कालविपर्यास : कालबाह्य गोष्टींचा उल्लेख म्हणजेच एखाद्या साहित्यकृतीत इतर प्रसंग घडत असताना जी गोष्ट त्या काळात अस्तित्वात नसते, तिचा उल्लेख करणे.उदा., शेक्सपिअरच्या जूलियस सीझर  ह्या नाटकात घड्याळाचे पडणारे ठोके. सीझरच्या काळी रोममध्ये तशी घड्याळे नव्हती. आधुनिक काळातील वाचकांना अशा चुकांमुळे उद्वेग वाटेल किंवा त्यांची करमणूक होईल. पूर्वीच्या काळी अशा चुकांमुळे वाचकांचा रसभंग होत नसे. यूरोपमध्ये मध्ययुगीन कलावंतांनी येशू ख्रिस्त व त्याच्या कुटुंबियांचे मध्ययुगीन पोषाखात चित्रण केले. चॉसरने ग्रीक व ट्रोजन्स यांना मध्ययुगीन सरदारांप्रमाणे रंगविले. काही वेळा कालविपर्यास हा हेतुतः विनोद निर्माण करण्यासाठी एक वाङ्‌मयीन घटक म्हणून योजितात. उदा., मार्क ट्‌वेनचे ए यॅंकी ॲट द कोर्ट ऑफ किंग ऑर्थर. मुक्तेश्वरकृत महाभारतातही कालविपर्यासाची अनेक स्थळे दिसून येतात. उदा., सभापर्वातील पांडवदिग्विजयामधील राजेलोकांच्या नामावळीत इंग्रज, फिरंगी इ. यूरोपीय लोकांचा उल्लेखराजसूर्य यज्ञातील भोजनविधी व विविध खाद्यपदार्थाचे उल्लेख आणि श्रीकृष्णाने द्रौपदीला पुरविलेल्या वस्त्रांची नावे आणि ती वस्त्रे निर्माण करणाऱ्या प्रमुख पेठा इत्यादींची वर्णने.

मेहता, कुमुद