देवमासा : या जलचर प्राण्याचे बाह्य स्वरूप जरी माशासारखे असले, तरी तो मासा नाही. तो सस्तन प्राणी असून पाण्यात रहाण्याकरिता त्याचे अनुकूलन (विशिष्ट परिस्थितीत राहण्यास योग्य असे रूपांतर) झालेले आहे. देवमासे खुल्या महासागरात आणि समुद्रात राहणारे आहेत पण काही किनाऱ्यालगत, तर अगदी थोडे गोड्या पाण्यात राहतात.

स्तनिवर्गाच्या सिटॅसिया गणात सगळ्या देवमाशांचा समावेश केलेला आहे. सिटॅसिया गणाचे आर्किओसीटाय, ओडाँटोसीटाय आणि मिस्टिसीटाय असे तीन उपगण आहेत. आर्किओसीटाय या उपगणात इओसीन (सु. ५·५ ते ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) व ऑलिगोसीन (सु. ३·५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या) कल्पांतील निक्षेपांत (खडकांच्या साठ्यांत) सापडलेल्या सगळ्या लुप्त (निर्वंश) रूपांचा अंतर्भाव होतो. बाकीच्या दोन उपगणांत सगळ्या जिवंत देवमाशांचा समावेश होतो.

मिस्टिसीटाय या उपगणात शृंगास्थिपट्ट (वरच्या जबड्याच्या आतल्या पृष्ठावर असणारे केराटिनाचे तकट) आणि सममित (सारखे भाग होणारी) कवटी असलेल्या सगळ्या देवमाशांचा समावेश होतो. यांच्या मुखात दात नसतात. त्यांच्याऐवजी ३००–४०० तिकोनी शृंगी पट्ट (केराटिनयुक्त तकटे) असून ते तालूच्या प्रत्येक बाजूला जोडलेले असतात. यांच्या आतल्या काठांवर मऊ रोम असतात. मुखातील सगळ्या रोमांचे मिळून पाण्यातील अन्न गाळण्याकरिता एक गाळणे तयार झालेले असते. हे प्राणी लहान प्लवकजीवांवर (पाण्यावर तरंगणाऱ्या जीवांवर) उदरनिर्वाह करतात. या उपगणातील बहुतेक देवमासे फार मोठे आणि थंड समुद्रात राहणारे आहेत. या उपगणात तीन कुले आहेत. ब्ल्यू व्हेल (निळा देवमासा), फिनबॅक व्हेल, व्हेल, रॉरक्कल, राइट व्हेल, हंपबॅक व्हेल, ग्रे व्हेल वगैरे देवमासे या उपगणातील आहेत.

ओडाँटोसीटाय हा उपगण पुष्कळ बाबतींत मिस्टिसीटायपेक्षा स्पष्टपणे निराळा आहे. या देवमाशांना दात असल्यामुळे ते मासे, स्क्विड यांच्यासारखे मोठे प्राणी खाऊ शकतात. यांची कवटी असममित असते. बहुधा ते उष्ण समुद्रात राहतात. स्पर्म व्हेल (वसा तिमी) हीच काय ती देवमाशाची अतिशय मोठी जात या उपगणात आहे. हल्ली जिवंत असणाऱ्या देवमाशांची चार कुले या उपगणात आहेत. स्पर्म व्हेल, चोच असलेले देवमासे, किलर व्हेल, नारव्हेल, पायलट व्हेल, पांढरे देवमासे वगैरे देवमासे या उपगणातील आहेत.

सामान्य शारीरिक लक्षणे : देवमाशांची लांबी सु. १·२५–३० मी. पर्यंत असते आणि वजन २३ किग्रॅ. पासून १३६ टनांपर्यंत असते. देवमाशांच्या पुढील लक्षणांवरुन ते मासे नाहीत हे सहज ध्यानात येते. शेपटीच्या टोकाशी दोन मोठ्या पुच्छ पाली (शेपटीची पाळे) असून त्या आडव्या पातळीत असतात माशांचा पुच्छपक्ष (शेपटीवरील पर) सरळ उभा असतो. शरीर प्रवाहरेखित (पाण्याच्या प्रवाहाला कमीत कमी रोध होणारे) असते पुढच्या अवयवांचे वल्ह्यांत (फ्लिपरमध्ये) रूपांतर झालेले असून त्यांच्यावर आवरण असते शरीराचा तोल सांभाळण्याकरिता त्यांचा उपयोग होतो मागचे अवयव (पाद) नसतात. पृष्ठपक्ष सामान्यतः असतो आणि डोक्यावर विखुरलेले राठ केस असतात.

देवमाशांची त्वचा जाड, गुळगुळीत व केशरहित असते. त्यांना स्वेद ग्रंथी (घर्म ग्रंथी) आणि स्नेह ग्रंथी (स्निग्ध पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथी) नसतात. त्वचेच्या लगेच खाली वसा (स्निग्ध पदार्थ) आणि तेल यांनी भरलेला तंतुमय थर असून त्याला ‘ब्लबर’ म्हणतात उष्णतेचे नियमन करण्याच्या कामी त्याची मदत होते. बाह्यकर्ण अथवा कानांचे स्नायू नसतात. शल्क (खवले) आणि क्लोम (कल्ले) नसतात.

दात असणाऱ्या देवमाशांच्या नाकपुड्या एकाच वात–छिद्राने बाहेर उघडतात अस्थियुक्त (शृंगी अस्थी) देवमाशांमध्ये दोन वात–छिद्रे असून ती सामान्यतः डोक्याच्या शिखरावर असतात. वात–छिद्र सरळ फुफ्फुसाला जोडलेले असते. हा प्राणी पाण्यात बुडालेला असताना वात–छिद्र एका झडपेने बंद केलेले असते. यांची फुफ्फुसे फार मोठी असतात कारण हे प्राणी पुष्कळदा पाण्याच्या आत एक तासापेक्षाही जास्त वेळ राहत असल्यामुळे त्यांना फुफ्फुसांत फार मोठ्या प्रमाणावर हवा भरून घेण्याची जरुरी असते. अश्रू ग्रंथीच्या तेलकट स्रावाने खाऱ्या पाण्यापासून डोळ्यांचे रक्षण केले जाते.


अस्थी छिद्रिष्ट (स्पंजासारख्या छिद्रयुक्त) असून त्यांच्या गुहिकांत (पोकळ्यांत) तेल असते. पृष्ठपक्ष आणि पुच्छपाली यांना अस्थींचा आधार नसतो. श्रोणि–मेखला (हाडांच्या सांगाड्याच्या ज्या भागाशी हालचालीसाठी उपयुक्त असणारे मागचे अवयव जोडलेले असतात तो भाग) दोन लहान अस्थींची बनलेली असून त्या देहभित्तीत रुतलेल्या असतात पृष्ठवंशाशी (पाठीच्या कण्याशी) त्यांचा काही संबंध नसतो. बाह्य जननेंद्रियाचे स्नायू या अस्थींना चिकटलेले असतात. पश्च (मागच्या) अवयवांची काही गरज नसते कारण त्यांचे कार्य शेपटी करते. शेपटी वरखाली हालवून देवमासे पाण्यात पोहत पुढे जातात. शेपटी वरखाली हलविताना पुच्छपाली नेहमी तिरकस असतात.

डोळ्यांपेक्षा श्रवणेंद्रिये व स्पर्शेंद्रिये जास्त तीक्ष्ण असतात घ्राणेंद्रिये नसतात. देवमासे पाण्यात बुडालेले असताना अनेक आवाज काढू शकतात. एकमेकांमधील दळणवळणाकरिता या ध्वनींचा उपयोग होत असावा असे वाटते.

सदंत देवमाशांचे दात रचनेच्या दृष्टीने साधे असून त्यांची संख्या २–२६० असू शकते. हे नॉटिलस, स्क्विड, ऑक्टोपस व मासे यांच्यावर उपजीविका करतात. ते आपल्या दातांनी बुळबुळीत प्राणी घट्ट पकडतात पण त्यांना ते चावून खाता येत नाहीत. शृंगास्थी (वलीन) देवमासे वेगवेगळ्या प्रकारचे प्लवकजीव खातात.

देवमाशांचा गर्भावधी ११–१६ महिने असतो. मादीला दर खेपेस एकच पिल्लू होते. सामान्यतः आईच्या शरीराच्या एकचतुर्थांश ते एकतृतीयांश पिल्लाची लांबी असते. जन्मल्याबरोबर हवा घेण्याकरिता पिल्लाला पृष्ठभागावर यावे लागते आणि या कामी मादी पिल्लाला पृष्ठाकडे ढकलून मदत करते. जननछिद्राच्या दोन्ही बाजूंना जोडीने असणाऱ्या भेगांत स्तनाग्रे असतात. देवमाशांच्या पिल्लांची वाढ फार झपाट्याने होते, याचे मुख्य कारण म्हणजे मादीच्या दुधात कॅल्शियमाचे आणि फॉस्फरसाचे प्रमाण बरेच असते.

देवमाशांच्या सु. ३७ जाती आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाच्या जातींची माहिती थोडक्यात खाली दिली आहे.

आ. १. ब्ल्यू व्हेल (निळा देवमासा)

शृंगास्थिपट्ट असलेले देवमासे : ब्ल्यू व्हेल : (निळा देवमासा). याचे शास्त्रीय नाव बॅलिनॉप्टेरा मस्क्युलस  असे आहे. पृथ्वीवरील जिवंत प्राण्यांमध्ये हा सर्वांत मोठा प्राणी आहे. लांबी ३०·५ मी. पर्यंत असते. माद्या नरांपेक्षा थोड्या जास्त लांब असतात. शरीर निळसर करड्या रंगाचे पृष्ठपक्ष बहुधा बसका व बोथट असतो. गळा आणि छाती यांवर अनुदैर्घ्य (लांबीच्या दिशेत) खोबणी असतात. जगाच्या सर्व मुख्य महासागरांत तो आढळतो. उन्हाळ्यात थंड समुद्रात व हिवाळ्यात उष्ण समुद्रात ते जातात. सर्व देवमाशांत हा अतिशय मौल्यवान समजला जातो.

निळा देवमासा सर्व महासागरांत जरी आढळणारा असला, तरी दक्षिण ध्रुवीय सागरात आणि उत्तर पॅसिफिक महासागरात तो मोठ्या प्रमाणावर आढळत असे. तेल, चरबी, मांस वगैरेंकरिता फार पूर्वीपासून या व इतर देवमाशांची शिकार केली जात असे पण ‘हारपून गन’ च्या (दोराला बांधलेले भाल्यासारखे टोकदार हत्यार फेकणाऱ्या तोफेच्या) शोधामुळे निळ्या देवमाशाच्या शिकारीला खरी सुरुवात झाली. १९२० नंतर या मासेमारीचा पुष्कळ विस्तार झाला आणि १९३०–३१ च्या हंगामात तिने कमाल मर्यादा गाठली. या हंगामात तीस हजार निळे देवमासे मारले गेले. त्यांची संख्या कमी झाल्यामुळे यानंतर ही मासेमारी कमीकमी होत गेली. ही जाती टिकविण्याकरिता इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशनने सर्व समुद्रांतील निळे देवमासे मारण्यावर बंदी घातली आहे. १९६३ मध्ये मोठ्या निळ्या देवमाशांची संख्या ४,००० होती, ती आता ६,००० झालेली आहे. दर वर्षी त्यांच्या संख्येत चार ते पाच टक्क्यांनी वाढ होत असल्यामुळे ते आता लुप्त होण्याच्या मार्गावर नाहीत, असे म्हणता येईल.


आ. २. फिनबॅक व्हेल (फिनबॅक देवमासा)

फिनबॅक व्हेल : सर्व महासागरांत हा आढळतो. उन्हाळ्यात हा थंड समुद्रात आणि हिवाळ्यात उष्ण समुद्रात जातो. हा नेहमी आढळणारा एक सामान्य देवमासा आहे. दक्षिण ध्रुवप्रदेशातील देवमाशांच्या मत्स्योद्योगाचा (मासेमारीचा) हा एक फार मोठा आधार आहे. यांची लांबी सरासरी १८–२१ मी. असते. निळ्या देवमाशापेक्षा हा लहान असून सडपातळ असतो. पृष्ठपक्ष मोठा आणि विळ्याच्या आकाराचा असतो तो पाठीच्या मागच्या भागावर असतो शरीराचा खालचा भाग पांढरा असतो डोक्याची उजवी बाजू डावीपेक्षा जास्त पांढरी असते वरचा जबडा पांढरा पुढच्या / भागातील उजव्या बाजूचे शृंगास्थिपट्ट पांढरे आणि बाकीचे सगळे काळे असतात. हा देवमासा कोळंब्यांवर उदरनिर्वाह करतो, पण कधीकधी तो लहान मासेही खातो.

से व्हेल :(से देवमासा). जपान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यालगतच्या समुद्रात सर्वसाधारणपणे आढळणारा हा देवमासा आहे. याची फारशी शिकार केली जात नाही, कारण याच्या वसेचा थर पातळ असून शरीरात तेलही अगदीच थोडे असते. पण सर्व देवमाशांत याचे मांस अतिशय रुचकर असल्यामुळे जपानी लोक याची शिकार करतात. याची सरासरी लांबी १२–१४ मी. असते. सर्व शृंगास्थिपट्ट काळे असतात. गळ्यावरच्या खोबणी फार लांब नसतात पृष्ठपक्ष काहीसा पुढे असतो.

आ. ३. हंपबॅक व्हेस (कुबड असलेला देवमासा)

हंपबॅक व्हेल : (कुबड असलेला देवमासा). याचे शरीर बरेच अवजड असून डोक्यावर चमत्कारिक गाठी असतात. फ्लिपर देवमाशांच्या इतर जातींपेक्षा जास्त लांब म्हणजे सु. ४ मी. लांब असतात. पाठीवर लहान कुबड असून त्याच्यावर लहान बोथट पृष्ठपक्ष असतो. ही देवमाशाची जाती समुद्रकिनाऱ्याजवळ राहणारी आहे. हा देवमासा सहज मारता येण्यासारखा आहे आणि त्याच्यापासून पुष्कळ तेल मिळते म्हणून मत्स्योद्योगाच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा आहे. याच्या डोक्याच्या गाठींवर, गळ्याच्या खोबणींवर आणि फ्लिपरांवर बार्नेकलांची (एक प्रकारच्या सागरी कवचधारी जीवांची) खूप वाढ होते. यांची लांबी सरासरी १२ मी. असते पण १७ मी. लांबीचे नमुनेही आढळतात. हा देवमासा समुद्रात सुरकांडी मारून १५० मी. खोलीवर जाऊ शकतो.

आ. ४. ग्रे व्हेल (करडा देवमासा)

ग्रे व्हेल : (करडा देवमासा). ही उत्तर पॅसिफिक महासागरात आढळणारी एक जाती आहे. यांची संख्या इतकी कमी झाली आहे की, इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशनने त्यांना पूर्ण संरक्षण दिले आहे. एके काळी यांची शिकार हा एक अतिशय फायदेशीर मत्स्योद्योग होता. यांची जास्तीत जास्त लांबी १३·५ मी. असते. रंग गडद करडा असून त्यावर फिक्कट करड्या रंगाचे लहान डाग असतात. हनुवटीजवळ दोनतीन आखूड आणि उथळ खोबणी असतात. पृष्ठपक्ष नसतो. हंपबॅक देवमाशाप्रमाणे याच्याही शरीरावर बार्नेकलांची वाढ होते. हा समुद्रकिनाऱ्यालगत राहणारा आहे.


आ. ५. राइट व्हेल (राइट देवमासा)

राइट व्हेल : (राइट देवमासा). समशीतोष्ण सागरात राहणारे हे देवमासे आहेत. या माशांबद्दल फारच थोडी माहिती आहे. यांच्या एकंदर पाच जाती आहेत. त्यांपैकी ग्रीनलँड राइट व्हेल आणि काळा राइट व्हेल हे जवळजवळ नाहीसे झालेले आहेत. खुजा राइट व्हेल हा मध्यम आकारमानाचा असून त्याची सरासरी लांबी ६–१८·३ मी. असते. जबडा आणि ओठ विचित्र असतात. इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशनने या देवमाशांना पूर्ण संरक्षण दिले आहे.

दात असलेले देवमासे : या समूहात स्पर्म व्हेल, किलर व्हेल (किलर देवमासा), बीक्‌ड व्हेल (चोच असलेला देवमासा), पायलट व्हेल (पायलट देवमासा), नारव्हेल, बॉटलनोज व्हेल इ. देवमाशांचा समावेश होतो. नर सामान्यतः माद्यांपेक्षा मोठे असतात.

916-4

स्पर्म व्हेल : याला ⇨ कॅशलॉट असेही म्हणतात. हा देवमासा सर्व जगभर आढळतो. हा आक्रमक वृत्तीचा असून कळप करून राहणारा आहे. एका कळपात एक नर आणि कित्येक माद्या असतात. या प्राण्यांच्या नासा–मार्गाच्या एका गुहेत रंगहीन, स्वच्छ, पारदर्शक तेल असते. हवेशी या तेलाचा संपर्क झाला म्हणजे ते गोठून स्पर्मासेटी मेण तयार होते. स्पर्म देवमाशांमध्ये उदी अंबर (अँबरग्रिस) देखील तयार होते.

किलर व्हेल : हा सर्व जगभर थंड पाण्यात आढळणारा लहान देवमासा आहे. नराची लांबी ९ मी. पर्यंत आणि मादीची ६ मी. पर्यंत असते. पृष्ठपक्ष खूप मोठा असतो. डोळ्यावर मोठा पांढरा ठिपका असतो. पाठ आणि बाजू काळ्या असतात. पोट पांढरे असते. प्रत्येक जबड्यात २०–२८ जाड व मजबूत दात असतात. मासे, सील, मोठे सागरी पक्षी हे यांचे भक्ष्य होय. कधीकधी ते देवमासेदेखील खातात. हे अतिशय लुटारू वृत्तीचे असून कोणत्याही प्राण्यावर हल्ला करतात.

पायलट व्हेल : पॅसिफिक महासागरात आढळणारा हा एकच देवमासा असा आहे की, ज्याला पकडून डॉल्फिनप्रमाणे निरनिराळे खेळ करावयास शिकविता येते.

आ. ८. बॉटलनोज व्हेल (लांबट मुस्कट असणारा देवमासा)

बॉटलनीज व्हेल : हे लांब मुस्कट असणारे चमत्कारिक देवमासे असून त्याची लांबी १२ मी. पर्यंत असते. स्पर्म देवमाशांप्रमाणेच ते स्पर्मासेटी हे मेण उत्पन्न करतात. यांच्या कित्येक जाती असून त्या अगदी उत्तरेकडील अथवा अगदी दक्षिणेकडील थंड पाण्यात आढळतात. हे लहान आणि सापेक्षतेने दुर्मिळ असल्यामुळे देवमाशांच्या मत्स्योद्योगात यांना फारसे महत्त्व नाही.

व्हेल मासेमारीपासून होणारे उत्पन्न :तेल: देवमाशाचे तेल मुख्यतः ⇨ मार्गारीन  तयार करण्याकरिता उपयोगात आणतात. ग्लिसरीन, साबण व क्रीम तयार करण्यासाठीही याचा उपयोग करतात. कमावलेले कातडे तयार करण्याकरिताही ते वापरतात. स्पर्म तेल व स्पर्मासेटी यांचा उपयोग मुख्यतः सौंदर्यप्रसाधने आणि मलमे तयार करण्याकरिता करतात. वंगण म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो. देवमाशांची तेले अल्कोहॉल आणि वसाम्ले यांची कार्बनी संयुगे असून त्यांना ‘एस्टरे’ म्हणतात. देवमाशांच्या तेलांचे दोन मुख्य वर्ग पडतात : एक शृंगास्थि–देवमाशांपासून मिळणारे निखालस तेल हे खरेखुरे तेल अथवा वसा असून वनस्पती तेलासारखे असते आणि दुसरे स्पर्म तेल व स्पर्मासेटी, ही दोन्हीही मेणे असतात.


मांस : शृंगास्थि–देवमाशांचे मांस मुख्यतः खाण्याकरिता उपयोगात आणले जाते, कारण ते अतिशय रुचकर असते. आदिवासी जमाती हे मांस खातात पण हल्ली जपानमध्येही त्याचा खाण्याकडे सर्रास उपयोग केला जातो. नॉर्वेमध्ये देखील त्याचा खाण्याकरिता उपयोग करतात. इंग्लंडमधील लोकांचीही हे मांस खाण्याकडे प्रवृत्ती होत चालली आहे. स्पर्म देवमाशांचे मांस विशेष रुचकर नसते.

पिष्ट : तेल काढून घेऊन देवमाशांचे मांस ते वाळवतात आणि नंतर त्याचे पीठ करतात. या पिठात प्रथिनांचे प्रमाण पुष्कळ असल्यामुळे अन्न म्हणून गुरे, कोंबड्या आणि इतर प्राण्यांना ते खाऊ घालतात. पिष्ट तयार करण्याचा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर चालतो. मांसाप्रमाणेच अस्थींचेही पिष्ट करून गुरांना खाऊ घालतात. अस्थी शिजवून वाळवून नंतर त्यांचे पीठ करतात.

उदी अंबर : काही स्पर्म देवमाशांच्या आतड्यापासून मिळणारा हा एक विशिष्ट करडा–पांढरा व पुष्कळ वास असणारा मेणासारखा पदार्थ आहे. अपचनाचा अथवा इतर इंद्रियविषयक रोग झालेल्या स्पर्म देवमाशांपासूनच हा मिळतो अशी कल्पना आहे. सुगंधी द्रव्ये तयार करताना त्यांचा वास स्थिर करण्याकरिता याचा उपयोग करतात. हल्ली हा पदार्थ फार दुर्मिळ झाला आहे [→ अंबर, उदी].

तिमी–शृंगास्थी : हल्ली याचा फारसा उपयोग करीत नाहीत पण अगदी अलीकडच्या काळापर्यंत ब्रश (कुंचले) तयार करण्याकरिता याचा उपयोग करीत असत.

कातडे : देवमाशांचे कातडे फारसे उपयोगाचे नसते, कारण ते फार जाड आणि अतिशय सच्छिद्र असते. तथापि पांढऱ्या देवमाशाचे (बेलुगा) कातडे अतिशय चांगले असून एके काळी ते कमावून त्याचे कंबरपट्टे व लहान गाद्यांचे अभ्रे करीत असत.

पहा : मत्स्योद्योग.

संदर्भ : 1. Slijper, E. Whales, New York, 1962.

           2. Wheat, G. C. Whales and Dolphins : the Largest  and Most Intelligent Animals of the Sea, New York, 1964.

डाहाके, ज्ञा. ल. कर्वे, ज. नी.