दोर : गवत, लव्हाळे, वेली (तात्पुरत्या कामाकरिता), काथ्या, कापूस, पपायरस, घायपात (वाख), अननस, ताग, सिसाल (अगेव्ह सिसालाना ), सण, फ्लॅक्स, हेनेक्केन (अगेव्ह फोर्‌क्रॉयडीस), अबाका (मॅनिला हेंप) इ. वनस्पती व तज्जन्य तंतू नायलॉन, डेक्रॉन, पॉलिएथिलिन वगैरे कृत्रिम (मानवनिर्मित) तंतू तसेच लोखंड, पोलाद, तांबे वगैरेंच्या तारा यांचे दोर करतात. वनस्पतिजन्य व कृत्रिम धाग्यांच्या (तंतूंच्या) दोरांना धागी दोर किंवा (नुसतेच) दोर व तारांच्या दोरांना तारदोर म्हणतात. दोर काही पेडांचा (दोऱ्यांचा किंवा बारीक दोरांचा) केलेला असतो व त्यामुळे तो खूप जाड असतो. जाड दोराला दोरखंड व राजू असेही म्हणतात. दोरी व दोरा या संबंधित गोष्टी आहेत. दोरी बारीक म्हणजे साधारण ४० मिमी. परिघापर्यंत (१०–१२ मिमी. व्यासापर्यंत) तर दोरा अगदीच बारीक १ मिमी. किंवा त्याहूनही कमी व्यासाचा असतो, उदा., शिवणकामातील दोरा. दोराच्या काटच्छेदाची (वर्तुळी) परिरेषा असम असते म्हणून दोरांच्या आकारांचा निर्देंश त्यांच्या काटच्छेदाच्या परिघाने करण्याची वहिवाट पडली आहे.

दोरांचा उपयोग मोठ्या वजनाचे बोजे कप्प्यांनी व याऱ्यांनी उचलण्यासाठी जहाजांवर आणि मच्छिमारीत मुख्यतः होतो. एकंदर उत्पादनापैकी जवळजवळ निम्मा माल नाविक उपयोगासाठीच वापरला जातो.

इतिहास : दोर (किंवा बहुतेक दोऱ्या) हे मनुष्याने अगदी प्रथम तयार केलेल्या अगदी साध्या साधनांपैकी एक आहे. त्या वेळची दोरी वेली, गवत, लव्हाळे यांसारख्या तयार गोष्टींपासून बनविलेली असावी. माणसाने पहिला दोर केव्हा व कुठे तयार केला, हे नक्की समजलेले नाही पण दोर वापरल्याचे फार प्राचीन काळातील पुरावे मिळाले आहेत.

भारतात दोराचे ज्ञान प्राचीन असून तो करण्याची कला फार प्रगत स्थितीला पोहोचलेली होती. इ. स. पू. ४०० च्या सुमारास भारतात घोड्यांसाठी व हत्तींसाठी दोर करणाऱ्या तज्ञांचे वेगवेगळे वर्गच होते, असा उल्लेख सापडतो.

नैर्ऋत्य आशियातील ईलम येथे दोरासंबंधीचा सर्वांत जुना पुरावा मिळतो. हा पुरावा ताम्रपाषाण युगातील (इ. स. पू. चार हजार वर्षें) असून त्यात दाखविलेला दोर बहुधा वेणी घातलेल्या चामड्याच्या वाद्यांचा असावा. अशा तऱ्हेचे दोर काही भागात अजूनही वापरात आहेत. झाडाच्या सालीपासून काढलेल्या धाग्यांचे जवळजवळ याच काळातील दोर आग्नेय आशियात सापडले आहेत. त्याच प्रकारातून पुढे काथ्याचे दोर निघाले. आग्नेय यूरोपात सापडलेल्या इ. स. पू. २५०० च्या सुमाराच्या मातीच्या पात्रांवरील काही आकृतींत कातलेल्या सुतापासून बनविलेल्या दोऱ्या आढळतात. इ. स. पू. सु. १५०० च्या काळी पूर्व भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर जाड दोर वापरात असावेत. कारण त्या वेळी तेथे मोठी गलबते वापरात होती व गलबत म्हटले की, दोरखंडांचा वापर आलाच. बॅबिलोनिया व ॲसिरिया या प्रदेशांत याच सुमारास प्रचलित असलेल्या अकेडियन या भाषेत निरनिराळे दोरवाचक शब्द आढळतात. ईजिप्तमधील काही थडग्यांत पपायरसाच्या दोराचे तुकडे सापडले व तेही याच काळातील आहेत. इ. स. पू. १००० च्या सुमारास काशाच्या (ब्राँझच्या) भांड्यांच्या मुठी दोरखंडांच्या स्वरूपात केलेल्या आढळतात. काशाच्या ओतकामाची कला पूर्व आशिया मायनर व आझरबैजान येथील कासेतज्ञांनी तिकडे नेली असावी. इराणचे बादशाह क्झार्सिस (इ. स. पू. ४८०) यांनी हेलेस्पाँ (दार्दानेल्स) सामुद्रधुनीवर जेव्हा होड्यांचा पूल बांधला तेव्हा त्यांच्या लष्करातील फिनिशियन शिपायांनी एका बाजूला शुभ्र फ्लॅक्सची राजू वापरली तर दुसऱ्या बाजूला ईजिप्ती शिपायांनी पपायरसाची वापरली. दोर तयार करण्याच्या धंद्यात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास यंत्रे प्रचारात येईपर्यंत यूरोप खंडात अगदी पूर्वापारच्या हाती पद्धतीनेच दोर बनविण्यात येत असत.

दोरासंबंधित काही बाबी व संज्ञा : या विषयाशी संबंधित बाबी म्हणजे तंतू (सामान्यतः समानार्थी धागा), पेळू, पुंजका, सूत, सुतळी (सुतळ वा सडा), दोरी, पेड, दोर-दोरखंड-राजू (जवळजवळ समानार्थी पण जाडी चढत्या श्रेणीने) या आहेत. पूर्वी सुतळी म्हणजे फारसा पीळ नसलेले जाडसे सूतच होते. त्याचा उपयोग मुख्यतः गोणी शिवण्यासाठी व पुड्या किंवा लहान गाठोडी बांधण्यासाठी करण्यात येई. पण आता वापरात असलेली सुतळी त्याच जाडीची (व्यासाची) पण तिपदरी व पीळ घातलेली असते. पेड म्हणजे दोरीच असते, पण ती जेव्हा दोराचा एक भाग बनते तेव्हा तिला पेड म्हणतात. दोरासाठी वर दिलेले आणखी दोन शब्द आहेत पण त्यांतील भेदाला निश्चित रूप नाही. 

 

दोराशी प्रत्यक्ष निगडित नसलेला पण वरील यादीत बसू शकणारा असा एक दोरीचा प्रकार असून त्याला गोफ म्हणतात. हा पुष्कळशी सुते (१०–१५) एकमेकांत (वेणीप्रमाणे) गुंफून तयार करतात. कधीकधी यात एक सुताचा (दोऱ्याचा) गाभा ठेवून त्याभोवती सुते गुंफतात.


कच्चा माल व त्यावरील क्रिया : सांप्रत दोरांसाठी सामान्यतः काथ्या, ⇨ कापूस, ⇨ हेंप (विशेषतः मॅनिला), ⇨ फ्लॅक्स  हे नैसर्गिक धागे व नायलॉन हा कृत्रिम धागा असे जास्त करून वापरले जातात.

 

नारळाच्या सुक्या, पाण्यात मुरवलेल्या सोडणांपासून (चोड्यांपासून) काथ्या मिळतो. मुरलेली सोडणे वाळवून दांड्याने झोडपली की, त्यातील घाण आणि केरकचरा खाली पडतो व शिवाय वरचा काथ्या नरम होतो. ही क्रिया यंत्रानेही करतात. घायपात, हेंप, अबाका वगैरेंच्या धाग्यांवरही घाण-कचरा काढून टाकणे व नरम करणे या क्रिया कराव्या लागतात. यांत्रिक पद्धतीत या धाग्यांना तेल व पाणी यांचे पायस (एका द्रवात दुसरा द्रव लोंबकळत्या स्थितीत असलेले मिश्रण) योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी लावतात. कृत्रिम धागे कारखान्यातच तयार होत असल्याने त्यांत घाण व कचरा नसतात व ते हव्या त्या गुणघर्मांचे बनविता येतात. म्हणून त्यांच्यावर ही क्रिया करावी लागत नाही. कापसाच्या दोराच्या बाबतीत तो बनविण्यासाठी गिरणीतील तयार सूतच वापरतात.

 

नायलॉन, डेक्रॉन, काच, सरान, पॉलिएथिलीन व पॉलिप्रोपिलीन हे कृत्रिम धागे दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक व वैज्ञानिक क्षेत्रांत वापरले जाण्यास सुरुवात झाली. त्यांपासून बनविलेल्या दोरांमुळे पूर्वींच्या दोरांच्या अनुप्रयुक्तीच्या क्षेत्रात, दोरांच्या आयुष्यात व त्यांच्या निगेत फार मोठे बदल झाले. नैसर्गिक धाग्यांच्या मानाने कृत्रिम धाग्यांत असलेले स्वाभाविक फायदे म्हणजे अधिक बळकटी आणि कुजणे, बुरशी येणे व झिजणे या गोष्टींना जमीन व समुद्र या दोन्हींवरील वातावरणात प्रतिकार करण्याचे सामर्थ्य, हे होत. अधिक बळकटीमुळे कमी आकारमानाचे दोर वापरता येतात व लहान दोर मोठ्यांपेक्षा हाताळणे सोपे असते. दुसऱ्या गुणामुळे नैसर्गिक धाग्यांच्या दोरांना लावावे लागणारे संरक्षक लेप आणि करावे लागणारे उपचार यांची कृत्रिम धाग्यांच्या दोरांच्या बाबतीत जरुरी राहत नाही. कृत्रिम धाग्यांच्या दोरांचे आयुष्य नैसर्गिक धाग्यांच्या दोरांच्या तीन-चार पट असते. वरील यादीतील निरनिराळ्या कृत्रिम धाग्यांत लवचिकपणा, उष्णतारोधकता, झीज व प्रकाशरोधकता आणि विद्युत् अपार्यता या गुणधर्मांचे प्रमाण वेगवेगळे असते. विशिष्ट गुणाच्या उच्च प्रमाणामुळे त्या त्या जातीच्या कृत्रिम धाग्यांच्या दोरांच्या उपयोगासाठी नवी क्षेत्रे निर्माण झाली आहेत.

बनावट : कोणत्याही प्रकारचा दोर बनविताना एकंदर बनावटीच्या विधीचे पुढील पाच भाग पडतात : (१) धागे (तंतू) तयार करणे, (२) धाग्यांचा जरूर तर पेळू बनविणे, (३) सूत कातणे, (४) पेड बनविणे व (५) दोर तयार करणे. दोर ताणला तरी त्यातील सर्व धागे घर्षणामुळे आपापली जागा सोडणार नाहीत अशा स्थितीत धागे एकत्र पिळून आणणे, हे दोर बनविताना मुख्य उद्दिष्ट असते. दोर बनविण्याच्या दोन पद्धती आहेत : एक जुनी व अजूनही भारतातील ग्रामीण भागात तरी चालू असलेली हाती पद्धत व दुसरी यांत्रिक पद्धत.

आ. १. पीळ घालण्याच्या आकड्याचे हातयंत्र : (१) यंत्राची चौकट, (२) चाक (३) हस्तक, (४) चाक, (५) आकडा, (६) तंतूंचा पुंजका.

हाती पद्धत : काथ्या व बाकीचे वनस्पतिजन्य धागे यांत मूलभूत फरक असा आहे की, काथ्यातील तंतू आखूड असतात, तर इतरांचे त्या मानाने खूपच लांब असतात. त्यामुळे या दोन वर्गांच्या तंतूंचा दोर करण्याच्या पद्धतींतही फरक आहे. हाती पद्धतीत काथ्याचे पेळू विशिष्ट पद्धतीने तयार करावे लागतात, तर बाकीच्यांचे खऱ्या अर्थाने तयार असे करावेच लागत नाहीत. चार-पाच धागे एकदम घेतले की, तोच पेळू होतो. शिवाय वर निर्दिष्ट केलेल्या पाच क्रियांपैकी सूत काढणे ही क्रिया फक्त यांत्रिक पद्धतीतच केली जाते हाती पद्धतीत पेळूंपासून सुताऐवजी प्रथम दोरीच तयार होते. काथ्याची दोरी (सुंभ) तयार करण्यासाठी माणूस जमिनीवर बसून २५–३० सेंमी. लांब पुरेशा जाडीइतके काथ्याचे तंतू जमिनीवर ठेवतो व दोन्ही पंजांनी ते लाटण्यासारखे जमिनीवर फिरवितो. या क्रियेत तंतू एकमेकांत गुंततात व पेन्सिलीसारखा पण निमुळत्या टोकांचा पेळू तयार होतो. पुरेसे पेळू तयार झाले की, ते घेऊन माणूस जमिनीवर उकिडवे बसून दोन पेळूंची टोके पायाच्या आंगठ्याखाली दाबून धरतो व दोन्ही पेळू हातांच्या तळव्यांमध्ये धरून त्यांस तळवे सरकवून पीळ भरतो. पेळूंच्या शेवटाकडे आल्यावर एकेका टोकाला नवा पेळू जोडत जातो. अशा तऱ्हेने सु. ७–१० मिमी. व्यासाची वाटेल तितकी लांब सलग दोरी तयार होते. हव्या तितक्या लांबीच्या अशा तीन दोऱ्या घेऊन त्यांच्या एकीकडील टोकांना काठीचे तुकडे आडवे लावतात व दुसरीकडील टोकांना गाठ मारतात. या टोकांतूनही एक काठीचा तुकडा घालतात. यानंतर चार माणसे टोकांना उभी राहून उलटसुलट या काठ्या फिरवू लागली की, दोऱ्यांना पीळ पडून दोर तयार होतो. या दोराचा परिघ साधारणतः ८–१० सेंमी. असतो.


आ. २. तीन सुतळ्यांची दोरी तयार करण्याची पद्धत : (१) गाड्यावर बसविलेले पीळ देणारे यंत्र, (२) सुतळ्यांचा मार्गणक लाकडी ठोकळा, (३) स्थिर आकड्यांना अडकवलेली सुतळ्यांची दुसरी टोके.

तागाचे किंवा काथ्याचेही दोर करताना दुसऱ्या एका पद्धतीत पेळू न करता साफ केलेल्या तंतूंमधून टकळी किंवा फिरणारा आकडा वापरून जाडसे सूतच प्रथम काढतात. आकडा लोखंडी असतो व तो फिरविण्यासाठी एक हातयंत्र वापरतात. असे यंत्र आ. १ मध्ये दाखविले आहे. एक माणूस पिंजलेल्या तंतूंचा पुंजका आपल्याजवळ घेतो व त्यातील काही धागे आकड्यात गुंतवतो. दुसरा माणूस यंत्र फिरवतो व त्यामुळे आकड्याच्या पुढील धाग्यांना पीळ पडतो व सूत तयार होऊ लागते. सुताची लांबी जसजशी वाढत जाते तसतसा पहिला माणूस मागेमागे सरकत जातो. सलग सुताची लांबी २०० मी. पर्यंत ठेवतात. हे सूत म्हणजे सुतळीच असते. तीन सुतळ्या एकत्र करून त्यांची दोरी बनवितात. दोरी बनविण्यासाठी आ. २ मध्ये दाखविलेली पद्धत वापरतात. तीनही सुतळ्यांची टोके आता एका गाड्यावर बसविलेल्या आ. १ मधील यंत्राच्या आकड्याला बांधतात व दुसऱ्या बाजूची टोके स्थिर आकड्यांना अडकवतात. पीळ बसणाऱ्या टोकापासून थोड्या अंतरावर सुतळ्यांच्या मार्गणासाठी एक ठोकळा ठेवतात. दोरीची लांबी वाढू लागली म्हणजे हा ठोकळा पुढेपुढे सरकवीत नेतात. अशा पद्धतीने तीन किंवा चार दोऱ्या एकत्र पिळून दोर करतात. दोर करताना त्याचा पीळ उलगडू नये म्हणून दोऱ्यांच्या उलट दिशेने त्याला पीळ घालतात. कापसापासून दोर हाती पद्धतीने करीत नाहीत.

दोराच्या सुताचा अंक : दोराच्या सुताचा अंक हा कापडासाठी केलेल्या कापसाच्या सुताच्या अंकापेक्षा निराळ्या तऱ्हेने दर्शवितात. कापसाच्या सुताचा अंक म्हणजे ४५३·६ ग्रॅ. (१ रत्तल) वजनात बसणाऱ्या ७६८·१ मी. (८४० यार्ड) लांबीच्या सुताच्या लड्यांची संख्या असते, तर तेथे तो ७·५ सेंमी. (३ इंच) परिघाच्या तीन पेडांच्या दोरातील एक पेड करावयास लागणाऱ्या विशिष्ट जाडीच्या सुतांची संख्या असतो. या व्याख्येनुसार ७·५ सेंमी. (३ इंच) परिघाच्या दोराच्या तीन पेडांपैकी प्रत्येक पेडात २० अंकी २० सुते (दोरे) असतील व सबंध दोरात २० x ३ = ६० दोरे असतील.

 

सामान्य सूत अंक : ताग, हेंप वगैरेंच्या सुताचा अंक म्हणजे ३०० यार्ड लांबीच्या ४८ लड्यांचे (१४,४०० यार्डांचे) पौंडातील वजन (पौंडाचा आकडा) होय. एका सर्वोपयोगी अंकाबद्दल पुढे आलेल्या प्रस्तावानुसार या अंकाचे ग्रेक्स हे एकक असून त्याचे मूल्य १,००० मी. लांबीच्या सुताचे ग्रॅममध्ये होणारे वजन हे आहे.

आ. ३. धागी दोरांच्या जाती : (अ) हॉसर लेड (आ) श्राउड लेड (इ) केबल लेड.

यांत्रिक पद्धत : धाग्यांपासून दोर तयार करण्याच्या मोठ्या कारखान्यात चार विभाग असतात व ते साधारणतः कापसाच्या सुताच्या गिरणीतील विभागांप्रमाणेच असतात. पहिल्या विभागात बाहेरून येणाऱ्या धाग्यांच्या गाठी सोडवून त्यांमधील धाग्यांच्या पेंड्या हातानेच वेगळ्या करतात व पिंजण यंत्रात सोडतात. यंत्रात सर्व धागे विंचरले जाऊन सरळ व समांतर केले जातात आणि त्यांचा एक सलग पेळू (रुंद फितीच्या आकाराचा) तयार होतो. दुसऱ्या विभागात हा पेळू एकापुढे एक ठेवलेल्या अनेक नळ्यांमधून ओढला जातो. त्यामुळे तो गोल वातीसारखा बारीक व घट्ट होतो. तिसऱ्या विभागात ही वात कातण यंत्रावर ओढली जाऊन वेगाने कातली जाते व यंत्रातून पीळ पडलेले सूत बाहेर पडते. हे सूत एका रिळावर गुंडाळून ठेवतात. चौथ्या विभागात अनेक रिळांतील सुते एकत्र करून त्यांवर पूर्वी असलेल्या पिळाच्या उलट दिशेचा पीळ घालून दोरी तयार करतात. दोरीसाठी एकत्र केलेल्या सुतांच्या संख्येप्रमाणे दोरीची जाडी कमीजास्त होते. अशा तीन किंवा चार दोऱ्या (पेड) एकत्र करून त्यांना पीळ घातला म्हणजे दोर तयार होतो. तीन किंवा अधिक दोर एकत्र करून त्यांना पीळ घातला म्हणजे राजू (जाड दोर) तयार होते. भारतातील दोरांच्या कारखान्यांत कापसाचे दोर करण्यासाठी तयार सूतच घेऊन ते वापरतात. काथ्याचे आखूड व कडक तंतू कातण्याची या कारखान्यांत सोय नसल्याने द. भारतातून येणाऱ्या सुंभापासून सुरुवात करून कारखाने काथ्यांचे दोर व राजू बनवितात.


दोरांच्या ‘हॉसर लेड’, ‘श्राउड लेड’ व ‘केबल लेड’ अशा तीन जाती आहेत (आ. ३). हॉसर लेड किंवा साधे दोर तीन पेडांचे असतात व ते ०·५ इंच (१२·५ मिमी.) परिघापासून वरच्या सर्व मापांत मिळतात. श्राउड लेड दोर ४ पेडांचे असतात व ते १·५ इंच (३८ मिमी.) परिघापासून वरच्या मापांत मिळतात. त्यांचा काटच्छेद हॉसर लेड दोरांपेक्षा जास्त सम असतो. तीनपेक्षा अधिक पेडांचे दोर करताना दोराच्या मध्यभागी पोकळी राहते म्हणून दोर तयार करताना दोराच्या गाभ्यात एक दोरी घालतात. या दोरीमुळे पेडांना आधार मिळतो. केबल लेड दोर म्हणजे राजू तीन किंवा अधिक हॉसर लेड दोरांपासून करतात. ते ५ इंच (१२·५ सेंमी) परिघापासून वरील मापांत मिळतात आणि ते लवचिकपणा व प्रत्यास्थता (ताण काढून घेतला असता पुन्हा मूळच्या स्थितीला येणे) या गुणांच्या दृष्टीने त्याच मापाच्या (परिघाच्या) साध्या दोरांपेक्षा अधिक चांगले असतात पण त्यांच्यापेक्षा यांचे बल मात्र जरा कमी असते.

यांत्रिक कारखान्यात एकूण चालक शक्तीपैकी (विजेपैकी) मोठा भाग सूत काढीपर्यंतच्या क्रियांवरच खर्च होतो. यांत्रिक पद्धतीने दोर करण्यातील मूलभूत क्रिया हाती पद्धतीतील क्रियांप्रमाणेच असतात म्हणून त्यांबद्दल येथे अधिक वर्णन केलेले नाही.

कारखान्यात तयार केलेल्या दोरांचे बल ठरविण्यासाठी तो तुटण्यास किती जोर लागतो हे पाहतात. सामान्यपणे निरनिराळ्या दोरांच्या तुटण्याच्या भारांचे कोष्टक तयार केलेले असते. ही माहिती कोष्टक क्र.१ मध्ये दिली आहे. 

              कोष्टक क्र. १. धागी दोर व राजू यांचे अंतिम बल (किग्रॅ. मध्ये).

दोराचा परिध (सेंमी.) 

सिसाल दोर  

मॅनिला दोर  

२·५ 

५ 

७.५ 

१० 

२५ 

४५

३०० 

१,७०० 

४,००० 

६,८०० 

३५,००० 

१,२०,०००

३०० 

१,८०० 

४,५०० 

७,००० 

३५,००० 

१,२०,०००

तारदोर : लोखंडाच्या वा पोलादाच्या अनेक बारीक तारा एकत्र करून त्यांना थोडा पीळ घातला म्हणजे त्या तारांची एक दोरी किंवा एक पेड तयार होतो. येथे पीळ यांत्रिक शक्तीनेच घालावा लागतो. एका पेडात ४,७,१२,१९ किंवा ३७ तारा एकत्र करतात. असे सहा किंवा आठ पेड एकत्र करून त्यांवर पुन्हा यांत्रिक शक्तीने पीळ दिला की, तारदोर तयार होतो. तारदोर तयार करताना काही प्रकारांत दोराच्या गाभ्यात सणाची एक सरळ (पीळ नसलेली) दोरी ठेवतात, त्यामुळे दोर लवचिक होतो व त्यातील पेड सैल पडत नाहीत. काही ठिकाणी योग्य आकारमानाची सणाची किंवा तारेची दोरीही गाभ्यात घालतात. तारदोर तयार करताना व वापरताना चांगले वंगण वापरले, तर तारा गंजत नाहीत व घर्षणाने झिजत नाहीत. तारदोरांचे काळ्या तारांचे व जस्त चढविलेल्या पांढऱ्या तारांचे असे दोन प्रकार असतात. जस्ती तारांच्या दोरांचे बल काळ्या तारांच्या दोरांपेक्षा सु. १०% कमी असते. पूर्व-आकारित (दोरात घातल्यानंतर पिळाने येणारा आकार अगोदरच दिलेल्या) तारा व पेड यांचेही दोर करतात आणि त्यांना पूर्व-आकारित दोर म्हणतात. पूर्व-आकारिततेमुळे त्यांची हाताळणी कमी त्रासदायक होते व त्यांचे आयुष्य वाढते.

वर्गीकरण : तारदोरांच्या वर्गीकरणात दोन अंक वापरतात (आ. ४). पहिला अंक दोरामध्ये किती पेड आहेत, ते दाखवितो व दुसरा प्रत्येक पेडात किती तारा आहेत, ते दाखवितो. उदा., ६ X ७  (हा तारदोर ६ पेडांचा आहे व त्यातील प्रत्येक पेडात ७ तारा आहेत). आ. ४ मध्ये ६ X ७, ६ X १९, ६ X ४१ व ८ X १९ अशा चार तारदोरांचे काटच्छेद दाखविले आहेत.


धाग्यांच्या दोरांपेक्षा तारदोर पुष्कळच जास्त मजबूत व टिकाऊ असतात. काही तारदोरांची बले कोष्टक क्र.२ मध्ये दिली आहेत. तारदोरांचा मुख्य उपयोग जड माल उचलण्यासाठी, पूल टांगण्यासाठी (खूप जाड दोर), धुराड्यांना किंवा अधांतरी उंच टोकांच्या खांबांना आधार देण्यासाठी तणावे म्हणून व मनोऱ्यांवरून नेलेल्या (माणसे अथवा माल वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या) दोरमार्गासाठी होतो. तारांचे दोर गुंडाळून ठेवण्यासाठी मोठ्या व्यासाची लाकडी रिळे वापरतात.

कोष्टक क्र. २. तारदोरांची विशिष्ट वजने व बले

अ. क्र.

दोराचा प्रकार

व्यास (मिमी.)

अंदाजे वजन (किग्रॅ./मी.)

अंतिम बल (टन)

६ X ७

६ X १९

६ X ३७

८ X १९

६ X ७

६ X १९

६ X ३७

८ X १९

१५·८७

१५·८७

१५·८७

१५·८७

२५·४

२५·४

२५·४

२५·४

०·८८

०·९४

०·९१

०·८५

१·७४

१·८९

१·८२

१·६७

१४·४०

१५·१०

१४·३०

१३·००

३६·००

३७·९०

३६·००

३२·६५

[(१) सर्व दोरांच्या पोलादाची जात-सुधारित, नांगर-फाळ पोलाद, (२) ३ व ४ तसेच ७ व ८ हे दोर इतरांपेक्षा आणि ४ व ८ हे ३ व ७ पेक्षा अधिक नरम (लवचिक) जातीचे आहेत].

आ. ४. तारदोरांचे काही प्रकार व त्यांचे काटच्छेद : (अ) ६ X ७ (आ) ६ X १९ (इ) ६ X ४१ (ई) ८ X १९ (१) तारदोरीचा गाभा, (२) धागी गाभा.भारतीय उद्योग : भारतामध्ये काथ्याचे दोर बनविण्याचे बरेच कारखाने केरळ राज्यात आहेत. जहाजावर लागणारा धागी दोर कलकत्ता व कानपूर येथील कारखान्यांत तयार होतो. तारांचे दोर बनविण्यासाठी मोठी यंत्रसामग्री लागते. अशी सामग्री जमशेटपूर आणि कलकत्ता येथे आहे. बहुतेक सर्व राज्यांत गुरे बांधण्याचे धाग्यांचे दोर स्थानिक कारागीर हातानेच तयार करतात.

भारतात १९७० साली २,००,००० टन दोर व १०,००० टन तारदोर तयार करण्यात आले. त्यांपैकी ८०० टन दोर व ५,००० टन तारदोर परदेशांत पाठविले गेले. त्यामुळे ३·६५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. याच काळात ३१२ टन दोर व ६८४ टन तारदोर आयात करण्यात आले आणि त्यासाठी २५ लाख रुपये खर्च करावे लागले.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part II,  Delhi, 1951.

           2. Oberg, E.  Jones, F. D., Ed. Machinery’s Handbook,  Brighton, 1964.

वैद्य, ज. शि. दीक्षित, चं. ग.