जातींमध्ये ‘साकी’, ‘हरिभगिनी’, ‘पादाकुलक’ इत्यादींना सम म्हणता येईल. ‘नृपममता’, ‘चंद्रकला’,‘केशवकरणी’ या अर्धसम होऊ शकतील. काही मिश्रही असतात. या उपभेदांमध्येही अनेक विकृती (फरक) असतात आणि यामुळे त्यांचे अनेकानेक उपप्रकार होऊ शकतात. मराठीत एकंदर पुष्कळच पद्यप्रकार असल्याने मराठी छंदोरचना फार समृद्ध झाली आहे.
मुक्तच्छंदातही काही काळ काही नियतता सांभाळली जात असता अक्षरनिष्ठ आणि मात्रानिष्ठ अशी दुहेरी रचना होत होती. अनिलांच्या मुक्तच्छंदातील पंक्तीमधील चरणक पाच वा सहा अक्षरी असत,त्यावेळी ती रचना अक्षरनिष्ठच होती. वा. ना. देशपांडे यांनी ती मात्रानिष्ठ (अष्टमात्रिक) असू शकते हे तशी रचना करून दाखवून दिले. ‘आज कशा-नेशी मला-येईनाशी-झाली झोप’ यामध्ये ती अक्षरनिष्ठ आणि मात्रानिष्ठही असलेली दिसेल. प्रत्येक अक्षराचे वजन दोन मात्रांचे असते,हा छंदांमधील नियम येथे गृहीत धरावा लागेल इतकेच. अलीकडे बरीच रचना एवढेही नियतत्त्व मानीत नसल्याने ती बरीच गद्यलयीची झाली आहे व तीमधील लयबद्धता बोलीतील लयीकडे झुकली आहे. कित्येक वेळा पद्यामधील अनियमित शब्दान्वयही दिसत नाही. सरळ गद्यच एक वाक्य तोडून त्याचे लहान लहान चरण दाखवून लिहिले जाते. यातील काव्य हे पद्यावर मुळीच अवलंबून नाही.
मुक्तच्छंदाला जवळ असणारी, तथापि अधिक नियत असणारी, शब्दांच्या बोलण्यातील उच्चाराला धरून असणारी रचना अलिकडे अनिलांच्या दशपद्यांमधून दिसते. तीमध्ये यमक मात्र फिरून आलेले दिसते. ‘वारंवार। आवर्जून। मन म्हणते। हट्ट धरून’ अशी ती षण्मात्रिक रचना ठरेल. ही अद्यापि फारशी रूढ नाही.
ज्या रचनेस अक्षरगणवृत्तात्मक रचना म्हणतात, त्या रचनेमध्ये अक्षरगणांच्या साहाय्याने लक्षण सांगण्यात येते. संस्कृत छंद:शास्त्रकार पिंगल याने ही पद्धत रूढ केली. श्लोकातील पंक्ती घेऊन तिचे तीन अक्षरी तुकडे पाडून त्या तुकड्यांचे लघुगुरुत्व सांगून हे करण्यात येते. तीन तीन अक्षरांचे लघुगुरुत्व सांगणारे आठच गण होऊ शकतात. त्यांतील आद्य-मध्य-अंत्य अक्षरांच्या लघुगुरुत्वानुसार य-र-त आणि भ-ज-स असे त्या गणांना चिन्ह दिले आहे. सर्व लघुगणास ‘न’ व सर्व गुरुगणास ‘म’ असे म्हणण्यात येते. पंक्तीतील उरलेल्या एक वा दोन अक्षरांचे लगत्व ल-ग या अक्षरांनी दर्शविण्यात येते. याप्रकारे सर्व संस्कृत वृत्तप्रकारांचे लक्षण सांगण्यात येते. संस्कृत छंदःशास्त्राचे हे एक वैशिष्ट्य आहे. तेच मराठी छंदःशास्त्रानेही वृत्तरचनेच्या चर्चेत बऱ्याच प्रमाणात कायम ठेवले आहे. यतिस्थानेही कायम ठेवली आहेत.
मराठीमध्ये जो छंद वा वृत्त यांपैकी कोणत्याच प्रकारात बसू शकत नाही, तथापि तो मुक्तही नाही असा तो अनुष्टुभ् छंद होय. अनुष्टुभ् अष्टाक्षर-नियत आहे, तरी त्यातील अर्ध्या भागात लघुगुरुत्वाचा विचार करावा लागतो, पण अर्ध्या भागात तो तसा करावा लागत नाही, तसेच त्याचे लक्षण मात्रामापनानेही करता येत नाही.
मराठीमधील पद्यरचना इ.स. तेराव्या शतकापासून निश्चितपणे सुरू झाली. कदाचित ती बाराव्या शतकाच्या अखेरीपासूनच सुरू झाली असेल. ओवी हा मराठीमधील आद्य ज्ञात छंद म्हणता येईल, पण तिला अभंगाची जोड लवकरच मिळाली असावी. अभंग हे पुष्कळसे साडेतीन चरणी ओवीवरच आधारलेले असतात. ग्रंथामधून येणारी ओवी बरीच सैल असे, पण स्थूल गेय ओवीप्रमाणेच ती होते. ही छंदोबद्ध रचनाच प्राधान्याने पुढील तीन शतके तरी चालू होती आणि अल्पप्रमाणात का होईना आजपर्यंत चालत आली आहे. मर्ढेकरांसारख्या नवकवीनेही अभंगांचा आश्रय केला होता आणि स्त्रियांची ओवी इंदिरा संत या कवयित्रीनेही योजिलेली आहे. तथापि संस्कृत गणवृत्ते किंवा मात्रावृत्ते महानुभाव कवींना अज्ञात नव्हती पण त्यांचा उपयोग मात्र अल्प प्रमाणातच झालेला आहे. मात्राछंदाचा उपयोग गोंधळ, कोल्हाट, लळित आणि नाट या मुखगत वाङ्मयामध्ये सरसहा होत असे. संस्कृत वृत्ते प्राधान्याने सतराव्या व अठराव्या शतकात पुष्कळ पंडितकवींनी स्वीकारिली आणि ती एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत कवीच्या आत्माविष्काराचे प्रमुख साधन होती. याच काळात अनेक कवींनी केलेली पद्स्वरूप काव्यरचना मात्राछंदांत ग्रंथित झाली आहे आणि ती अलीकडे पर्यंत चालूच आहे. केशवसुतोत्तर काव्यात काही काल मात्रारचनाच प्रधान छंद होती. मुक्तच्छंद झाल्यावर ‘वृत्त’-रचनेप्रमाणे ‘मात्रा’-रचनेलाही ओहोटी लागली. तरीही गेय भावगीतकवितेमध्ये तीच योजिली जात आहे. संस्कृत गणवृत्ते मात्र जवळजवळ नामशेष झाली आहेत.
मराठीने हिंदीपासून ‘दोहा’ ही मात्रारचना अल्पप्रमाणात उचलली. मोरोपंतानी तिचा काही उपयोग केला. केशवसुतांनी त्यांच्या ‘नवीन’ कवितेत तिचा थोडा उपयोग केला आहे, पण तिने फारसे बळ केव्हाच धरिले नाही. फारसी कवितेमधून ‘गझल’ हा वृत्तस्वरूपात घेतला गेला. मोरोपंतांनी अगदी क्वचितच त्याचा उपयोग केलेला असला, तरी त्याचे खरे आगमन गेल्या शतकाच्या अखेरीस काही नाटकांतून शिथिल स्वरूपात झालेले दिसते. १९२० नंतर त्याचा उपयोग छंद म्हणून व काव्य म्हणूनही रविकिरण मंडळाने पुष्कळ प्रमाणात केला. पटवर्धनांचा फारसीशी चांगला परिचय असल्याने त्यांनी याचे अनेक प्रकार शुद्ध स्वरूपात योजून आपली गज्जलाञ्जली सादर केली. ती बरीच कविप्रिय झाली परंतु मुक्तच्छंदापुढे तिचीही पीछेहाट झाली आणि सध्या काही गीतरचनेतच गझलाचा उपयोग होत आहे, ‘भावकविते’त नाही.
संस्कृत कवितेप्रमाणे मराठी कविताही निर्यमक करण्याचा प्रयत्न या शतकाच्या पहिल्या पादात कवी रेंदाळकर यांनी केला आणि तिचे अनुकरण किंचित झालेही. तसेच पहावयाचे तर तसा एक अल्प प्रयत्न गेल्या शतकात घंटय्या नायडू यांनी केला होता. यमकाचा व निर्यमकत्वाचाही विचार छंदोविचारात करण्याचे खरोखर कारण नाही तथापि या प्रयत्नातून पुढे सावरकरांनी लिहिलेल्या निर्यमक—‘वैनायक’—वृत्ताचा जन्म झाला असल्याने त्याचा उल्लेख करणे आवश्यक होते. इंग्रजी ‘ब्लँकव्हर्स’ प्रमाणे मराठीत दीर्घ वा महाकाव्यरचनेस अनुरूप म्हणून या रचनेचा उपयोग करण्यास त्यांनी प्रारंभ केला. तिच्याकरिता त्यांनी ‘धवलचंद्रिका’ या जाति-प्रकाराचाच उपयोग, पण ब्लँक व्हर्सच्या धर्तीवर केला. म्हणजे असे, की सलग द्विपदीत वाक्यार्थ पूर्ण न करिता तो पुढे जसा पूर्ण होईल तसा करावयाचा. त्यातील काव्यखंड हे चार वा अधिक पंक्तींचे असे न ठेवता जेथे खरोखर अर्थदृष्ट्या विराम घ्यावासा वाटेल, तेथे ते पुरे करावयाचे आणि अर्थाच्या ओघाला अडथळा निर्माण करणारे यमक मुळीच योजावयाचे नाही. या प्रकारची रचना काही प्रमाणात ना.ग. जोशी यांनी आपल्या चिंतनपर काव्यांकरिता केली, पण बहुधा त्यानंतर मुक्तच्छंदा (फ्री व्हर्स) चा उदय लौकरच झाल्यामुळे अशी रचना मागे पडली आज तिचा उपयोग काव्यात होत नाही.
प्राचीन कवींत मोरोपंतांसारखा वृत्तप्रभू झाला नाही. इतकी विविध वृत्तेछंद, अक्षरगणावलंबी व मात्राधिष्ठित अशी इतक्या काटेकोरपणे आणि भाषाशुध्दी संभाळून लिहिणारा कवी जुन्या मराठी वाङ्मयात दुसरा कोणीही दिसणार नाही. त्यांची ओवी-अभंगादी रचना थोडीच आहे, पण तीही अत्यंत रेखीव व काटेकोर आहे. अनेक वृत्तांप्रमाणे एकच वृत्त कायम राखून दीर्घ रचना करण्याचे सामर्थ्यही त्यांच्यामध्ये होते. त्यांच्यामुळे मराठीला आर्यावृत्ताची जोड मिळाली, असे म्हणता येईल. अर्वाचीन कवींत माधव जूलिअन यांच्यासंबंधी तितक्या प्रमाणात नसले, तरी बरेच यथार्थपणे तसे म्हणता येईल. त्यांच्यामुळे मराठीत फारसी गझलांचा यथार्थ परिचय झाला. ‘नकुलालंकारा’ मध्ये त्यांनी आपले आर्याप्रभुत्वही सिद्ध करून दाखविले आहे. बाकीच्या कवींची रचना पद्यदृष्ट्या इतकी समृद्ध व निर्दोष म्हणता येणार नाही.
मराठी छंदःशास्त्राचा इतिहास हा फारसा विस्तृत नाही. प्राचीन मराठीत व्यापक व तात्विक विचार करणारा छंदःशास्त्रीय ग्रंथ झालेला नाही. कोठे एखाद्या छंदःप्रकाराचा नावाने उल्लेख (उदा., ओवी, अभंग इ.) व त्याचे काही वर्णन, नामदेवकृत ओवी –अभंग वर्णन,ग्रांथिक ओवीचे भीष्माचार्यकृत (पंधरावे शतक) मार्गप्रभाकरातील वा लक्षधीरकृत (सोळावे शतक) महाराष्ट्र-काव्यदीपिकेतील वर्णन म्हणजे काही छंदःशास्त्रीय पोक्त विचार होऊ शकत नाही. पेशवाईत दैवज्ञ रामजोशी यांनी छंदोमंजरी नावाचे एक प्रकरण लिहिले, तोच काय तो पद्यविचार म्हणून उल्लेखिता येईल पण तोही प्राथमिक स्वरूपाचाच म्हणावा लागेल. नंतर गेल्या शतकात नवनीतकार परशुराम तात्यांनी रचलेले वृत्तदर्पण (१८६०) हेच पुढे पाऊणशे वर्षांत लिहिल्या गेलेल्या वृत्तांवरील पुस्तकांचा आधार आणि पाया होता. त्यांत साहजिकच गणवृत्तांच्याच चर्चेस प्राधान्य होते. ‘जाति’ या पद्यप्रकाराविषयीची त्यांची जाणीव पुसटच होती. तात्विक विचार न करता गणवृत्तांची लक्षणे देणे हेच त्यांचे मुख्य कार्य होते. नंतरच्या पद्यरचना (१८७४ आधी—पाळंदे) ,वृत्तमणिमाला (१८८७—केमकर) ,सद् वृत्तबोध (१८९९—वैद्य) ,वृत्तादर्श (१९०८—गोसावी) ,वृत्तमंजरी (१९२७—पाठक) ,वृत्तप्रकाश (१९२९—वैशंपायन) इ. पुस्तके शालेय विद्यार्थ्यांची गरज भागविणारी झाली. दरम्यान प्रसिद्ध इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी आपला ‘मराठी छंद’हा निबंध प्रकाशित करून छंदोविचार वरच्या पातळीवरून ऐतिहासिक रीत्या व तात्विक दृष्टीने कसा करता येईल, हे दाखवून दिले पण तो ओवी-अभंगादी आरंभीच्या छंदांपुरता मर्यादित होता. १९३७ मध्ये मा. त्र्यं. पटवर्धन यांची मोठी छंदोरचना प्रसिद्ध झाली. तीमध्ये छंदांच्या तीनही वर्गाचे शास्त्रीय पद्धतीने सविस्तर उपपादन केलेले आहे. लयबद्धता हे सर्व पद्यरचनेच्या मुळाशी असणारे तत्त्व आहे, हे त्यांनी प्रथमच सर्व प्रकारच्या पद्यरचनेचा विचार करून प्रामुख्याने प्रतिपादिले आहे. मराठी छंदोविचाराचा खराखुरा आणि शास्त्रीय दृष्ट्या व्यापक असा पायाच त्यांनी घातला, असे म्हणणे युक्त होईल. यात मुक्तच्छंदाचा परामर्श मात्र घेतलेला नाही.
यानंतरचे या क्षेत्रातील महत्वाचे कार्य ना. ग. जोशी यांचे आहे. यांचे मराठी छंदोरचना, मराठी छंदोरचनेचा विकास आणि तुलनात्मक छंदोरचना असे तीन ग्रंथ या विषयासंबंधी आहेत. त्यांनी लयतत्वाचा विचारच पुढे नेऊन पटवर्धनांच्या ग्रंथात याबाबत राहिलेली तालमात्राविचाराचा अभाव यासारखी न्यूने पुरती करुन घेतली आहेत. मुक्तच्छंदादी शिथिल पद्यरचनेबाबत ते तत्व कसे आणि कोठवर लावून दाखविता येईल ते विस्ताराने सांगितले आहे. दुसऱ्या ग्रंथात मराठी छंदोरचनेचा मराठी वाङमयात कसकसा विकास होत गेला त्याचे ऐतिहासिक दर्शन घडविले आहे. तिसऱ्या ग्रंथात मराठीखेरीज इतर पाश्चात्य आणि पौरस्त्य भाषांतील छंदांचा तौलनिक विचार मराठीच्या संदर्भात केला आहे.
जोशी, ना.ग.
इंग्रजी छंदोरचना : छंदःशास्त्र म्हणजे कवीने काव्यामध्ये निर्माण केलेल्या ध्वनिबंधाचे व लयीचे विश्लेषण करणारे शास्त्र. काव्यातील ध्वनिबंध काही प्रमाणात रसिकसापेक्ष असतात. याचा अर्थ असा,की काव्यात पाळले गेलेच पाहिजेत असे काटेकोर नियम छंदःशास्त्र सांगू शकत नाही. इंग्रजी छंदःशास्त्राबदृल हे विशेषत्वाने खरे आहे.
लयीचा विचार मानसशास्त्र, भाषाविज्ञान, ध्वनिविज्ञान अशा अनेकांगांनी करता येतो त्यामुळे लयीचा विचार हा गुंतागुंतीचा व मतभेदांना वाव देणारा होत आला आहे.
ध्वनिबंधाचे विश्लेषण करताना त्याचे घटक ठरविणे, त्या घटकांची वैशिष्ट्ये तपासणे व त्यांची मोजणी करणे या गोष्टी कराव्या लागतात. ध्वनिबंधाचे स्थूल घटक म्हणजे पंक्ती व कडवे. इंग्रजी छंद:शास्त्रात सामान्यत: स्वीकारलेले घटक म्हणजे आघात, पाद, अवयव व वृत्त.
इंग्रजी छंद:शास्त्राच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप केल्यास असे दिसते, की प्रबोधनकाळातील इंग्रजी काव्यविवेचकांनी समकालीन कवितेतील ध्वनिबंधाच्या वस्तुनिष्ठ विश्लेषणाच्या पायावर इंग्रजीचे छंद:शास्त्र निर्माण करण्याऐवजी ग्रीक व लॅटिन छंद:शास्त्राचे सिद्धांत आणि परिभाषा यांची उसनवारी केली. या व्यवस्थेमधील विसंगती व उणिवा अनेक छंद:शास्त्रज्ञांनी वेळोवेळी दाखवून दिल्या असल्या, तरी पारंपरिक इंग्रजी छंद:शास्त्रामध्ये आजही तेच सिद्धांत व परिभाषा यांचा उपयोग केला जातो.
पारंपरिक इंग्रजी छंद:शास्त्र अवयवांच्या ऱ्हस्वदीर्घतेवर आधारलेले आहे. अवयव ऱ्हस्व आहे की दीर्घ हे त्याची उच्चारवैशिष्ट्ये व त्याच्या उच्चारणास (निदान सैद्धांतिक दृष्टिकोनातून) लागणारा काळ यांच्या आधारावर ठरवले जाते. दोन किंवा तीन अवयवांचा पाद होतो. ऱ्हस्व अवयवासाठी ( ) व दीर्घ अवयवासाठी (—) या खुणा वापरून इंग्रजी कवितेतील ध्वनिबंधामध्ये वारंवार आढळणाऱ्या पादांचे दिग्दर्शन खालीलप्रमाणे करता येईल:
आयॅम्बस —
ट्रौकी —
ॲनपीस्ट —
डॅक्टिल —
स्पॉण्डी — —
पिरिक
याशिवाय पादांचे खालील प्रकारही क्वचित आढळतात:
ॲम्फिब्राक —
ट्रायब्राक
मोलोसस — — —
ॲम्फिमॅसर — —
बॅकी — —
ऑण्टीबॅकी ——
ऱ्हस्वदीर्घतेचे (परिमाणाचे) तत्व आणि ऱ्हस्वदीर्घाच्या अनुक्रमावर आधारलेली पादांची रचना या बाबतीत हे छंद:शास्त्र संस्कृत (व संस्कृतमधून मराठीसाठी उसनवार केलेल्या) छंद:शास्त्राचे स्मरण करून देते. इंग्रजी छंद:शास्त्रात ‘वृत्त’ या संज्ञेचे संदर्भानुसार दोन अर्थ होतात : (अ) विशिष्ट पादसंख्या असलेली पंक्ती. उदा., पंचपादवृत्त म्हणजे पाच पाद असलेली पंक्ती (किंवा सर्वसाधारणपणे दहा अवयव असलेली पंक्ती) इंग्रजी छंद:शास्त्रात एकपादवृत्तापासून अष्टपादवृत्तापर्यंतच्या वृत्तांची चर्चा आढळते परंतु षट्पादवृत्तापेक्षा अधिक लांबीची पंक्ती क्वचितच आढळते. (ब) विशिष्ट बांधणी असलेल्या पादाची पुनरावृत्ती बहुसंख्य वेळा करणाऱ्या पंक्ती. उदा., आयॅम्बिक वृत्त, म्हणजे ज्या पंक्तीत आयॅम्बस पादाची पुनरावृत्ती बहुसंख्य वेळा होते, अशी पंक्ती.
ग्रीक व लॅटिनपेक्षा इंग्रजी भाषेची घटना फार भिन्न आहे. ग्रीक व लॅटिनमध्ये विभक्तिप्रत्यय, क्रियापदांची शेकडो रूपे यांच्या साहाय्याने वाक्यरचना होते, तर इंग्रजीमध्ये मुख्यत: शब्दक्रम आणि शब्दयोगी अव्यये यांच्याकडे ही कामगिरी येते. इंग्रजीमध्ये अवयवांच्या ऱ्हस्वदीर्घतेपेक्षा त्यांच्यावर येऊ शकणारा आघात महत्त्वाचा असतो. इंग्रजी भाषेची मुळे जर्मानिक व रोमान्स अशा दोन्ही भाषासमूहांत आढळतात (अँग्लोसॅक्सन आणि केल्टिक यांच्या द्वारा जर्मानिक संस्कार, तर फ्रेंचच्या द्वारा रोमान्स संस्कार). सर्वसाधारपणे जर्मानिक भाषांमध्ये शब्दारंभीच्या अवयवावर आघात असे, तर रोमान्स भाषांमध्ये शब्दअखेरीच्या अवयवावर. या दोन तत्त्वांच्या परस्पर प्रतिक्रियेतून इंग्रजी शब्दातील साघात अवयवांचे स्थान निश्चित झाले. इंग्रजीच्या अशा वेगळ्या घटनावैशिष्ट्यांमुळे ग्रीक-लॅटिनचे छंदःशास्त्र इंग्रजीच्या संदर्भात गैरलागू ठरते. त्यामुळे वेगळ्या तत्त्वांवर इंग्रजी छंद:शास्त्राची उभारणी करण्याचे प्रयत्न सोळाव्या शतकापासूनच सुरू झालेले दिसतात. या प्रयत्नातूनच इंग्रजी छंद:शास्त्रातील विविध प्रणालींचा उदय झाला आहे.
पारंपारिक प्रणालीनंतर लगेच विचारात घ्यावयास हवी अशी प्रणाली म्हणजे ‘आघात’ प्रणाली. काही विवेचक तिला स्वतंत्र प्रणाली मानीत नाहीत. त्यांच्या मते, पारंपरिक आणि ‘आघात’ या दोन्ही प्रणालींचा आलेख प्रणाली या एकाच शीर्षकाखाली विचार करता येतो. ‘आघात’ प्रणाली अवयवांची ऱ्हस्व आणि दीर्घ अशी विभागणी न करता साघात व निराघात अशी विभागणी करते. म्हणजेच ही प्रणाली अवयवांच्या परिमाणापेक्षा (क्वाँटिटी) त्यांच्यावरील आघात हे मूलभूत मानते. लांबी, उच्चनीचता व मुख्यत:श्वासाचा जोर यांवर अवयवावरील आघात अवलंबून असतो. साघात अवयवासाठी ( I ) व निराघात अवयवासाठी (X) या खुणा वापरल्या जातात. पादांची बांधणी व वृत्तप्रकार याबाबतीत ही प्रणाली पारंपरिक प्रणालीतच अनुसरते. मात्र आघात व आघाताचा अभाव अशा दोनच पाणीबंद कप्प्यांमध्ये पंक्तीतील सर्वच अवयवांची विभागणी करणे बहुश: शक्य होत नाही. अशा वेळी दुय्यम, तिय्यम आघातांचीही नोंद घ्यावी लागते. शिक्षणवर्गात व पाठ्यपुस्तकात याच प्रणालीचा उपयोग केला जातो. ती भिन्न भिन्न वाचकांच्या व्यक्तिगत वाचन-वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करून वृत्तबंधावर लक्ष केंद्रित करते.
इंग्रजी छंद:शास्त्राच्या सांगीतिक प्रणालीचा इतिहासही सोळाव्या शतकापासून सुरू होतो. हिच्या पुरस्कर्त्यांच्या मते लयीचा आधार काळ असल्यामुळे छंद:शास्त्राने कालिक बंधातील ध्वनीचे पुनरावर्तन मोजले पाहिजे. म्हणून संगीतातील लयमापनाची परिभाषा व पद्धती या प्रणालीने स्वीकारली. अमेरिकेतील इंग्रजीचे अध्यापक याच प्रणालीचा पुरस्कार करतात. या प्रणालीत प्रत्येक अवयवाला एक स्वर (नोट) बहाल केलेला असतो. अवयव साघात असेल, तर अर्धा स्वर अवयवारील आघात दुय्यम असेल, तर चतुर्थांश स्वर व अवयव निराघात असेल, तर अष्टमांश स्वर मानला जातो. एका साघात अवयवापासून दुसऱ्या साघात अवयवापर्यंतच्या अंतरास एक माप (मेजर) समजले जाते आणि वाचनाची गती३/४ किंवा ३/८ किंवा क्वचित ३/२ मापांनी दाखविली जाते. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिगत जाणिवेवर ती खूप भर देते. गेय पंक्तीच्या बाबतीत ही प्रणाली अत्यंत यशस्वी ठरते, परंतु बोलभाषेतील किंवा वक्तृत्वशैलीतील कवितेबाबत अकार्यक्षम ठरते आणि मुक्तच्छंदाबाबत तर ती पूर्णपणे असहाय ठरते. अतार्किक व्यक्तिगत वाचनाला पूर्ण स्वातंत्र्य देणे आणि ठराविक तालांच्या साहाय्याने सर्व कवींच्या कवितांचे व विविध काव्यघराण्यांचे छांदस् शास्त्रीय वेगळेपण या प्रणालीमुळे धूसर होणे यांचाही या प्रणालीतील उणिवा म्हणून उल्लेख करता येईल परंतु तिने छंद:शास्त्राच्या क्षेत्रात मोकळे वातावरण निर्माण केले, पाठ्यपुस्तकात नसलेल्या वृत्तांचे अस्तित्व दाखवून दिले आणि त्यांच्या साहाय्याने ब्राउनिंग, स्विनबर्न, मेरेडिथ इ. कवींच्या व्यामिश्र वृत्तांचे विश्लेषण केले. या गोष्टी तिच्या उपयुक्ततेची ग्वाही देतात.
इंग्रजी छंदःशास्त्राची तिसरी प्रणाली म्हणजे ध्वनिविज्ञानाच्या साहाय्याने लयीचे विश्लेषण करण्याची पद्धती. ध्वनी मुद्रित करणे व त्याचे छायाचित्रण करणे हे ऑसिलोग्राफसारख्या शास्त्रीय उपकरणांमुळे आता शक्य झाले आहे. उच्चनीचता, परिमाण, स्वरविशेषत्व आणि काळया कवितेतील ध्वनींच्या वैशिष्ट्यांचा ध्वनीची कंप्रता, दोलविस्तार,आकार व अवधी या प्राकृतिक वैशिष्ट्यांशी संबंध असतो, हे दाखविणे शक्य असल्यामुळे त्याबाबत गोंधळ करणे आता कुणालाही शक्य नाही. मात्र छंद:शास्त्राला या पलीकडे जाणे शक्य नाही, असा निष्कर्ष या प्रणालीचे काही पुरस्कर्ते काढतात, परंतु ते अशक्य मानले पाहिजे कारण काही झाले, तरी कवितेतील ध्वनींना त्यांच्या प्राकृतिक गुणधर्माव्यतिरिक्त इतर अनेक अर्थ असतात आणि ध्वनींच्या अवयवांनाही भाषावैज्ञानिक अर्थ असतो.
आतापर्यंतचे आपले विवेचन पंक्ती, तिचे घटक आणि त्यांची रचना यांच्या पुरतेच मर्यादित होते. पंक्तीची मर्यादा ओलांडली की छंद:शास्त्राच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी दिसतात त्यांमध्ये यमक, अनुप्रास आणि स्वरप्रास (ॲसोन्स) हे सहकारी घटक, काउंटरपॉइंट, स्प्रंग, लय व मुक्तच्छंद (फ्री व्हर्स) या छांदस् शास्त्रीय प्रयुक्त्या, पंक्ती ही रचना व कडवे हा आकृतिबंध या दोन टोकांमधील हिरोइक कप्लेट, पोल्टर्स मेझर हे व इतर लांब व छोटे रचनाबंध, ट्रिप्लेट टर्सेट, क्वॉट्रेन, राइम रॉयल, ओतावा रिमा व स्पेन्सेरियन कडवे हे कडव्यांचे विविध प्रकार आणि सॅफिक, रोन्दू, सेस्टिना, सॉनेट, ट्रायलेट, विलनेल व बर्न्स मीटर हे विशेष आकृतिबंध यांचा समावेश होतो.
भाषाविज्ञानाच्या आकृतिवादी (रशियन) प्रणालीने छंदःशास्त्राच्या क्षेत्रात क्रांतिकारी सिध्दांत मांडले आहेत. या प्रणालीला आधारभूत असणाऱ्या व्यूहमानस-शास्त्राच्या निष्कर्षाशी हे सिध्दांत सुसंगत आहेत. कवितेतील लयीच्या मूलभूत घटकाची व्याख्या आतापर्यंतच्या प्रणालींनी चुकीची केली आहे, असा त्यांचा दावा असून पादाऐवजी पंक्ती हाच मूलभूत घटक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रणालीवर आधारलेले छंदःशास्त्र इंग्रजीसाठीही सिद्ध करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
परांजपे, प्र. ना.
संदर्भ : 1. Arnold, E. V. Vedic Metre, Delhi, 1967.
2. Freeman, D.C. Linguistics and Literary Style, New York, 1970.
3. Hamer, Enid, The Metres of English Poetry, London, 1951.
4. Leech, G. N. A Linguistic Guide to English Poetry, London, 1969.
5. Olson, Elder, General Prosody, Chicago, 1938.
6. Saintsbury, Georges, History of English Prosody, London, 1910.
7. Thompson, John,The Founding of English Metre, London, 1961.
८. कात्यायन, सर्वानुक्रमणी, ऑक्सफर्ड, १८८६.
९. जोशी, ना. ग. मराठी छंदोरचना, बडोदे, १९५५.
१०. जोशी, ना. ग. संपा. वृत्तदर्पण, बडोदे, १९६४.
११. पटवर्धन, मा. त्रिं. छंदोरचना, मुंबई, १९३७.
१२. पतंजली, निदानसूत्र, दिल्ली, १९७१.
१३. पिंगल, छंदःसूत्र, कलकत्ता, १८७४.
१४. वेलणकर, ह. दा. संपा. छन्दोSअनुशासन्, मुंबई, १९६१.
१५.वेलणकर, ह. दा. संपा. जयदामन् , मुंबई, १९४९.
१६. व्यास, भोलाशंकर, संपा. प्राकृतपैंगल, वाराणसी, १९५९.
१७. शिंत्रे, शिवरामशास्त्री, संपा. छंदःसूत्र, मुंबई, १९३६.
“