द्यूमा, झां बातिस्त आंद्रें : (१६ जुलै १८००–११ एप्रिल १८८४). फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. कार्बनी रसायनशास्त्राचे विशेषतः कार्बनी विश्लेषणाचे प्रणेते. त्यांचा जन्म फ्रान्समधील ॲलेई येथे झाला. सुरुवातीला त्यांनी औषधविक्रेत्याचे काम केले. १८१६ मध्ये ते जिनिव्हा येथे गेले व तेथेही त्यांनी औषधविक्रेत्याचे काम केले. एकवीस वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी जीवरसायनशास्त्र व भ्रूणविज्ञान यांमधील काही समस्यांवर स्वतंत्रपणे संशोधन सुरू केले. १८१८ मध्ये द्यूमा व शार्ल कोइंदे यांनी ⇨ गलगंड रोगावर आयोडिनाचा उपयोग करावा, असे सांगितले. त्यानंतर द्यूमा यांनी जे. एल्. प्रीव्होस्ट यांच्या समवेत १८२६ मध्ये बेडकाच्या अंडाणूच्या खंडीभवनासंबंधी एक निबंध प्रसिद्ध केला. १८२३ मध्ये ते पॅरिसला आले व तेथे एकोल पॉलिटेक्निकमध्ये काम करू लागले. १८३२ मध्ये त्यांनी एक संशोधन प्रयोगशाळा सुरू केली. त्याच वर्षी ते पॅरिस विद्यापीठात व कॉलेज ऑफ फ्रान्स येथे प्राध्यापक झाले. १८४० पर्यंत त्यांनी रसायनशास्त्रात केलेल्या संशोधनामुळे ते एक अग्रगण्य रसायनशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्यांनी १८३० साली कार्बनी संयुगातील नायट्रोजन ओळखण्याची पद्धत शोधून काढली. १८३१ मध्ये त्यांनी डांबरापासून अँथ्रॅसीन वेगळा केला व १८३२ मध्ये कापराचा रेणुभार निश्चित केला. कार्बनी संयुगातील हायड्रोजनाच्या जागी हॅलोजन (क्कोरीन, ब्रोमीन, आयोडीन इ.), ऑक्सिजन वा इतर मुलद्रव्याचा अणू प्रतिष्ठापित करता येतो, असे त्यांनी १८३४ साली दाखविले. त्याच वर्षी त्यांनी क्कोरोफॉर्म तयार केला आणि ई. एम्. पेलिगॉट यांच्याबरोबर मिथिल गटावर (CH3) प्रयोग करून मिथिल अल्कोहॉल वेगळे केले. त्यांनी क्कोराफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयडोफॉर्म व क्लोरल यांची रेणवीय सूत्रे (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांची संख्या दर्शविणारी सूत्रे) अचूकपणे मांडली. कार्बनी रसायनशास्त्रामध्ये मूलद्रव्यांचा गट हा एखाद्या मूलद्रव्याप्रमाणेच कार्य करतो, असे त्यांनी १८३७ मध्ये फोन लीबिक यांच्याबरोबर दाखविले. वरील महत्त्वाच्या कार्याखेरीज त्यांनी बाष्प घनतेच्या साहाय्याने काढलेले काही मूलद्रव्यांचे अणुभार हे जे. जे. बर्झीलियस यांनी त्याच मूलद्रव्यांच्या काढलेल्या अणुभारापेक्षा निराळे व अचूक आहेत, असे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे बर्झीलियस यांच्या कल्पनेऐवजी द्यूमा व लीबिक यांच्या कल्पना रूढ झाल्या. रासायनिक मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासंबंधीही त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. कमी उकळबिंदू असणाऱ्या द्रवांचे व वायूंचे रेणुभार काढण्याची द्यूमा यांची पद्धत अद्यापिही वापरली जाते. या पद्धतीने त्यांनी स्वतः फॉस्फरस, आर्सेनिक व बोरॉन यांचे रेणुभार काढले होते. Trait’e de Chimie Appliqe’e aux arts (आठ खंड, १८२८–४६) व Lecons sur la philosophie Chimique (१८३८) हे त्यांचे ग्रंथ विशेष महत्त्वाचे ठरले आहेत.

रसायनशास्त्रातील कार्याच्या बरोबरच त्यांनी १८४८–७० या काळात राजकारणातही भाग घेतला. १८४९ मध्ये ते नॅशनल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सभासद झाले. १८५०–५१ या काळात कृषी व व्यापार खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते सिनेटर झाले व पॅरिस म्युनिसिपल कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून व फ्रेंच टाकसाळीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. ते कॅन येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.