द्रवणक्रांतिक : (युटेक्टिक). दोन पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणांत एकमेकांत मिसळून बनणाऱ्या, मिश्रणाचा गोठण बिंदू (वितळबिंदू) घटक पदार्थांच्या प्रमाणनुसार बदलत जातो. यांपैकी एका ठराविक प्रमाणाला मिश्रणाचा गोठण बिंदू नीच असतो. या तापमानाला सर्व मिश्रण घनरूप असते. या वेळी त्यातील घटक पदार्थांचे प्रमाण हे त्याच तापमानाला द्रवरूप असताना असलेल्या प्रमाणाएवढेच असते. अशा नीच गोठण बिंदूला एफ्. गथ्री यांनी १८८४ मध्ये ‘क्रायोहायड्रेट बिंदू’ हे नाव दिले. पुढे त्याला युटेक्टिक (द्रवणक्रांतिक) असे म्हणण्यात येऊ लागले. याचा सर्वप्रथम अभ्यास एफ्. रुडॉर्फ यांनी १८६४ मध्ये केला. ज्या तापमानाला मिश्रणाचा नीच गोठण बिंदू येतो, त्याला ‘द्रवणक्रांतिक तापमान’ असे म्हणतात व या वेळी तयार होणाऱ्या मिश्रणास ‘द्रवणक्रांतिक मिश्रण’ असे म्हणतात. सामान्यतः द्रवणक्रांतिक तापमान हे मिश्रणाच्या घटक पदार्थांच्या गोठण बिंदूपेक्षा कमी असते.
द्रवणक्रांतिक मिश्रण दोन घटक पदार्थांचे असल्यास त्याला द्विघटकी, तीन घटकांचे असल्यास त्रिघटकी व चार घटक असल्यास चतुर्घटकी द्रवणक्रांतिक असे म्हणतात. या सर्वांचा अभ्यास करण्यात आला आहे.
‘अ’ आणि ‘आ’ या दोन पदार्थांचे द्रवणक्रांतिक मिश्रण तयार करावयाचे झाल्यास प्रथम घटक पदार्थांचे शुद्ध स्वरूपातील गोठण बिंदू काढतात (त, थ). त्याचप्रमाणे त्यांच्या विविध प्रमाणांच्या मिश्रणांचे गोठण बिंदू काढतात. हे विविध बिंदू व घटकांचे प्रमाण यांचा आलेख तयार करतात. या आलेखातील ज्या तापमानास आलेखाची दिशा बदलते त्या तापमानास (द) द्रवणक्रांतिक तापमान असे म्हणतात आणि या वेळी होणाऱ्या मिश्रणास द्रवणक्रांतिक मिश्रण असे म्हणतात. अशा आलेखांचा उपयोग ⇨ मिश्रधातू बनविण्यासाठी करण्यात येतो.
काही साध्या द्रवणक्रांतिक मिश्रणांचे गोठण बिंदू तसेच त्यांच्या घटकांचे गोठण बिंदू खालील कोष्टकात दिले आहेत.
काही द्रवणक्रांतिक मिश्रणांचे व त्यांच्या घटकांचे गोठणबिंदू
घटक (अ) |
गोठणबिंदू ( ° से.) |
घटक (आ) |
गोठणबिंदू ( ° से.) |
द्रवणक्रांतिक मिश्रणाचा गोठणबिंदू ( ° से.) |
अँटिमनी सिलिकॉन बिस्मथ पोटॅशियम क्लोराइड आल्फा सोडियम सल्फेट ऑर्थो नायट्रोफिनॉल बेंझीन |
६३० १,४१२ ३१७ ७९० ८८१ ४४·१ ५·४ |
शिसे ॲल्युमिनियम कॅडमियम सिल्व्हर क्लोराइड सोडियम क्लोराइड पॅरा टोल्युइडीन मिथिल क्लोराइड |
३२६ ६५७ २६८ ४५१ ७९७ ४३·३ ६३·५ |
२४६ ५७८ १४६ ३०६ ६२३ १५·६ – ७९·० |
पहा : प्रावस्था नियम.
संदर्भ : 1. Glasstone, S. Text book of Physical Chemistry, London, 1964.
2. Parks, G. D., Ed. Mellor’s Modern Inorganic Chemistry, London, 1961.
कारेकर, न. वि.
“