चेस्टरफील्ड, फिलिप डॉर्मर स्टॅनप: (२२ सप्टेंबर १६९४–२४ मार्च १७७३). विद्याप्रेमी इंग्रज मुत्सद्दी. जन्म लंडन येथे. शिक्षण केंब्रिजला पण तो पदवीधर मात्र झाला नाही. सु. २० वर्षांचा असताना तो पॅरिसला गेला आणि तेथील उमरावी चालीरीतींनी प्रभावित झाला. अभिजनवर्गाच्या तत्कालीन आदर्शांनुसार स्वतःची प्रतिमा घडविण्याकडे त्याने बारकाईने लक्ष पुरविले. इंग्लंडच्या पार्लमेंटचा तो सभासद होता (१७१६ – २६). हेग येथे राजदूत (१७२८–३२), आयर्लंडचा लॉर्ड लेफ्टनंट (१७४५–४६), इंग्लंडचा सेक्रेटरी ऑफ स्टेट (१७४६–४८) ह्यांसारखी पदे त्याने भूषविली.
समकालीन वाङ्मयीन जगाशी त्याने निकटचे संबंध ठेवले होते. अलेक्झांडर पोप, जॉनाथन स्विफ्ट, व्हॉल्तेअर ह्यांच्यासारख्या साहित्यश्रेष्ठींशी आणि विचारवंतांशी त्याचे स्नेहसंबंध होते. सॅम्युएल जॉन्सनने आपला विख्यात इंग्रजी शब्दकोश प्रथम चेस्टरफील्डलाच अर्पण करावयाचे ठरविले होते. तथापि पुढे चेस्टरफील्डकडून आपली उपेक्षा झाली, असे वाटल्यावरून त्याने तो विचार रद्द केला.
आपल्या अनौरस मुलाला लिहिलेल्या पत्रांसाठी चेस्टरफील्ड आज मुख्यतः प्रसिद्ध आहे. शिक्षण व उद्बोधन हे हेतू मनात ठेवून १७३७ पासून जवळजवळ प्रत्येक दिवशी एक, अशी ही पत्रे १७६८ मध्ये त्या मुलाचा मृत्यू होईपर्यंत त्याने लिहिली. जीवनाचे विविध अनुभव व तत्कालीन उच्चभ्रू समाजाच्या चालीरीती ह्यांचे उत्कृष्ट प्रतिबिंब ह्या पत्रांत पडलेले आहे. लंडनमध्ये तो निधन पावला.
संदर्भ : 1. Connely, W. The True Chesterfield, London, 1939.
2. Dobree, Bonamy, Ed. The Letters of Chesterfield, 6 Vols., London, 1932.
3. Shellabarger, S. Lord Chesterfield, London,1935.
देवधर, वा. चिं.
“