परिभाषा : कला, क्रीडा, विद्या, विज्ञान, तत्त्वज्ञान वा विशिष्ट व्यवसाय यांना नेहमीच्या दैनंदिन व्यवहारात सामान्यपणे वापरण्यात येणाऱ्या रूढ शब्दांपेक्षा वा चिन्हांपेक्षा, रूढीस बाजूस सारून विशिष्ट अर्थाच्या नवीन शब्दांची वा चिन्हांची गरज भासते असे नवीन अर्थाचे विशिष्ट संकेताने निर्माण केलेले शब्द वा ठरविलेली चिन्हे म्हणजे परिभाषा होय.

दैनंदिन व्यवहारात माणसे एकमेकांना आपले विचार कळविण्याकरिता जी भाषा वापरतात, त्यातील प्रत्येक शब्द विशिष्ट अर्थाचा बोधक असतो. शब्दाने जो  अर्थ दर्शित केलेला असतो, तो अर्थ स्वाभाविक किंवा नैसर्गिक नसतो. रडणे, ओरडणे, हसणे, खेकसणे इ. आवाजांनी जे सूचित होते, ते नैसर्गिक रीतीने सूचित होते म्हणून सर्वच माणसांच्या अशा प्रकारच्या ध्वनिरूप क्रिया हे शब्द नव्हेत. शब्दाला अर्थ सामाजिक संकेताने मिळालेला असतो. भाषा ही माणसाची कृत्रिम सृष्टी आहे. परस्परांच्या मध्ये व्यवहार चालविण्याकरिता जी माणसे एकमेकांच्या संसर्गात दीर्घकाळ स्थिर राहतात ते वर्णात्मक ध्वनींना संकेताने अर्थ प्राप्त करून देतात. जे मानव समुदाय एकमेकांपासून दीर्घकाल दूर राहतात, त्यांच्यातील प्रत्येक समुदायाचे शब्दसंकेत भिन्न असतात. म्हणून त्यांची भाषाही भिन्न होते.

शब्द म्हणजे विशिष्ट अर्थाचा वर्णसमुदाय. सामान्य व्यवहारातील भाषेतील शब्द आणि पारिभाषिक शब्द यांच्यात फरक असतो. सामान्य भाषेतील शब्द किंवा वर्णसमुदाय यालाच नवीन संकेत ठरवून नवा विवक्षित अर्थ निश्चित करणे अथवा याच्यापेक्षा भिन्न शब्दाचा वा वर्णसमुदायाचा नवीन संकेत ठरवून विवक्षित अर्थ निश्चित करणे म्हणजे संकेत होय. तो विशिष्ट शब्द, म्हणजे परिभाषा होय. नूतन संकेत दिलेले शब्द म्हणजे परिभाषा होय, असे भाषिक संदर्भात म्हणता येते. केवळ शब्दच नव्हेत तर विशिष्ट ध्वनी वा चिन्हे वा निवडक रंग, वस्त्र वा अन्य पदार्थांचाही नवीन संकेताने अर्थ निश्चित करण्यात येतो.

विशिष्ट कला, विद्या, शास्त्रे निर्माण होऊ लागली म्हणजे वरील प्रकारची परिभाषा निर्माण करण्याची तज्ञांना गरज पडते. प्राचीन काळी मनुष्य आदिम अवस्थेतून बाहेर पडून कलांची व विद्यांची निर्मिती करू लागला तेव्हापासूनच सामान्य दैनंदिन व्यवहाराच्या भाषेतील निवडक शब्दांना विशिष्ट कलेच्या वा विद्येच्या संदर्भात नवीन अर्थ देऊन तो विचार व्यक्त करू लागला, तेव्हा माणसाची नवीन नवीन संकेत निर्माण करण्याची ही प्रवृत्ती विकसित होऊ लागली. व्याकरण, ज्योतिष, छंद:शास्त्र, काव्यशास्त्र इ. विद्यांची वाढ होऊ लागली त्याबरोबर परिभाषाही वाढू लागली. ज्योतिषशास्त्र हे माणसाचे पहिले विज्ञान होय. माणसाला कृषिकलेचा शोध लागला, त्याकरिता कालज्ञानाची आवश्यकता नितांत भासू लागली. वर्षाऋतूमध्ये शेताची पेरणी आरंभीच करावी लागते आणि पेरणीची तयारी वर्षाऋतूपूर्वीच करावी लागते. पूर्वतयारीकरिता भावी ऋतुकालाचे ज्ञान आवश्यक असते. ऋतुकाल हा आकाशातील चंद्र-सूर्याच्या गतींवरून निश्चित करता येतो. आकाशातील नक्षत्रांच्या स्थानातून सूर्यचंद्राचे भ्रमण चालते. म्हणून स्थिर वाटणारी २७ नक्षत्रे ही सूर्यचंद्राच्या भ्रमणांचे टप्पे म्हणून निरंतर लक्षात ठेवणे भाग पडले. त्या नक्षत्रांचे वाचक शब्द ठरविले ते सामान्य व्यवहारातील भाषेतूनच निवडले उदा., अश्विनी हे नक्षत्राचे नाव आहे. अश्विनी म्हणजे घोडी अश्विनी नक्षत्र घोडीच्या तोंडासारखे दिसते म्हणून अश्विनी म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात विशिष्ट नक्षत्र होय म्हणजे सामान्य व्यवहारातीलच शब्दाला नवीन संकेताने मर्यादित अर्थ दिला. कृत्तिका म्हणजे जनावराचे कातडे. त्या अंथरलेल्या कातड्याप्रमाणेच दिसणाऱ्या तारासमूहाला कृत्तिका हे नाव दिले. आधुनिक भौतिकीमध्ये ‘रिलेटिव्हिटी’ (=’सापेक्षता’) हा शब्द आइन्स्टाइनने विशिष्ट अर्थाच्या संकेताने वापरला. मातापिता, पुत्रपुत्री हे शब्द सापेक्ष आहेत त्यांच्यातील सापेक्षता म्हणजे आइन्स्टाइनची सापेक्षता नव्हे.

शब्दांचा वा वाक्यांचा विस्तार टाळून व संक्षेप करून एकच एक निश्चित अर्थ सांगणे हा परिभाषा करण्याचा उद्देश असतो. शब्दाला वा चिन्हाला (खुणेला) पारिभाषिक अर्थ दिलेला असतो. सामान्य भाषिक व्यवहारातील बहुतेक शब्द हे अनेकार्थी असतात. शब्दाचा नेमका विशिष्ट अर्थ कोणता हे संदर्भावरून ठरते परंतु त्याबद्दलही मतभेद अनेक वेळा होता. मतभेद टाळून निश्चित नेमका अर्थ संक्षेपाने व्यक्त करणे हा उद्देश परिभाषेने साधता येतो. उदा., भौतिकीतील ‘ग्रॅव्हिटेशन’ (‘गुरुत्वाकर्षण’) हा शब्द निश्चितपणे भौतिकीतील मूलभूत सिद्धांत निर्विवादपणे व्यक्त करतो.

दुसरे असे की, विज्ञानात सामान्य लोकभाषेतील शब्द वा पारिभाषिक शब्द वारंवार वापरावे लागतात. पुनरुक्ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून लौकिक व्यवहारातील शब्दांचे अथवा पारिभाषिक शब्दांचे केवळ आद्याक्षर घेऊन निर्देश करतात. उदा., भौतिकी व रसायनशास्त्र यांतील मूलतत्त्वांचा निर्देश आद्याक्षराने करतात. O=ऑक्सिजन, H= हायड्रोजन या अशा आद्याक्षरांचा वापर करून विज्ञानातील सूत्रे तयार होतात. अशी आद्याक्षरांची सूत्रे करण्याची पद्धती अलीकडे मोठमोठ्या औद्योगिक, शैक्षणिक व अन्य सामाजिक संस्थांच्या सगळ्या गुंतागुंतीच्या व्यवहारात अंगीकारली जाऊ लागली आहे.

सामान्यपणे परिभाषा नित्य व्यवहारात वापरत नसतात तो बनविलेला नवीन शब्द असतो. त्याचा अर्थ समजावून सांगावा लागतो त्याची व्याख्या करावी लागते. परिभाषा व व्याख्या यांचा अविभाज्य संबंध असतो व्याख्या करून रूढ अर्थापेक्षा वेगळा नवीन अर्थ सांगावा लागतो. कला, विद्या, शास्त्रे व विज्ञाने यांनी निर्माण केलेले संकेत व्याख्या देऊनच स्पष्ट करावे लागतात. व्याख्येने सांगितलेला अर्थ धरूनच त्या त्या विषयाचे प्रतिपादन लक्षात घेतले तरच तो विषय ध्यानात येऊ शकतो.

अलीकडे शिक्षणाचा प्रसार सामान्यजनांमध्ये होत आहे. आधुनिक, राजकीय, सामाजिक, औद्योगिक संस्था आणि त्यांचे व्यवहार, सामाजिक शास्त्रे व विज्ञान यांच्या नेतृत्वाखाली घडतात. त्यामुळे पारिभाषिक शब्द आणि चिन्हे यांचा वापर सामान्यजनांच्या दैनंदिन व्यवहारात काही प्रमाणात होऊ लागला आहे.

जगातील सर्वच कला, शास्त्रे वा विज्ञाने यांच्यामध्ये सामान्य व्यावहारिक भाषेतील शब्द उचलून त्यांना त्या त्या कलेच्या, विद्येच्या किंवा विज्ञानाच्या संदर्भात विशिष्ट अर्थ दिला जातो. कला, शास्त्र व विज्ञान बदलले म्हणजे अनेक वेळा तोच शब्द त्या त्या कलेच्या, विद्येच्या वा विज्ञानाच्या संदर्भात निराळ्या अर्थाने वापरला जातो. म्हणून परिभाषेचा अर्थ करीत असताना संदर्भ लक्षात ठेवावा लागतो. उदा., पाककलेतला ‘रस’ हा शब्द संस्कृत काव्यशास्त्राच्या संदर्भात निराळा अर्थ बोधित करतो. पाकशास्त्रात त्याचा अर्थ म्हणजे जिभेला समजणारा रस आणि काव्यशास्त्रात मनास पसंत पडणारा, आवडणारा कलेचा गुण.

संस्कृत व्याकरणशास्त्रात ‘अजंत’ आणि ‘हलंत’ हे दोन पारिभाषिक शब्द क्रमाने ज्या शब्दांच्या अखेरीस स्वर व व्यंजने येतात त्यांचे वाचक ठरतात. हे दोन शब्द दैनंदिन भाषेतले नाहीत. संस्कृत व्याकरणशास्त्राने त्यांची व्याख्या किंवा स्पष्टीकरण दिलेले असते. त्यावरून त्यांची वाचकता निश्चित होते. दोन हजार वर्षांपूर्वीच्या भारतीय संस्कृतीत लौकिक भाषेतील शब्द न उचलता नवीन नवीन शेकडो पारिभाषिक शब्द पाणिनीने मुख्यत: निर्माण केले.

गणितशास्त्रात व आधुनिक तर्कशास्त्रात लिखित खुणा या पारिभाषिक अर्थाच्या म्हणून ठरविलेल्या आहेत. बेरीज +, वजाबाकी -, गुणिले ×,  भागिले ÷, बरोबर =, ‘जर……तर’ च्या ऐवजी क &gt ख, इ. दृश्य लिखित खुणा, त्यांचे वाचक शब्द न वापरताही, डोळ्याने पाहिल्याबरोबरच अर्थ सूचित करतात. अशा खुणांचा अपरिमित विस्तार शुद्ध विज्ञानांमध्ये व अनुप्रयुक्त विज्ञानांमध्ये केलेला आढळतो. राष्ट्रे, पंथ, संप्रदाय, जाती, जमाती, देवदेवता इत्यादिकांचे ध्वज, रंग इ. संकेताने ठरलेले असतात तीसुद्धा एक प्रकारची परिभाषाच असते. राष्ट्रांचे ध्वज आणि त्यांच्यावरील रंग, विशिष्ट वेशभूषा अशा तऱ्हेच्या सगळ्या गोष्टी विशिष्ट अर्थाच्या किंवा परिस्थितीच्या दर्शक असतात.

पहा : अर्थशास्त्र गणितीय संकेतने, चिन्हे व संज्ञा.

जोशी, लक्ष्मणशास्त्री.