तिराना : आग्नेय यूरोपातील अल्बेनिया देशाची व त्याच्या तिराना प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,७१,३०० (१९७० अंदाज). हे एड्रिॲटिक समुद्रावरील डर्रेस बंदरापासून २७ किमी. ईशम नदीवर सुपीक मैदानात वसलेले आहे. सतराव्या शतकात तुर्की सेनापती सुलेमान पाशा याने हे वसविले. प्रथम याचे नाव तेहरान होते. १९२० मध्ये अल्बेनियाची राजधानी झाल्यावर सोव्हिएट व चिनी मदतीने त्याचा वेगाने विकास झाला. आता हे देशातील सर्वांत मोठे शहर व महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. येथे कापड, सिगारेट, पादत्राणे, साबण, मद्यार्क, लाकूड सामान, लोणी, चीज यांचे उत्पादन होते. येथे धातुकाम होते व जवळच कोळशाच्या खाणी आहेत. शहरातील स्कँडरबेग चौक प्रशस्त असून त्याभोवती शासकीय इमारती, प्रमुख मशीद, विद्यापीठ इ. वास्तू आहेत. येथे चार संग्रहालये, राष्ट्रीय लोककलासंस्था, राष्ट्रीय नाट्यगृह, सभागृह इ. असून शिक्षक व कृषिमहाविद्यालये आणि संगीत व कला विद्यालये आहेत. येथून लाक, एल्बासान, डुर्रेस यांकडे लोहमार्ग आणि महामार्ग जातात. आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे. येथील बहुसंख्य लोक मुस्लिम आहेत. १९३९ ते ४४ हे इटालियन व जर्मन सैन्यांच्या ताब्यात होते.
लिमये, दि. ह.