चेम्सफर्ड, लॉर्ड फ्रीडरिक जॉन नेपिअर: (१२ ऑगस्ट १८६८ – १ एप्रिल १९३३). हिंदुस्थानचा १९१६ पासून १९२१ या काळातील व्हाइसरॉय. लंडन येथे जन्म. १८९३ मध्ये बॅरिस्टर झाल्यानंतर त्याने काही दिवस क्वीन्सलँड व न्यू साउथ वेल्स येथे गव्हर्नर म्हणून काम केले. पहिल्या जागतिक युद्धात चेम्सफर्ड लष्करातून हिंदुस्थानात आला. १९१६ मध्ये त्याची व्हाइसरॉय म्हणून नेमणूक झाली.

  

चेम्सफर्ड हिंदुस्थानात आला, त्या वेळी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली होमरूल चळवळ चालू होती. त्यांनी साम्राज्यांतर्गत स्वराज्य त्वरित द्यावे, म्हणून मागणी केली होती. ऑगस्ट १९१७ मध्ये भारतमंत्री माँटेग्यू ह्याने हिंदुस्थानला साम्राज्यांतर्गत जबाबदार पद्धतीचे स्वराज्य क्रमाक्रमाने देण्याची घोषणा केली. त्यानंतर, माँटेग्यूने हिंदुस्थानात येऊन चेम्सफर्डबरोबर हिंदुस्थानची पाहणी केली व सुधारणांविषयी चर्चा केली. १९१८ मध्ये या दोघांनी तयार केलेल्या अहवालावरूनच १९१९ चा कायदा करण्यात आला. यालाच माँटफर्ड सुधारणा कायदा वा द्विदल राज्यपद्धतीचा कायदा म्हणतात. १९१९ च्या या कायद्याने केंद्रीय व प्रांतिक सरकारचे क्षेत्र आखून दिले. केंद्रीय कायदेमंडळाची कौन्सिल ऑफ स्टेट व लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या दोन भागांत विभागणी केली. केंद्रीय आणि प्रांतिक खाती अलग करून प्रांतिक कारभारात हिंदी लोकांना थोड्याफार प्रमाणावर जबाबदारीचे स्वराज्य देण्याचे मान्य केले. प्रांतिक कायदेमंडळात सुधारणा करून सभासदांच्या संख्येत वाढ केली. लॉर्ड सिंह याची पहिला गव्हर्नर म्हणून बिहारमध्ये नेमणूक केली. तथापि या सुधारणांमुळे साम्राज्यांतर्गत स्वराज्याची मागणी अपुरीच राहिली. याच वेळी प्लेग, दुष्काळ, महागाई यांमुळे देशात असंतोष धुमसत होता. त्यातच डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्टची मुदत संपल्यामुळे १७ मार्च १९१९ रोजी रौलट कायदा केला. राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी रौलट कायदा केला म्हणून त्या निषेधार्थ महात्मा गांधींनी सर्वत्र सत्याग्रह आणि हरताळाचे सत्र सुरू केले. ही चळवळ दडपण्यासाठी इंग्रजांनी अमृतसर, गुजराणवाला इ. ठिकाणी अमानुष मानवहत्या केली. चेम्सफर्डच्या कारकीर्दीत इंग्रज-अफगाण तिसरे युद्ध झाले. ८ ऑगस्ट १९१९ रोजी त्यांच्यात तह झाला. १९२० मध्ये महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू करून, प्रथमच झालेल्या निवडणुकीवर बहिष्कार घातला. चेम्सफर्डच्या अध्यक्षतेखाली नरेंद्र मंडळाचे ८ फेब्रुवारी १९२१ रोजी उद्‌घाटन झाले. त्यावर व्हाइसरॉयचा अधिकार रहावा म्हणून कायदेशीर बंधने घातली. १९२१ मध्ये चेम्सफर्ड इंग्लंडला परत गेला. 

देवधर, य. ना.