तिमि : (डेल्फिनस, जॉब्स कफीन). उत्तर खगोलार्धातील एक लहानसा तारकासमूह. हा समूह उच्चैःश्रवा आणि गरुड या तारकासमूहांच्या मधल्या भागात दिसतो. डेल्फिनस (डॉल्फिन) या नावाला सदृश्य तिमी हे नाव या समूहाला देण्यात आले आहे. हा तारकासमूह टॉलेमी यांनी शोधून काढला. होरा २० ता. ते २२ ता. आणि क्रांती १° ते १०° [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] या चौकोनात या समूहाचे स्थान आहे. यात ⇨ धनिष्ठा हे भारतीय नक्षत्र आहे.
अँफिट्राइटी या ग्रीक देवतेने अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती परंतु डेल्फिनस या मत्स्यराजाने तिचे मन वळवून तिला विवाहास उद्युक्त केले म्हणून नेपच्यूनने याला आकाशात स्थान दिले, अशी डेल्फिनस या नावासंबंधी कथा आहे.
ठाकूर, अ. ना.