देवी संप्रदाय: भारतात देवतोपासनेस अनुलक्षून जे पंथ वा संप्रदाय निर्माण झाले, त्यांत देवी वा शक्तिपूजक किंवा मातृदेवतापूजक संप्रदाय हा फार प्राचीन व सर्वव्यापी आहे. देवताशास्त्रात पंचदेवोपासनेस प्रमुख स्थान आहे. निर्गुण वा निराकार परतत्त्वाचे सगुण वा साकार प्रतीक कल्पून त्याची भक्ती करणे व अनुग्रहाच्या अपेक्षेने संपूर्ण जीवन त्याच्या पूजन–कीर्तनांत व्यतीत करणे, ही पद्धती भारतीय भक्तिमार्गाची विशेषता आहे. भक्तिमार्गात अनेक देवता आहेत पण विष्णू, शिव, सूर्य, गणपती आणि देवी यांची पूजा व भक्ती व्यापक प्रमाणात होत असते. देवता व त्यांची शक्ती यांचा हळूहळू विकास होत गेला व त्या विकासक्रमामध्ये शक्तीला देवत्व प्राप्त झाले. या शक्तीलाच तिच्या अनन्यसाधारण तेजामुळे ‘देवी’ हे अमिधान प्राप्त झाले. अर्थात देवत्वातील पुरुषतत्त्वाच्या आणि स्त्रीतत्त्वाच्या भिन्नत्वाची सीमारेषा फारच अंधुक आहे.

‘दीव्यति इति देवी’ अशी देवी शब्दाची व्युत्पत्ती सांगता येईल. ‘खेळणे’ असाही ‘दिव्’ धातूचा अर्थ आहे. त्या प्रमाणे अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सृष्टि–स्थिति–लयरूपाची क्रीडा देवी करीत असते, असा अर्थ होईल. इतर देवांप्रमाणे परात्परशक्तीनेही भूतांच्या पालनासाठी व दुष्टांच्या निर्दालनासाठी निरनिराळे ‘अंशावतार’ धारण केले. धर्माचे शत्रू असणाऱ्या अनेक राक्षसनेत्यांचा नाश करून देवीने देवांचे आणि स्वभक्तांचे रक्षण केले, असे समजण्यात येते. तिचे अवतार प्रसंगानुसार सात्त्विक, राजंस किंवा तामस स्वरूपाचे आहेत. त्याप्रमाणे तिची लौकिक नावेही भिन्न भिन्न आढळतात. ‘दुर्ग’ नावाच्या राक्षसास मारल्यामुळे ती ⇨दुर्गा झाली ‘महिषासुरास’ मारून ती ‘महिषासुरमर्दिनी’ झाली चंड–मुंडांचा वध केल्यानंतर तिला ‘चांमुंडा’ हे नाव प्राप्त झाले. या राक्षसवधकथा मुख्यत्वेकरून ‘सप्तशती’ (मार्केंडेयपुराणातील ‘देवीमाहात्म्य’ भाग), देवीभागवत, ब्रह्मांडपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण या पुराणग्रंथांत व अनेक तंत्रग्रंथांत आल्या आहेत. देवीचे कार्यस्वरूप सामूहिक तेजाचे आहे.

मूळ देवीचा वास ‘मणिद्वीपा’त आहे, तेथे ती पाच देवतांच्या सिंहासनावर (पंचप्रेतासन) विराजमान झाली आहे, या भुवनेश्वरीनेच स्वतःच्या काही अंश–शक्ती तीन प्रमुख देवांना दिल्या, असे देवीभागवतात (३·६·३२, ३५, ४९) सांगितले आहे.

महासरस्वतीत सत्त्वाचे, महालक्ष्मीत रजस्‌चे व महाकालीत तमस्‌चे प्राबल्य असते. त्यामुळे देवीच्या मूर्तीतही फरक झालेला आहे. संप्रदायानुसार सरस्वती हंसवाहनयुक्त, श्वेतवस्त्र धारण करणारी व वीणापुस्तकधारिणी आहे. महालक्ष्मी कमलासना, शंखचक्रगदा धारण करणारी आहे. महाकाली श्मशानवासिनी, नरमुंडमाला धारण करणारी, हातात खड्‌गशूल घेतलेली व क्रूर आहे. त्रिगुणांच्या सापेक्ष आविर्भावामुळे जगातील सर्व वस्तूंत देवी साररूपाने वास करीत असते. ‘सप्तशती’ मध्ये तीन देवतांची ध्याने दिली आहेत. साधारणपणे देवीच्या मूर्ती भारतात याच स्वरूपाच्या घडविल्या गेल्या आहेत.

पुराणांच्या परिशीलनावरून देवीउपासनेचे दोन संप्रदाय स्पष्टपणे दिसून येतात: वैदिक व तांत्रिक. वैदिक संप्रदायाची उपासना ही दोन स्वरूपांची आहे : बाह्य व आंतर. बाह्य उपासना म्हणजे स्नान, गंध, पुष्प इ. उपचार करून पूजा आंतर म्हणजे मानसिक पूजा, ध्यान व जप.

बाह्य उपासनेत सर्वांत महत्त्वाचा भाग नवरात्रासारखा व्रतांचा आहे. देवीभागवतांत (३·२६ ५·३४) नवरात्रहोम, देवतापूजन, कुमारीपूजा इ. विषयांचे सविस्तर वर्णन आले आहे. वैदिक आंतर उपासनेत गायत्री–उपासना आहे. गायत्रीमंत्राचे पुरश्र्चरण, जपपद्धती इ. विषय यामध्ये येतात. या सर्व उपासनांचे स्वरूप सौम्य आहे पण बाह्य उपचारांत पशुवधाचे विधानही काही ग्रंथांत आढळते.


तांत्रिक संप्रदायांत कुंडलिनी जागृत करून शक्ती आणि शिव यांचे ऐक्य साधणे, हा फार महत्त्वाचा भाग अंतर्भूत झाला आहे. साधारणपणे सर्व तंत्रग्रंथांत व सौंदर्यलहरी  या स्तोत्रग्रंथाच्या टीकेत याचा ऊहापोह केलेला आढळतो. ही साधना फारच सूक्ष्म व कष्टसाध्य आहे. या कुंडलिनीसाधनेचा प्रचार वैष्णव, शाक्त, शैव व नाथ संप्रदाय त्याचप्रमाणे बौद्ध संप्रदाय, जैन संप्रदाय, सिद्धपद्धती इ. वैदिकेतर संप्रदायांतही बराच झाला होता. हठयोगाच्या प्रवर्तकांनी शरीरात सहा चक्रे मानली आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा या चक्रांत देवी बीजरूपाने वा भूततत्त्वरूपाने अधिष्ठित असते. सर्व चक्रांच्या मूर्धस्थानी असलेली सहस्रदलकमल हे तिचे सर्वोच्च स्थान आहे. कुंडलिनी सुषुप्तावस्थेत स्वाधिष्ठान चक्रावर साडेतीन वेटोळे करून रहात असते. ज्ञानेश्वरीतही (६·१२२–२३) साधनेच्या प्रयत्नाने ही कुंडलिनी सर्व कुलपथाला म्हणजे मूलाधारादी षट्चकांना अथवा सुषुम्नामार्गास भेदून सहस्रदलकमलामध्ये आपल्या पतीसह म्हणजे परमशिवासह विहार करते. या साधनसंप्रदायास ‘कौल संप्रदाय’ असेही म्हणतात.

त्रिपुरारहस्य, महानिर्वाणतंत्र, षट्चकनिरूपण, नित्याषोडशिकार्णव  इ. तंत्रग्रंथांत ‘कौल’ संप्रदायासंबंधी चर्चा आली आहे. या कौल संप्रदायाचाच एकांगी किंवा अनाचारप्रधान एक पंथ आहे. त्या पंथातील साधक ‘पंचमकारां’ ची साधना करतात. ते पाच मकार असे आहेत : मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा व मैथुन. या मार्गास ‘वामाचार’ वा ‘वाममार्ग’ असे म्हणतात. या संप्रदायातदेखील आनंदभैरवी, महाभैरवी, ललिता, त्रिपुरसुंदरी अशी देवीची नावे आहेत.

दुसऱ्या एका पंथास ‘समयाचार’ असे म्हणतात. त्याला ‘दक्षिणाचार’ असेही नाव आहे. यामध्ये स्त्रीभोगाला स्थान नाही. ‘समय’  शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या हृदयाकाशात चक्राची भावना करून त्याची पूजा करणे. वैदिक साधनेप्रमाणेच बौद्ध साधनेत चक्रपूजेला महत्त्व आहे. त्या संप्रदायात देवीस ‘तारा’, ‘मणितारा’ इ. नावे आहेत. काही त्रिकोण, वर्तुळ, चतुष्कोण, कमळ इ. आकृतींनी ही रहस्यमय चक्रे बनत असतात.

या चक्रपूजेच्या अनुषंगाने देवी संप्रदायात ‘मंत्रयोगास’ बरेच महत्त्व आले आहे. सर्व मंत्रांचा प्रारंभ ओंकारापासून होतो. मंत्राबरोबर काही बीजाक्षरांच्या जपाचाही विधी आहे. ‘ऐँ’, ऱ्हीँ’, क्लीँ’ ही शक्तिगर्भ बीजे आहेत. ‘र्हीँ’ मधील हकार हा लयशक्तिविशिष्ट शिवतत्त्वाचा बोधक आहे रकार हा सृष्टिशक्तिविशिष्ट ब्रह्मतत्त्वाचा बोधक आहे आणि ईकार स्थितिशक्तिविशिष्ट विष्णुतत्त्वाचा बोधक आहे. शेवटच्या अनुस्वाराने या तिन्ही तत्त्वांचा शुद्ध चित्स्वरूपात होत असलेला समावेश सूचित होतो. उपर्युक्त उपासनाप्रकार हे ‘सात्त्विक’ समजले जातात.

देवीच्या राजसी किंवा तामसीपूजेता प्रकार भारताच्या ग्रामीण भागात अधिक दिसून येतो. खेडेगावांत ज्या ‘ग्रामदेवता’ असतात, त्या देवीचेच अंश आहेत. दुष्काळ, रोगराई इ. संकटांचे निवारण करण्यासाठी या ग्रामदेवातांची पूजा होत असते. ग्रामदेवता नवसास पावतात, असाही खेडेगावांतील लोकांचा विश्वास असतो. विशिष्ट दिवशी तेथे जत्रा भरते व त्यावेळी भूत–पिशाचादींचा आवेश, अंगात येणे इ. प्रकार होतात. पशुबलीही दिला जातो. भवानी, यमाई, अंबाबाई, जाखाई, डाकिनी, हाकिनी इ. देवीचे अंश महाराष्ट्रात पूजिंले जातात. पुष्काळ वेळा अनाचाराचाही त्यात प्रवेश होतो. पूर्वोत्तर भारतात ‘मनसा’ किंवा सर्पदेवता, षष्ठी, मंगलचंडी, शीतला (‘देवी’ रोगाची देवता), ओइलचंडी (पटकीची देवता), काली यांची पूजा सर्वत्र होत असते [⟶  ग्रामदैवते].

दक्षिण भारतात काली, मरियम्मा आणि पोचम्मा या देवतांची पूजा करतात. पुजारी साधारणपणे ब्राह्मणेतर वर्गातील असतात. पशुबलीचाही प्रकार आहे. अनेक विद्वान पशुबलीची संबंध सुफलताविधीशी जोडतात. केरळमध्ये ‘भगवती’ ची पूजा करतात. नऊ समकेंद्र वर्तुळांचे किंवा योनींचे चित्र काढले जाते. त्याला श्रीचक्र असेही म्हणतात. श्रीचक्राच्या पूजकांस ‘श्रीविद्योपासक’ असे म्हणतात. तमिळनाडूमध्ये कांचीची कामाक्षी व मदुरेची मीनाक्षी यांची देवळे वास्तुशिल्पाच्या द्दष्टीने अप्रतिम आहेत.

अशा रीतीने संपूर्ण भारतात देवीच्या अनेक रूपांची पूजा अनेक पद्धतींनी होत असते. देवीपूजेत बराच अवैदिक भाग आहे पण तो मूळचा असला पाहिजे. सध्याच्या पूजापद्धतीत वैदिक तत्त्वांचा आणि तांत्रिक उपासनेचा सुंदर संगम दिसून येतो.

संदर्भ : 1. Lalye, P. G. Studies in Devi Bhagavata, Bombay,1973.

           २. गोपीनाथ कविराज, भारतीय संस्कृति और साधना, पाटणा, १९६३.

लाळे, प्र. ग.