दे, बिष्णु : (१८ जुलै १९०९– ). भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि प्रख्यात बंगाली कवी. कलकत्ता येथे जन्म. त्यांचे वडील अबिनाशचंद्र हे बंगाली व इंग्रजी साहित्याचे गाढे अभ्यासक होते. घरी वडिलांनी जमविलेला प्रचंड ग्रंथसंग्रह व वडिलांचे उत्तेजन–मार्गदर्शन बिष्णुबाबूंना त्यांच्या वाङ्मयीन घडणीत फारच उपकारक ठरले. कलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी घेऊन ते एम्. ए. झाले. नंतर त्यांनी कलकत्ता येथील सेंट पॉल्ʼस, रिपन, प्रेसिडेन्सी व मौलाना आझाद ह्या महाविद्यालयांतून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
पौर्वात्य व पाश्चात्त्य संस्कृतींचा त्यांचा व्यासंग सखोल असून ह्या दोन्हीही संस्कृतींचे त्यांना आकर्षण आहे. त्यांच्या कवितेतही ह्या आकर्षणाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. आपल्या काव्यरचनेत आशय व अभिव्यक्तीच्या बाबतींत त्यांनी अनेक प्रयोग केले. लोकगीतांतील व लोकसंगीतातील काही विशेषांचा त्यांनी आपल्या रचनेत कौशल्याने उपयोग करुन घेतला. ते मार्क्सवादी असले, तरी चिंतनशील वृत्ती, जागतिक साहित्य, कला, धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. विषयांचा सखोल व्यासंग, प्रतिभेची उपजत देणगी, वैश्विक आणि मानवतावादी दृष्टिकोन या सर्वांचा समन्वय त्यांच्या कवितेत दिसून येतो. त्यांची कविता सर्वसामान्य वाचकांपेक्षा बहुश्रुत वाचकांनाच अधिक समजणारी आहे. म्हणूनच त्यांना ‘कवींचे कवीʼ म्हटले जाते.
बंगाली काव्यात खोलवर रुजलेला रवींद्रनाथांचा प्रभाव झुगारून देऊन बंडखोरी करणारे आणि स्वतंत्र वळणाची कविता लिहिणारे कवी म्हणून बुद्धदेव बसू, सुधींद्रनाथ दत्त, बिष्णू दे, जीवनानंद दास आणि अमिय चक्रवर्ती या कवींचा उल्लेख करावा लागेल. त्यांतही रवींद्रनाथांनंतरचे सर्वश्रेष्ठ बंगाली कवी म्हणून मुख्यत्वे बिष्णुबाबूंचेच नाव घेतले जाते.
बिष्णुबाबूंनी विपुल लेखन केले. त्यांच्या उल्लेखनीय कृतींची नावे अशी : काव्यसंग्रह : उर्वशी ओ आर्टेमिस (१९३३), चोराबालि (१९३७), पूर्वलेख (१९४१), सातभाई चंपा (१९४५), संद्वीपेर चर (१९४७), अन्विष्ट (१९५०), नाम रेखेछि कोमल गांधार (१९५३), आलेख (१९५८), तुमि शुधु पँचीशै बैशाख (१९५८), स्मृतिसत्ता भविष्यत् (१९६१), सेई अंधकार चाई (१९६६), रुशत्ति पंचारशति (१९६७), संवाद मूलत काव्य (१९६९), इतिहासे ट्रॅजिक उल्लासे (१९७०) इत्यादी. यांशिवाय त्यांनी जगातील प्रसिद्ध अशा सु. साठ कवींच्या निवडक कविता बंगालीत अनुवादित केल्या असून त्यांतील काही कवितांचे सहा संग्रह आजपर्यंत प्रकाशित झाले आहेत. त्यांची नावे अशी : इलिएटेर कविता,समुद्रेर मौन (१९४५),कॅरमेल डॉल (१९४६), हे विदेशी फूल (१९५७), माओ त्से तुंगेर कविता (१९५८)व आफ्रिकाय एशियाय मुरली मृंदगेर तूर्ये (१९७०). निबंधसंग्रह व समीक्षा–लेखसंग्रह : रुचि ओ प्रगति (१९४६), साहित्येर भविष्यत् (१९५२), एलोमेलो जीवन ओ शिल्प–सहित्य (१९५८), साहित्येर देश–विदेश (१९६३), रबींद्रनाथ ओ शितपसाहित्ये आधुनिकतार समस्या (१९६६), मायकेल रबींद्रनाथ ओ अन्यान्य जिज्ञासा (१९६७) इत्यादी. या बंगाली ग्रंथांशिवाय त्यांनी इंग्रजीतही आठ–दहा ग्रंथ लिहिले असून त्यांत प्रामुख्याने चित्रकला व चित्रकार यांचा परामर्श घेतलेला आहे. बेंगॉल पेंटर्स टेस्टिमनी (१९५०), ॲन इन्ट्रोडक्शन टू जेमिनी रॉय (१९५३), इंडिया अँड मॉडर्न आर्ट (१९५७), पेंटिंग्ज ऑफ रबींद्रनाथ टागोर (१९६४), इन द सन अँड द रेन (सौंदर्यशास्त्रावरील निबंध, १९७२) इ. ग्रंथ उल्लेखनीय होत.
प्रेम, सौंदर्य, धर्म इ. मूल्यांचा पुनर्विचार शारीरिक कामना–वासनांचा स्वीकार व त्यांची निर्भय अभिव्यक्ती नगरकेंद्रित यंत्रयुग आणि तदानुषंगिक समस्यांची दखल नव्या युगातील जीवनकलहाची भीषणता, अपरिहार्यता व्यक्तीला हतबल करणाऱ्या प्रमाथी परिस्थितीची तीव्र जाणीव विभिन्न संस्कृतींचे प्रवाह व त्यांतील तत्त्वांचे आकलन फ्रॉइड, युंग इत्यादींच्या मानसशास्त्रातील अबोध मनोव्यापारांचे दर्शन मार्क्सचे तत्त्वज्ञान व नव्या शोषणरहित साम्यवादी समाजरचनेची स्वप्ने इ. अंगांनी त्यांची कविता रूपास आलेली आहे.
टी. एस्. एलियट,एझरा पाउंड इ. पाश्चात्त्य कवींचा प्रभाव काही प्रमाणात बिष्णुबाबूंवर असल्याचे दिसते. एलिएटच्या वेस्टलँडला समांतर असे प्रतीक त्यांच्या चोराबाली (फसवी वाळू) मध्ये आढळते. यात कलकत्ता शहर त्यांना निसरड्या वाळूसारखे वाटते. संमिश्र संवेदनांची उत्कट अभिव्यक्ती, विविधपदरी विचार, जागतिक साहित्यातील विविध प्रतीकांचा व मिथ्यकथांचा कलात्मक समन्वय, विरूपता–अप्रतिरूपता यांची प्रभावी जुळणी, कंसातील शेरे इतर श्रेष्ठ कवींच्या अवतरणांचे आकस्मिक आणि सूचक उपयोजन–विंडबन इ. विशेष त्यांच्या या काव्यात आढळतात.
यानंतरच्या त्यांच्या कवितेत फ्रेंच कवींप्रमाणे अर्धजागृत मनातील अंतःस्तरांचा वेध घेतल्याचे दिसते. अतिवास्तववादी तंत्र वापरून नवीन प्रतीकांची जुळणी ते करताना दिसतात. मंत्रसदृश चरणांची पुनरावर्तने, नादमधुर शब्दांचे झंकार, वाचकांस अनुलक्षून केलेले कथन–आवाहन इत्यादींचा परिपक्व व कलात्मक वापर त्यांच्या कवितेत आढळतो. संथाळी व छत्तीसगढी लोकगीते, बंगाली ‘बारमासियाʼ यांचाही सुंदर समन्वय त्यांनी आपल्या या कवितेत साधला आहे.
स्मृतिसत्ता भविष्यत् ह्या त्यांच्या काव्यसंग्रहास १९६५ मध्ये साहित्य अकादेमीचा व १९७१ मध्ये भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार लाभला. १९६८ मध्ये त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कारही प्राप्त झाला. स्मृतिसत्ता भविष्यत् मध्ये भय, चिंता, शोषण इत्यादींविरुद्ध चाललेला माणसाचा लढा आणि खऱ्यामानवतेच्या प्रस्थापनेसाठी, सौंदर्यासाठी चाललेली कवीची शोधयात्रा प्रतिबिंबित झाली आहे. रवींद्रनाथांनंतरचे सर्वश्रेष्ठ बंगाली कवी म्हणून त्यांना बंगाली साहित्यात मानाचे स्थान आहे.
जोशी, श्री. बा.
“