चेरी: (इं. वाइल्ड चेरी, स्वीट चेरी, जीन लॅ. प्रूनस ॲव्हियम कुल-रोझेसी). हा पानझडी वृक्ष सु. ५ – २५ मी. उंच वाढतो. यूरोप, अमेरिका, ब्रिटन व वायव्य हिमालयात २,४४० मी. उंचीवर याचा प्रसार आहे काश्मीर, कुलू व सिमला येथे हा लागवडीत आहे. याची साल लालसर तपकिरी असून आडव्या खवल्यांनी ती सुटून निघते. अधश्चर (जमिनीतून निघालेल्या फांद्या) थोडे पाने कोवळेपणी लुसलुशीत, १० – १५ सेंमी. लांब, लोंबती, दंतुर, खालील बाजू केसाळ व देठांवर दोन प्रपिंड (ग्रंथी) असतात उपपर्णे लांबट व भाल्यासारखी फुले पांढरी, बारीक देठाची, चवरीसारख्या फुलोऱ्यात एप्रिल-मे मध्ये येतात. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ लाल किंवा पिवळे, लहान (४ – ६ मिमी.), गोलसर आणि गुळगुळीत, गोड किंवा आंबट (ड्वार्फ चेरी –प्रूनस सेरॅसस), पौष्टिक व स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारे) असते. गोड फळे मुखशुद्धीकरिता आणि आंबट स्वयंपाकात वापरतात. याचे अनेक प्रकार लागवडीत आहेत. जपानमध्ये फुलाबद्दल विशेष प्रसिद्ध असलेले चेरी वृक्ष प्रूनस वंशातील सेऱ्युलॅटा, लॅनेसियाना, सीबोल्डाय, एडोएन्सिस इ. जाती व त्यांचे प्रकार आहेत. या चेरी वृक्षांना एकेरी वा दुहेरी, गुलाबी वा पांढरी फुले येतात.
पहा : रोझेसी
जमदाडे, ज. वि.
या वृक्षाला थंड हवामान लागते व सुपीक, दुमट, निचऱ्याची जमीन लागते. प्रकाराप्रमाणे व जमिनीच्या मगदुराप्रमाणे कलमांची लागण ९–१२ मी. अंतरावर करतात. जंगली चेरीवर गोड चेरीचे कलम करून ते दोन वर्षांनी लागवडीसाठी घेतात. लागवड जानेवारीत करतात. कडक उन्हाचा चटका झाडांना बसणार नाही, अशी व्यवस्था करतात. फारशी छाटणी न करताही झाडे चांगला आकार घेतात, पण विस्तार फार होऊन दाट झाल्यास छाटणी करून तो विरळ करतात. झाडे फार उंच वाढू देत नाहीत. चेरीच्या बागेत गवते लावून त्यांच्यावर मेंढरे चारतात. मेंढरांच्या लेंड्यांमधून झाडांना खत मिळते त्याशिवाय फॉस्फरसयुक्त वरखतही या झाडांना घालतात. चौथ्या-पाचव्या वर्षापासून फळे येऊ लागतात. बहुतेक जागी गोड फळेच खातात. थोड्या प्रमाणात ती हवाबंद डब्यांत भरतात. दर झाडापासून सरासरी ९ ते १८ किग्रॅ. फळे मिळतात. ४० ते ६० वर्षांपर्यंत चांगले उत्पादन चालू राहते.
चौधरी, रा. मो.
चेरीवर कीटक उपद्रव फारसे आढळत नाहीत. या वृक्षाला होणाऱ्या रोगांत पानावर तांबूस जांभळट ठिपके पडणे आणि स्पूडोमोनस मॉर्सप्रूनोरम या सूक्ष्मजंतूंमुळे पानांवर व फळांवर लहान डाग आणि फांद्यांवर व्रण पडणे या दोन रोगांचा समावेश होतो. या दोन्ही रोगांच्या निवारणार्थ ३ : ३ : ५० कसाचे बोर्डो मिश्रण झाडांवर फवारतात.
रुईकर, स. के.
“