द्राविडी भाषासमूह : भारतातील चार प्रमुख भाषा समूहांत द्राविडी भाषासमूह हा लोकसंख्येच्या मानाने दुसरा आहे. १९६१ सालातील खानेसुमारी प्रमाणे त्याच्या भाषिकांची संख्या १०,७४,१०,८२० असून ती एकंदर लोकसंख्येच्या २४·४७% म्हणजे जवळजवळ एक चतुर्थांश होती.
या भाषासमूहातूत १९६१ च्या पहाणीप्रमाणे पुढील भाषिक गट व भाषा आहेत :
(१) दक्षिणेकडील द्राविडी : तमिळ, मलयाळम्, तोडा, कोडा, कन्नड, बडगा, कोडगू, तुळू, तेलुगू.
(२) मध्य द्राविडी : कुई, कुवी, खोंड, कोलामी, कोंडा, नायकी, परजी, कोया, ओल्लारी, सालूर, गोंडी (तेलुगू).
(३) उत्तरेकडील द्राविडी : कुरुख, माल्तो, ब्राहुई.
वरील भाषांपैकी फक्त ब्राहुई ही भारताबाहेर बलुचिस्तानच्या प्रदेशात बोलली जाते.
तमिळ, मलयाळम, कन्नड व तेलुगू या संपन्न साहित्यिक भाषा असून त्यांची लिखित परंपरा काही बाबतींत नव इंडो-आयर्न भाषांपेक्षाही प्राचीन आहे.
भाषिक पूर्वपीठिका : इंडो-आयर्नप्रमाणे द्रविडी भाषाही मुळात भारतीय नसून बाहेरून आलेल्या आहेत, असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. मात्र ही घटना इंडो-आयर्नच्या आगमनापूर्वी १,००० ते २,००० वर्षांची असावी. पूर्वी या भाषांचे व्याप्तिक्षेत्र भारताचा अतिपूर्वेकडील भाग सोडल्यास बाकी सर्वत्र होते, असे अनुमान करता येते. इंडो-आयर्नच्या आक्रमणापुढे माघार घ्यावी लागल्यामुळे त्यांना आजचे क्षेत्र व्यापावे लागले. काही भाषिक गट स्थैर्य प्राप्त झाल्यामुळे भरभराटीला आले, तर बऱ्याच जमाती उत्तरेकडे असलेल्या डोंगराळ प्रदेशाचा आश्रय करून राहिल्या. ब्राहुईसारखा द्रविडभाषिक गट आजही बलुचिस्तानात आढळतो, याचे कारण या माघारीच्या धामधुमीतही तो तिथेच राहिला हे असावे.
याउलट दक्षिणेतील द्रविडभाषिकांचा एक गट काही शतकांपूर्वी उत्तरेकडे जाऊन तिथे स्थायिक झाला असावा, असेही काही विद्वानांचे म्हणणे आहे.
तमिळ, मलयाळम्, कन्नड व तेलुगू या संपन्न भाषांच्या महत्त्वाच्या पोटभाषा आहेत आणि त्यांच्या आसपास काही दुय्य्म दर्जाच्या भाषाही आहेत. तमिळच्या येरूकाला, कैकाडी व कोरावा, मलयाळम्च्या येरावा व पानिया कन्नडच्या बडगा, कुरुबा, होलिया व कोराच्या आणि तेलुगूच्या वडारी व गोलारी या बोली लक्षात घेण्यासारख्या आहेत.
कन्नडच्या परिसरात असलेल्या कोडगू (कुर्गी) व तुळू या स्वतंत्र भाषाच आहेत.
अनेक द्राविडी भाषा डोंगराळ प्रदेशात बोलल्या जात असल्यामुळे अज्ञात किंवा दुर्लक्षित होत्या. त्यात सर्वांत महत्त्वाच्या गोंडी व कुरुख या असून त्यांच्या भाषिकांची संख्या प्रत्येकी दहा लाखांच्या वर आहे. गोंडीचे आजचे व्याप्तिक्षेत्र पाहिल्यास तीही पूर्वी एक फार महत्त्वाची भाषा असली पाहिजे, असे जाणवते. कुई भाषिकांची संख्या पाच लाखांवर असून परजी, कोलामी, खोंड इ. भाषाही संख्येच्या दृष्टीने उपेक्षणीय नाहीत.
द्राविडचे संशोधन : बिशप रॉबर्ट कॉल्डवेल यांच्या कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ द द्राविडीयन ऑर साउथ इंडियन फॅमिली ऑफ लॅँग्वेजीस (१८५६) या ग्रंथाने द्राविडच्या संशोधनाचा पाया घातला गेला, असे म्हणता येते. हे संशोधन आर्यभाषांच्या अभ्यासाला मार्गदर्शक ठरले, कारण त्या भाषांच्या शास्त्रीय अभ्यासाची प्रेरणा आपल्याला कॉल्डवेल यांच्या ग्रंथाने मिळाली, असे जॉन बीम्स यांचे म्हणणे आहे.
द्राविड भाषांचा तौलनिक कोश होणे इष्ट आहे, असे कॉल्डवेल यांचे म्हणणे होते. किट्टेल यांच्या कन्नड कोशाने त्यांची ही इच्छा अंशतः पूर्ण केली असली, तरी अलीकडील काळात बरो, एमनो आणि काही प्रसिद्ध द्राविड भाषाशास्त्रज्ञ यांच्या प्रयत्नामुळे ती अधिक मूर्त स्वरूपात येते आहे.
लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियाचा चौथा खंड (१९०६) मुंडा व द्राविडी भाषांसंबंधीचा आहे, फ्रेंच भाषापंडित झ्यूल ब्लॉक यांनी द्राविडसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले असून, कोएन व मेये यांच्या Lee langues du monde या जागतिक भाषांवरील ग्रंथात (पहिली आवृ. १९२४) त्यांनी या भाषासमूहाची माहिती दिली आहे. १९४६ मध्ये त्यांचा द्राविड भाषांचा व्याकरणपद्धतीवरील ग्रंथ प्रसिद्ध झाला.
द्रविड भाषांचे वैशिष्ट्य : व्याकरणदृष्ट्या असणारे शब्दांतील फरक प्रत्ययांच्या साधनाने व्यक्त करणे, हे या भाषांचे वैशिष्ट्य आहे, इतके की सर्व रूपप्रक्रिया केवळ प्रत्ययांवर अवलंबून आहे. हे प्रत्यय म्हणजे साधित शब्द बनविण्यासाठी शब्दानंतर येणारे ध्वनिरूप साधन होय. त्याचप्रमाणे ते नाम, धातू इत्यादींनंतर येणारे आणि त्यांचे वाक्यातील कार्य व इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणारे साधनही आहे.
सर्वसाधारणपणे या प्रत्ययांचे ध्वनिरूप आधी आलेल्या शब्दाशी एकजीव होणार नाही, अशी ध्वनिप्रक्रियेची प्रवृत्ती असल्यामुळे शब्दाची घडन स्पष्ट दिसते व त्यामुळे रूपप्रक्रिया व व्याकणाची नियमबद्धताही जाणवते.
पृथक्करणाच्या आधारे केलेले संशोधन असे दाखविते, की या भाषांत नाम व धातू हा भेद मुळात नसावा.
केवळ ध्वनिविचाराच्या दृष्टीने पाहिले तर आर्यभाषा, विशेषतः आर्यभाषांची प्राकृत अवस्था आणि मूळ द्राविडशी बऱ्याच अंशी प्रमाणिक असलेली जुनी तमिळ यांच्यातील दुवा दिसून येतो. शब्दारंभी एक व्यंजन+ एक स्वर, अंत्यस्थानी स्वर, मध्यस्थानी स्वर + व्यजंनयुग्म + स्वर किंवा स्वर + सघोष व्यंजन + स्वर ही सर्व व्यवस्था दोन्ही भाषांत आहे. इंडो-यूरोपीयनमध्ये नसलेले पण संस्कृतमध्ये आलेले मूर्धन्य वर्ण द्राविडमध्ये प्रामुख्याने आहेत, म्हणजे या वर्णाच्या बाबतीत आधी द्राविडी भाषांचा प्रभाव संस्कृतवर पडला व प्राकृत अवस्थेपर्यंत तो वाढतच राहिला, असे म्हणावे लागते.
प्रत्ययप्रधान रूपप्रक्रिया हेही डंडो-आयर्न भाषांचे महत्त्वाचे अंग होऊ लागले आहे. उपसर्गाचे महत्त्व जवळजवळ नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे. केवळ सवयीमुळे व अनुकरणाच्या प्रवृत्तीमुळेच ते काही प्रमाणात टिकून आहेत.
या सर्व कारणांनी आज इंडो-आर्यन भाषांनी व्यापलेले क्षेत्र त्यांच्या आगमनापूर्वी कित्येक शतके द्राविड भाषिक होते, हा मुद्दा विचारार्ह ठरतो.
संदर्भ : 1. Bloch, Jules, Structure grammaticale des languages dravidiennes, Paris, 1946.
2. Cohen, Marcel Meillet, Antoine, Les langues du monde, Paris, 1952.
3. Government of India, Census of India, 1961, vol.1, Part ll-c (ii), Language Tables, Delhi, 1964.
कालेलकर, ना. गो.
“