तेरडा : (गौर, गौरीची फुले गु., हिं. गुलमेंदी क. गौरीहू सं. तेर, तेरणा इ. बाल्सम लॅ. इंपॅटिएन्स बाल्समिना कुल–बाल्समिनेसी) सु. ३०–९० सेंमी. उंच, गुळगुळीत काहीशी लवदार, मांसल खोडाची, थोड्या व आखूड फांद्यांची ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी, मुळची भारतातील असून समुद्रसपाटीपासून १,५५० मी. उंचीपर्यंत ती सर्वत्र आढळते. जंगलात झाडाझुडपांच्या खाली भरपूर वाढते. महाराष्ट्रात पश्चिम घाट, कोकण व दख्खनमध्ये सापडते. बागेत शोभेकरिता हिचे अनेक प्रकार लागवडीत आहेत. पाने साधी, एकाआड एक, सु. १५ सेंमी. लांब दातेरी व भाल्यासारखी निमुळती असून देठावर प्रपिंडे (ग्रंथी) असतात. फुले गुलाबी, एकाकी किंवा झुबक्यांनी पानांच्या बगलेत येतात जांभळट, भुरकट, गुलाबी, तांबड्या वा पांढरट फुलांचे प्रकारही असतात. संवर्त शुंडिकायुक्त (लहान सोंडेसारखा नळी असलेला) असतो. बोंडे सु. एक सेंमी. जाडीची व लवदार असून पूर्णावस्थेत धक्का लागल्यास त्वरित तडकून बिया आसपास फेकल्या जातात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे व फुलांची संरचना तेरडा कुलात [→ बाल्समिनेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. तेरड्याच्या वंशातील सु. १५० जाती भारतात आढळतात.
तेरड्याच्या कॉक्सिनिया या लॅटिन नावाच्वा प्रकारात पाने अधिक दातेरी व फुले मध्यम आकारमानाची असतात हा प्रकार महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात ह्या प्रदेशांत सर्वत्र आढळतो. ब्रेव्हिकॅलकॅराटा या नावाच्या प्रकारात पाने मूळच्या तेरड्यासारखी पण फुले बरीच लहान असतात.
लागवड रोपे लावून करतात. बी मे महिन्यात पेरून रोपे तयार करतात ती ८–१० सेंमी. उंच झाल्यावर बागेत जमीन खणून खत घालून तयार केलेल्या वाफ्यांत किंवा सरीच्या पट्ट्यावर १५–२० सेंमी. अंतराने मे–जूनमध्ये लावतात. त्यांना जुलै–ऑगस्टमध्ये फुले येतात.
फुले शीतक (थंडावा देणारी) व पौष्टिक असून भाजलेल्या आणि पोळलेल्या जागी लावतात. ही वनस्पती सांधेदुखीवर उपयुक्त असून वांतिकारक, विरेचक (पोट साफ करणारी) आणि मूत्रल (लघवी साफ करणारी) म्हणून पोटात घेतात. बियांपासून २७% हिरवट, चिकट खाद्य तेल निघते ते स्वयंपाकात व दिव्याकरिता वापरतात. बाली बेटात पाने खातात. मेंदीप्रमाणे फुला–पानांनी नखे रंगवितात. फिलिपिन्समध्ये कटिशूलावर फुले वापरतात. चीनमध्ये बियांचे चूर्ण सुलभ प्रसुतीकरिता देतात. भारतात हिंदु लोक गौरीगणपतीच्या सणादिवशी पूजेकरिता तेरड्याची फुले व पत्री वापरतात.
पहा : जिरॅनिएलीझ बाल्समिनेसी.
जमदाडे, ज. वि. चौधरी, रा. मो.
“