चोखामेळा :(? — १३३८). एक मराठी संतकवी. स्वतः स तो नामदेवाचा शिष्य म्हणवितो. त्याची पत्नी सोयरा, मुलगा कर्मामेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका. हे सर्वजण एकत्र राहत. विठोबाचे ते सर्वजण परमभक्त होते. पंढरीची वारी चोखामेळ्याने कधीही चुकविली नाही. त्याला त्या वेळच्या ज्ञानेश्वरादी संतमंडळींत फार मानाचे स्थान होते. तो जातीने महार असल्यामुळे, तत्कालीन लोकरीतीनुसार त्याला विठोबाचे दर्शन महाद्वारातूनच घ्यावे लागे.
त्याचे काव्य अनंत भटाने लिहून ठेवले आहे. चोखामेळ्याने अनेक अभंग व पदे लिहिली असून त्याच्या नावावर विवेकदर्पण हे प्रकरणही आढळते. सोयराचे कृष्णचरित्रावर काही अभंग आहेत. बंकाचेही गुरुपरंपरेवरील अभंग आहेत. चोखा आणि सोयरा यांची रचना साधी व रसाळ आहे. चोखामेळ्याच्या अभंगांतून तत्कालीन सामाजिक विषमता, अन्याय व सोवळेओवळे यांबाबतची व्यथा व्यक्त होते.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथील गावकोटाचे काम चालू असता कोट ढासळला आणि त्याखाली चोखा गाडला जाऊन शके १२६०, वैशाख वद्य ५ रोजी निधन पावला. नामदेवाने त्याच्या अस्थी पंढरपुरास विठोबाच्या देवळासमोर मिरवत नेऊन पुरल्या आणि त्यांवर शके १२६०, वैशाख वद्य १३ रोजी समाधी बांधली. ही समाधी नामदेवाच्या पायरीसमोर आहे. चोखामेळ्याच्या समाधीचे दर्शन आधी घेऊन नंतरच विठोबाचे दर्शन घेण्याचा संकेत वारकरी संप्रदायात आजही पाळला जातो.
सुर्वे, भा.ग.
“