चैतन्यभागवत: चैतन्यांच्या जीवनावरील वृंदावनदासविरचित एक बंगाली चरित्रकाव्य. बंगालीत लिहिलेले चैतन्य महाप्रभूंचे हे सर्वांत प्राचीन चरित्रकाव्य आहे. बंगालमधील वैष्णव कवी या ग्रंथाला ‘आदिकाव्य’ म्हणत. प्रथम याचे नाव चैतन्यमंगल  होते, नंतर ते चैतन्यभागवत  असे करण्यात आले आणि आज तेच रूढ आहे. वैष्णवांत भागवतास विशेष आदराचे स्थान असल्यामुळे त्याला चैतन्यभागवत  हे नाव पंथाच्या लोकांनी रूढ केले. चैतन्य महाप्रभू (१४८५—१५३३) हयात असताना ग्रंथलेखनास प्रारंभ झाला आणि महाप्रभूंच्या निर्वाणानंतर १५४० च्या सुमारास तो पुरा झाला असावा, असे अनुमान आहे. चैतन्यांचे पट्टशिष्य नित्यानंद यांच्या प्रोत्साहनाने व आदेशाने आपण हा काव्यग्रंथ लिहिल्याचा वृंदावनदासांनी ग्रंथात वरचेवर उल्लेख केला आहे. वृंदावनास (१५०७ – ?) हे श्रीनिवास यांचे नातू. श्रीनिवासांचे बंधू श्रीवास पंडित हे चैतन्यांचे प्रसिद्ध अनुयायी व थोर वैष्णव होते.

आदी, मध्य व अंत्य अशा तीन खंडांत चैतन्यभागवत  विभागलेले असून प्रत्येक खंडाचे परत अध्याय पाडलेले आहेत. एकूण अध्यायसंख्या बावन्न आणि पदसंख्या २५,००० आहे. हे संपूर्ण काव्य पयार छंदात आहे. मुख्यत्वेकरून नित्यानंदांनी सांगितलेल्या हकीकतींवरून वृंदावनदासांनी हा ग्रंथ रचिला. चैतन्यांच्या अद्वैतादी भक्तांच्या तोंडून ऐकलेल्या काही घटनाही यात समाविष्ट आहेत. आदिखंडात महाप्रभूंचे गयेला प्रयाण, मध्यखंडात त्यांचा संन्यास आणि अंत्यखंडात संन्यासानंतर महाप्रभूंचे नीलाचलावरील वास्तव्य वर्णिलेले आहे.या ग्रंथात चैतन्य महाप्रभूंनी दक्षिण भारताची यात्रा केल्याची व ते वृंदावनास गेल्याची हकीकत नाही. त्यांच्या जीवनाचा पूर्वभाग अतिशय सुंदर रीतीने यात वर्णिला आहे.

श्रीमद्‌भागवताचा आदर्श पुढे ठेवून चैतन्यभागवत  लिहिलेले आहे. चैतन्यलीला आणि कृष्णलीला यांची संगती कवीने भागवतास अनुसरूनच लावली आहे. भागवतातील विभिन्न श्लोक कवीने उद्‌धृत केले आहेत. चैतन्य म्हणजे कृष्णाचा अवतार व चैतन्यलीला म्हणजे कृष्णलीलांचा पुनराभिनय, हे दाखविण्याच्या प्रयत्नात चैतन्यांचे मानवी महत्त्व काही अंशी झाकले गेले आहे तथापि चैतन्य महाप्रभूंचा अधिकृत चरित्रग्रंथ या दृष्टीने चैतन्यभागवताचे श्रेष्ठत्व सर्वमान्य आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकांतील सामाजिक, राजनैतिक आणि लौकिक जीवनावर त्यात चांगला प्रकाश पडत असल्याने चैतन्यभागवताला पंधराव्या-सोळाव्या शतकांचा स्वच्छ आलेख समजतात. गौडीय वैष्णवांत प्रस्तुत ग्रंथास अत्यंत आदराचे स्थान आहे.

सेन, सुकुमार (बं) कमतनूरकर, सरोजिनी (म.)