चोलॉन दक्षिण व्हिएटनाममधील प्रमुख नदीबंदर. लोकसंख्या सु. ४ लक्ष (१९७२). हे महत्त्वाचे व्यापारी आणि निर्मितिउद्योग केंद्र डॉन्गनाय नदीवर सायगावच्या नैर्ऋत्येस सु. ५ किमी.वर वसलेले आहे. फ्रेंचांच्या अंमलाखाली (१८८३—१९५४) याची भरभराट झाली. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानच्या अंमलाखाली आणि नंतर व्हिएटनाम स्वतंत्र झाल्यावरही क्रांतीकाळात याला अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले.

शहरभर कालव्यांचे जाळे पसरलेले असून अनेक उद्योगधंद्यांनी शहर गजबजलेले आहे. त्यावर पौर्वात्य राहणीची छाप स्पष्ट दिसून येते, तर सायगाव मात्र आधुनिक फ्रेंच वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना वाटते. येथील लोकवस्ती बहुतांशी चिनी आहे. सडका, रेल्वे आणि कालवे यांनी चोलॉन सायगावला जोडलेले असून आता ते सायगावचे उपनगरच झाले असून ‘भाताचे कोठार ’ म्हणून याचा उल्लेख केला जातो. येथे भात सडण्याच्या गिरण्या, लाकूड कापण्याच्या गिरण्या, साबणाचे कारखाने वगैरे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर चालत असून मासे सुकविणे,छोट्या बोटी बांधणे आणि व्हार्निश, काचसामान, मातीची भांडी, डबाबंद फळे, विटा इ. उद्योगही चालतात.

कापडी, सुलभा