देशीयभवन : (नॅचरलायझेशन). जमिनीवरील वा पाण्यातील कित्येक वनस्पती आणि प्राणी त्यांच्या मूळ निवासस्थानांपासून इतरत्र नेल्यास नवीन आवासात (स्थानात) ते विनासायास राहू शकतात व वंशवृद्धीही करू शकतात. नवीन आवासात असणारे भिन्न हवामान व परिस्थिती यांना ते योग्य रीतीने तोंड देऊ शकतात. तेथील वेगळ्या प्रकारचे अन्न ते घेऊ शकतात व थोड्याच काळात या नवीन निवासस्थानात किंचितही अडचण न येता निसर्गाशी समरस होतात. अशा प्रकारे मूळ निवासस्थानापेक्षा भिन्न आवासात निसर्गाशी समरस होऊन वंशवृद्धीही केली जाते त्या वेळेस त्या वनस्पतीचे अथवा प्राण्याचे देशीयभवन (सवय होणे) झाले असे म्हणतात.

कित्येक वेळा असे आढळून येते की, एखादा प्राणी अथवा वनस्पती मूळ निवासस्थानापेक्षा अन्य ठिकाणी नेली असता तेथील बदलते हवामान, जमीन, पाणी, अन्न तसेच, तेथील विविध वनस्पती व प्राणी इ. परिस्थितींशी आपले जीवन मिळते करून घेते परंतु अल्पकालपर्यंतच ती वनस्पती अगर प्राणी जिवंत राहू शकतो. त्यांच्यापासून वंशवृद्धी होण्याची शक्यता कमीच असते. तसेच त्यांची शारीरिक वाढही योग्य प्रमाणात होत नाही. अशा वेळी त्या प्राण्याला अथवा वनस्पतीला त्याच्या नवीन निवासस्थानातील हवापाण्याचा सराव झाला असे म्हणतात. अशा तऱ्हेने सराव झालेल्या अगर रुळलेल्या वनस्पती अगर प्राणी काही काळपर्यंतच बदलत्या परिस्थितीशी मिळते घेऊन जिवंत राहू शकतात, तर देशीयभवनामध्ये जिवंत राहून त्यांची वंशवृद्धीही होत असते.

देशीयभवन सुलभपणे होण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता असते : (१) मूळ निवासस्थान व नवे निवासस्थान यांमधील हवामान, अन्न वगैरे बाबतींत फारसा फरक नसावा. (२) नवीन आवासातील इतर परिस्थिती, जमीन, पाणी, अन्न, आसरा इ. त्या प्राण्यांना अगर वनस्पतींना अनुकूल असावीत. (३) नवीन निवासस्थानात प्रवेश करणारे प्राणी अगर वनस्पती ह्या विविध जातींच्या असतील, तर त्यांच्यात अन्न, आसरा, वंशवृद्धी ह्या मूलभूत गरजांसाठी एकमेकांत तीव्र चढाओढ होणार नाही कारण प्रत्येक जातीचे प्राणी अथवा वनस्पती यांच्या मूलभूत गरजा भिन्न असतात. (४) नवीन आवासातील बदलत्या परिस्थितीशी समरस होण्यासाठी शरीरात कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या बदलांसाठी भरपूर व निवांत वेळ असावा. (५) नवीन निवासस्थानात प्रवेश करणाऱ्या प्राण्यांना तेथे पूर्वीच वास्तव्य करून राहिलेल्या प्राण्यांशी पुष्कळदा झुंजून त्यांच्यावर मात करावी लागते. तेथील मूळ प्राण्यांपेक्षा नवीन प्रवेश करणारे प्राणी बलवान असतील, तरच त्यांचा या झुंजीत निभाव लागून ते त्या निवासस्थानात आपले आधिपत्य गाजवू शकतील.

कारणे : देशीयभवन होण्याची कारणे अनेक असू शकतात. त्यांपैकी नैसर्गिक प्रकारामुळे झालेल्या देशीयभवनाची पुढील उदाहरणे देता येतील: (१) मूळ निवासस्थानात प्राण्यांच्या संख्येत झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे अन्नाचा तुटवडा पडतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सर्वांना परिचित असलेल्या भुऱ्या उंदरांचे देता येईल. या उंदरांचे मूळ निवासस्थान आशिया खंडातील बायकाल सरोवर व कॅस्पियन समुद्र यांमधील भूभाग होय. १७२७ साली ह्या उंदरांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली. अन्नटंचाईमुळे हजारो उंदरांचे थवे आपले मूळ निवासस्थान सोडून कॅस्पियन समुद्राच्या पश्चिमेकडे रशियाच्या भूमीवरून सर्वत्र पसरले. या नवीन निवासस्थानात त्यांना योग्य हवामान, अन्न वगैरे अनुकूल गोष्टी मिळाल्याने ते आसपासच्या भागात पसरले. कित्येक थव्यांनी यूरोप खंडात प्रवेश केला व तेथून थोड्याच वर्षांत ते सर्व जगभर पसरले.

(२) पिकांची उत्तम लागवड होण्यासाठी चांगल्या प्रकारचे बी-बियाणे, रोपे वगैरे एका देशातून दुसऱ्या देशात नेली जातात. या बी-बियाण्यावर उपजीविका करणाऱ्या कीटकांचाही या दुसऱ्या देशात प्रवेश होतो. हे कीटक अंडी, अळी, कोश वगैरे अवस्थांमध्येही असण्याचा संभव असतो. अशा प्रकारे एका देशात होणाऱ्या पिकांची लागवड दुसऱ्या देशात करताना प्राण्यांचे देशीयभवन होते. याचे उत्तम उदाहरण म्हणून कोलोरॅडो भुंग्यांच्या देशीयभवनाचे देता येईल.

इ. स. १८२४ मध्ये हे कीटक अमेरिकेतील कोलोरॅडोमधील रॉकी पर्वताच्या भागात आढळले. ते तेथे आढळण्याऱ्या वनस्पतींवर उपजीविका करीत व फक्त मर्यादित भागातच आढळून येत. याच भागात यूरोप खंडातून आयात केलेल्या बटाट्यांची लागवड सुरू करण्यात आली. तेव्हा हे भुंगे बटाटे पोखरून खाऊ लागले. मुबलक आणि विनासायास मिळणाऱ्या अन्नामुळे या भुंग्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली व अमेरिकेतील ज्या ज्या भागात ह्या दूषित बटाट्यांची लागवड केली गेली त्या त्या भागात हे भुंगे पसरले, १८७४ साली हे भुंगे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत व कॅनडात सर्वत्र पसरले. अमेरिकेहून यूरोप खंडात निर्यात केलेल्या बटाट्यांतून या भुंग्यांनी तेथे प्रवेश केला. १९२२ मध्ये फ्रान्समध्ये ते जास्त प्रमाणात आढळले व नंतर हळूहळू ते सर्व यूरोप खंडात पसरले. हे भुंगे आता ‘कोलोरॅडो पोटॅटो बीटल’ या नावाने ओळखले जातात.


देशीयभवन होण्यासाठी केवळ निसर्गच जबाबदार असतो असे नसून मानवाच्या हातून नकळत काही प्राण्यांचा दुसऱ्या देशात प्रवेश होतो. याचे उत्तम उदाहरण झुरळांचे देता येईल. हे कीटक मूळचे अमेरिका खंडातील होत परंतु मानवाच्या व्यापारी देवघेवीमुळे नकळत व्यापाराच्या वस्तूंबरोबर ते देशोदेशी पसरले. अशाच देवघेवीमुळे माशी, डास, ढेकूण इ. कीटक व उंदरासारखे प्राणी सर्व जगभर पसरले आहेत.

देशीयभवनाचे परिणाम : एखाद्या प्राण्याचे अगर वनस्पतीचे देशीयभवन झाल्यानंतर त्याच्या स्वतःवर अगर त्या त्या प्रदेशात मूळ वास करणाऱ्या इतर प्राणी अगर वनस्पतींवर अनेक परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यांपैकी काही प्रमुख खाली दिल्याप्रमाणे होत.

(१) देशीयभवनानंतर नवीन प्रवेश करणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत भरमसाट वाढ होते असे आढळून आले आहे. उदा., ऑस्ट्रेलियातील ससे. ऑस्ट्रेलियात ससे नव्हते. ते तेथे आणून सोडल्यावर मुबलक अन्न आणि शत्रूंचा अभाव यांमुळे त्यांची भरमसाट वाढ झाली. ते गवत व पिके यांची विलक्षण नासाडी करू लागले. यामुळे थोड्याच वर्षांत ऑस्ट्रेलियात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. सरतेशेवटी नालाजाने सरकारला ससे मारण्याची मोहीम हाती घेऊन दुष्काळाचे संकट दूर करावे लागले.

(२) देशीयभवनानंतर काही वनस्पतींच्या व प्राण्यांच्या आकारमानात तसेच शारीरिक बलात वा जोमात वाढ झाल्याचे आढळून येते. याचे उत्तम उदाहरण यूरोप खंडातील वॉटर क्रेस या वनस्पतीचे होय. या खंडात ही वनस्पती फक्त ०·६ ते १·२ मी. लांबीची असते परंतु ती न्यूझीलंडमध्ये नेल्यावर तेथील अनुकूल हवामानामुळे तिच्या लांबीत फार वाढ होऊन ती ३·६ ते ४·२ मी. झाली. तसेच तिचे खोडही मनगटाएवढे जाड झाले.

(३) नैसर्गिक निवडीमुळे काही वनस्पती आणि प्राणी मूळ निवासस्थानात नष्ट होण्याची शक्यता असते परंतु नवीन आवासात ते जीवनात यशस्वी होऊन त्यांची उत्तम प्रकारे वाढ होते. उदा., न्यूझीलंडमधील ससे, चिमण्या, ब्लॅकबर्ड इ. पशुपक्षी.

(४) देशीयभवनानंतर नवीन परिस्थितीशी समरस होताना काही प्राण्यांत कोणतेही बाह्य बदल होत नाहीत. उदा., उंदीर, ससे, चिमण्या, कोंंबड्या वगैरे.

(५) कित्येक वेळा देशीयभवनानंतर तेथील बदलत्या हवामानामुळे काही प्राण्यांच्या शरीराची वाढ खुंटल्याचे आढळून आले आहे. दक्षिण ध्रुवाजवळील फॉकलंड बेटांमध्ये १७६४ साली काही फ्रेंच लोकांनी वसाहत करण्याच्या वेळी गुरे व घोडे ही जनावरे आणली. तेथील वेगळ्या हवामानात त्यांची वाढ होऊ लागली परंतु काही वर्षांनी असे आढळून आले की, गुरांचे आकारमान नवीन पिढीतही कायम राहिले परंतु घोड्यांचे आकारमान मात्र प्रत्येक पिढीत हळूहळू कमी होत गेले. काही वर्षातच मूळ आयात केलेल्या धिप्पाड घोड्यांच्या ऐवजी फॉकलंड बेटांत छोटी तट्टे आढळून येऊ लागली. घोड्यांच्या आकारमानात ही घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे फॉकलंड बेटांत आढळून येणारी अतिशय आर्द्र हवा व योग्य अन्नाचा अभाव ही होत.

(६) देशीयभवनानंतर स्थायिक झालेले प्राणी शरीराने बळकट, लवचिक प्रकृतीचे, कोणत्याही बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ असतील आणि त्यांच्या जननशक्तीचे प्रमाण जास्त असेल, तर ते त्या भागातील मूळ प्राण्यांचा नाश करतात. इंग्लंडमध्ये फक्त काळे उंदीर प्रामुख्याने आढळून येत. अठराव्या शतकात व्यापारी जहाजांतून तेथे काही भुरे उंदीर आले व ते काळ्या उंदरांपेक्षा वरचढ ठरून त्यांनी काही वर्षांतच काळ्या उंदरांचा नाश केला. आता काळे उंदीर इंग्लंडमध्ये फारच कमी प्रमाणात आढळून येतात.


(७) देशीयभवनानंतर स्थायिक झालेले प्राणी आपल्याबरोबर रोगांचा प्रसार करणारे इतर प्राणी वा जंतूही आणतात. उंदरांबरोबर त्यांच्या अंगावरील पिसवा येतात व त्यांच्यामुळे प्लेगसारख्या रोगांचा प्रसार होतो. तसेच डासांमुळे हिवताप, पीत ज्वर आणि माशीमुळे पटकीसारख्या रोगांचा प्रसार होतो.

(८) कित्येक वेळा आयात केलेली फळे जर किडकी अगर दूषित असतील, तर अनेक प्रकारचे कीटक वा कीडी नवीन प्रदेशात पसरतात.

(९) कित्येक वेळा काही रानटी वनस्पतींची मानवाला नकळत नवीन प्रदेशात आयात केली जाते आणि थोड्याच अवधीत या वनस्पतींची बेसुमार वाढ होऊन त्यांचा समूळ नाश करणे फार कठीण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजकाल सर्वत्र आढळून येणारी ‘चटकचांदणी’ [⟶ गाजरी ] ही वनस्पती होय. ही मूळ अमेरिकेतील होय परंतु तेथून भारतात आयात केलेल्या अन्नधान्यात हिचे बी मिसळले जाऊन थोड्याच वर्षांत या वनस्पतीने भारतात ठाण मांडले आहे.

रानडे, द. र.