धमासा : (हिं. दमहर, धन्वयास, हिंगुण गु. धमासो सं. दुस्पर्शा, अजाभक्ष्य, धन्व इं. क्रेटन, प्रिकली क्लोव्हर, लॅ. फॅगोनिया क्रेटिका, फॅ. अरॅबिका, कुल झायगोफायलेसी) हे लहान, कठीण, काटेरी झुडूप
शेतात तण म्हणून भारतात बहुतेक सर्वत्र व वायव्येकडील देशांत आणि भूमध्यसामुद्रिक प्रदेशात आढळते. सर्व शरीरावर प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) केस असतात. पाने समोरासमोर, संयुक्त, लहान, १–३ दलांची दले रेखाकृती व टोकदार, मधले दल मोठे आणि बिनदेठाचे तीक्ष्ण व लहान उपपर्णी काट्यांच्या दोन जोड्या असून त्यांमधून एकाकी, लहान, गुलाबी फुले ऑक्टोबर–डिसेंबरात येतात. बोंडावर प्रपिंडयुक्त केस असून तडकल्यावर त्याच्या पाच एकबीजी कुड्या होतात बी लंबगोल, सपाट व गुळगुळीत असते इतर सामान्य लक्षणे ⇨ झायगोफायलेसी (गोक्षुर कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
ही वनस्पती प्रशीतक (थंडावा देणारी), कडू, स्तंभक (आकुंचन करणारी) व शक्तिवर्धक आणि ज्वरनाशक असून तिच्या खोडाचा व पानांचा फांट (पाण्यात भिजवून काढलेला रस) तापात तहान शमविण्यास, जलशोथात (पाणी साचून आलेल्या दाहयुक्त सुजेत), तापात उन्माद वायू झाला असता, विषबाधा व ओकारीवर ५० ते १०० मिली. देतात. त्वचेची आग व खाज होत असल्यास ह्या फांटाने अंग पुसल्यास ती बरीच कमी होते. गुल्म (गाठी) व गलगंडाच्या सुजेवर लेप लावतात हि वनस्पती जंतुनाशक असल्याने तिच्या काढ्याने जखमा धुतात मुखरोगांवर गुळण्यांकरिता हा काढा वापरतात. लहान मुलास देवी आल्यास फांट देतात. खोकला झाल्यावर याचे धूम्रपान करतात. उन्हाळ्यात या झाडावर ‘तुरंबीन’ नावाची साखर येते. ती रेचक आहे. अरबस्तानातून ही साखर भारतात आणतात. हि वनस्पती सारक, आरोग्य पुनःस्थापक व उत्तेजक असल्याने तिचा ‘कुमारी आसवा’त वापर करतात. लहान काड्या दात घासण्यास ब्रशाप्रमाणे वापरतात साल कंडू, खरुज, खाज इत्यादिंवर गुणकारी असते. सुश्रुतसंहितेत ‘धन्वन’ या नावाने या वनस्पतींचा उल्लेख आला आहे.
जमदाडे, ज. वि.
“