द्यनां, झां आंरी: ( ८ मे १८२८-३० ऑक्टोबर १९१०). स्वीस आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेचा संस्थापक व नोबेल शांतता पारितोषिकाचा पहिला मानकरी. जिनीव्हा येथे जन्म. सुरुवातीपासून तो इव्हँजेलिकल गटात होता. त्याने ‘यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन’ स्थापन केली. १८५९ मध्ये सॉलफेरीनॉच्या युद्धातील मनुष्यहानी पाहून त्याचे अंतःकरण द्रवले. जखमी सैनिकांच्या शुश्रूषाकार्यात त्याने भाग घेतला व त्या अनुभवावर Unsouvenir de Solferino हे पुस्तक लिहिले ( १८६२). पुढे या पुस्तकाचे इंग्रजीत मेमरी ऑफ सॉलफेरीनॉ या शीर्षकाने भाषांतरही झाले. या पुस्तकात त्याने युद्धभूमीवर जखमी झालेल्यांची शुश्रूषा मानवतावादी दृष्टीकोनातून व निःपक्षपातीपणे झाली पाहिजे, असे मत प्रतिपादन केले. त्याच्या प्रयत्नांमुळे एक समिती स्थापन झाली. तिचेच पुढे आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समितीत रूपांतर करण्यात आले ( १९३६). यामुळे १८६४ चा जिनीव्हा करार जन्मास आला. हाच कदाचित शांततेचा पहिला तह म्हणावा लागेल. पुढे तो पॅरिस येथे गेला. १८७०-७१ च्या फ्रँको-प्रशियन युद्धात त्याने जखमींची शुश्रूष केली. त्या वेळेपासून रेडक्रॉस चळवळ आधिक प्रसिद्धीस आली. १८७१ मध्ये त्याने युद्ध टाळण्याकरिता आंतताष्ट्रीय न्यायालयाने मध्यस्थी करावी आणि स्नेहभाव निर्माण करावा असे सुचविले पण त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. मात्र त्याच्या या कार्यामुळे त्याचे धंद्यातील लक्ष उडाले. आणि तो बेकार झाला. तेव्हा तो १८९५ पर्यत भटकत होता. पुढे एका वृत्तपत्रकाराला तो आढळला. जागतिक ऐक्यसाठी च्याने अनेक देशांशी पत्रव्यवहार केला.१८९९- १९०७ च्या हेग परिषदांचे सर्व श्रेय त्याला देण्यात येते. त्याच्या कार्याबद्दल १९०१ मध्ये फ्रेदेरिक याच्यासमवेत त्याला पहिले नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. याशिवाय त्यास अनेक पदके व मानसन्मान मिळाले. अखेरपर्यत तो युद्धातील जखमींना मदत करीत असे. गुलामगिरीविरूद्ध तसेच जागतिक निःशस्त्रीकरणाकरिता तो अखेरपर्यंत झटला. हायडन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ:1. Hart, Eilen, Non Bom to Live, London, 1953.2. Rich y3wuoephine, Jean Henri Dunant, Founder of the International Redcross, London,1956

देशपांडे,सु.र.