चौरी : (किररी लॅ. सेरिऑप्स तगल कुल-ऱ्हायझोफोरसी). या लहान झुडपाचा प्रसार भारत, श्रीलंका आणि अमेरिकेशिवाय उष्ण कटिबंधातील इतर प्रदेश इत्यादींतील समुद्रकाठच्या खाऱ्या दलदलीत आहे. तसेच महाराष्ट्रात मुंबईच्या आसपास व कोकणपट्टीत रत्नागिरीतही आहे. याची उंची एक-दोन मी.पर्यंत असून फांद्यांवर देठांचे व उपपर्णांचे वण दिसतात. पाने साधी, संमुख (समोरासमोर), चिवट, लांबट व टोकास गोलसर असून त्यांच्या बगलेत फुलांच्या शाखित वल्लरी जुलै ते सप्टेंबरात येतात. फुले पांढरी व लहान असून संदले व प्रदले प्रत्येकी पाच व केसरदले दहा असतात. त्यांपैकी निम्मी लांब व निम्मी आखूड असतात. किंजपुट अर्धवट अधःस्थ व तीन कप्प्यांचा असून प्रत्येक कप्प्यात दोन बीजके (बीजाची पूर्वावस्था) आढळतात [⟶ फूल ]. फळ साधारण निमुळते आणि लहान असून त्यातील बी झाडावरच रुजते व त्यातून बाहेर येणारे मूळ सु. ३० सेंमी. लांब, टोकाकडे फुगीर व नंतर निमुळते, रेखांकित, कोनीय व पिंगट असते. या झाडाची साल व पाने यांमध्ये टॅनीन भरपूर असते. पानांतील टॅनिनाच्या उपयोगाने कातडे लालसर व चिवट बनते पानांत १५ %, फांदीच्या सालीत २५ % व खोडाच्या सालीत ४१ % टॅनीन असते ६७ % व ७० % टॅनीन असलेले ठोकळे व चूर्ण बनवितात. त्यांचा उपयोग केल्यास कातडे कठीण व विटेसारखे लाल बनते. सालीच्या आतील मऊ भाग व साल यांपासून बनविलेला लाल कात निळीबरोबर किंवा नुसताच वापरून गडद काळा, जांभळा वा पिंगट रंग कातडीस देतात. या झाडाचे लाकूड जड, कठीण व टिकाऊ असल्याने घरबांधणीत वापरतात. नावांचे भाग, जळण व कोळसा बनविण्यासही ते उपयुक्त असते. सर्वच भाग स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारे) असतात. सालीचा काढा रक्तस्रावावर गुणकारी असून आफ्रिकेत पानांचा काढा क्विनिनाऐवजी वापरतात.

पहा : ऱ्हायझोफोरेसी.

नवलकर, भो. सुं.