विल्यम्स टाउन : ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यातील महानगरीय मेलबर्नचे नैर्ऋत्येकडील उपनगर, प्रमुख बंदर व एक औद्योगिक केंद्र. लोकसंख्या २५,५५४ (१९८१). १८३५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या नगराचे १९१९ मध्ये शहरात रूपांतर झाले. देशाच्या आग्नेlय किनाऱ्यावर पोर्ट फिलीप उपसागराच्या शिरोभागी हे शहर वसलेले आहे. किंग विल्यम चौथा याच्या स्मणार्थ शहराला विल्यम्सटाउन हे नाव देण्यात आले. शहरात तेलशुद्धीकरण, खाद्यपदार्थ प्रक्रिया, पीठ गिरण्या, डबाबांदीकरण, वस्त्रोद्योग, रसायने व काच-उत्पादने हे उद्योगधंदे चालतात. येथे रेल्वे कर्मशाळा व नौसेना भांडार आहे. बंदरात जहाजबांधणी व दुरुस्तीच्या तसेच माल चढउताराच्या अनेक सुविधा आहेत.

चौधरी, वसंत