द्रोणाचार्य : कौरव–पांडवांचे धनुर्विद्येतील गुरू व भारतीय युद्धातील कौरवांचे एक सेनापती. त्याचे वडील भरद्वाज. भरद्वाज गंगेवर स्नानास गेले असता रूपयौवनसंपन्न घृताचीनामक अप्सरेला पाहून त्यांचे वीर्यस्खलन झाले. ते वीर्य द्रोणात ठेवले व त्यापासून द्रोणाचार्यांची उत्पत्ती झाली अशी कथा आहे. यावरून त्यांना द्रोण हे नाव मिळाले. द्रोणांनी पित्यापासून वेदविद्या, धनुर्विद्या व परशुरामापासून अस्त्रविद्या संपादन केली. शरद्वानाची कन्या कृपा ही द्रोणांची पत्नी आणि अश्वत्थामा हा मुलगा. द्रोणाचार्य धनाच्या इच्छेने आपला गुरूबंधू द्रुपदाकडे गेले असता, त्याने त्यांचा अपमान केला. त्याचा बदला द्रोणांनी पुढे अर्जुनाकडून घेतला. सर्व कौरव पांडव राजपुत्रांना धनुर्विद्यादिकांत त्यांनी निष्णात केले. भीम व दुर्योधन यांना गदायुद्ध व मुष्टियुद्ध, अर्जुनाला धनुर्विद्या, युधिष्टिराला रथयुद्ध व नकुलसहदेवांना क्षेत्ररक्षण शिकविले. एकलव्य या शबरीपुत्रास त्यांनी विद्या शिकविली नाही, तरी त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा करून विद्या संपादन केली व तो त्या विद्येत अर्जुनापेक्षाही पारंगत झाला. द्रोणांनी गुरूदक्षिणा म्हणून त्याला उजव्या हाताचा अंगठा मागितला. त्याने तात्काळ तो दिला (महाभारत, आदिपर्व). अर्जुन हा त्यांचा आवडता शिष्य असता त्यांनी युद्धात कौरवांचा पक्ष का स्वीकारला, हा एक प्रश्न आहे. युद्धात प्रारंभी युधिष्ठिर द्रोणाकडे गेले असता ते म्हणाले, कौरवांनी द्रव्याने मला बांधले आहे. मनुष्य हा द्रव्याचा दास आहे. कृष्ण तुमच्या बाजूस आहे. तुमचा विजय होईल. अयोग्य शब्द माझ्या कानावर येतील, तेव्हा मी शस्त्रत्याग करीन. नंतर तुम्ही मला मारा (महाभारत, भीष्मपर्व, ४३). भारतीय युद्धात भीष्मानंतर अकराव्या दिवशी द्रोणांकडे सेनापतिपद आले. द्रोणांनी द्रुपदास युद्धात ठार केले. पंधराव्या दिवशी इंद्रवर्मा राजाचा ‘अश्वत्थामा’ नावाचा हत्ती मरण पावला असता कृष्णाने भीमाकडून ‘अश्वत्थामा’ मरण पावला अशी गर्जना करविली. युधिष्ठिरानेही या गोष्टीस संमती दिली . तेव्हा द्रोण हताश झाले आणि त्यांनी शस्त्र भूमीवर ठेवले. योगधारणेने प्राणोत्क्रमण करीत असताना द्रुपदाचा पुत्र दृष्टद्युम्न याने त्यांचा वध केला (महाभारत, १९२–४३) अंगी सामर्थ्य असूनही साहस व स्वाभिमानाच्या अभावामुळे त्यांचे सर्व आयुष्य अगतिक व शोचनीय झाल्याचे दिसते. मृत्युसमयीचे त्यांचे वय महाभारतातील वर्णनावरून ८०–८५ वषे असावे असे दिसते. मृत्यूनंतर ते स्वर्गलोकात गेले व बृहस्पतिपदास पोहोचले (महाभारत, आदिपर्व, ६७).

जोशी, रंगनाथशास्त्री