देवधर, गोपाळ कृष्ण : (२१ ऑगस्ट १८७१–१७ नोव्हेंबर १९३५). थोर भारत सेवक व पुण्याच्या प्रसिद्ध ‘सेवासदन’ संस्थेचे एक शिल्पकार. जन्म पुणे येथे. वडील कृष्णाजी नारायण देवधर एका कंत्राटदाराकडे कारकून होते. प्रतिकूल परिस्थितीत असूनही आपल्या स्वावलंबनाने व चिकाटीने पुण्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’, ‘फर्ग्युसन कॉलेज’ या संस्थातून शिक्षण घेऊन ते १८९७ मध्ये बी. ए. व पुढे १९०३ साली एम्. ए. झाले. मुंबई विद्यापीठातून मराठी हा वैकल्पिक विषय घेऊन एम्. ए. होणारे ते पहिले विद्यार्थी होत. त्यांच्या शैक्षणिक जीवनात सुरुवातीला ‘न्यू इंग्लिश स्कूल’ चे प्राचार्य वामन शिवराम आपटे व पुढे गोपाळ गणेश आगरकर यांचे प्रोत्साहन त्यांना सतत लाभले. उच्च शिक्षणकाळातच ख्रिस्ती मिशनऱ्यांना मराठी शिकविण्याचे कामही त्यांनी केले. मिशनऱ्यांच्या सहवासामुळे त्यांची मूळची सेवावृत्ती अधिकच बळावली. बी. ए. झाल्यानंतर मोठ्या मानाच्या नोकऱ्यांचा मोह टाळून त्यांनी मुंबईच्या ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले (१८९७) व पुढे १९०० मध्ये ते त्या शाळेचे मुख्याध्यापक झाले. त्यांचा विवाह १८८६ सालीच पुण्याच्या सोहनी कुटुंबातील अन्नपूर्णाबाई यांच्याशी झाला.

इ. स. १९०४ च्या सुमारास गोपाळ कृष्ण गोखल्यांशी त्यांचा संबंध आला व त्यांच्याबरोबर १९०५ साली ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना करण्यात त्यांनी भाग घेतला. या समाजाचे ते पहिले सभासद झाले. १९०६ मध्ये पुण्यातील प्लेगच्या साथीत त्यांनी रोग्यांच्या शुश्रुषेचे व आपद्ग्रस्तांच्या पुनर्वसनाचे फार मोठे समाजकार्य केले. त्यातूनच प्रशिक्षित परिचारिकांची गरज समाजाला किती मोठी आहे, याची जाणीव त्यांना झाली. रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या ‘सेवासदन’या संस्थेचे ते अनेक वर्षे कार्यवाह होते. या संस्थेच्या उभारणीत व भरभराटीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीचे ध्येयधोरण ठेवून ही संस्था त्यांनी नावारूपास आणली. या संस्थेने पुण्याच्या ‘ससून हॉस्पिटल’ च्या परिचारिकांसाठी जी इमारत बांधली, तिला देवधरांच्या मृत्यूनंतर ‘देवधर नर्सेस हॉस्टेल’असे नाव देण्यात आले. १९२१ मध्ये मलबारमधील मोपला बंडाच्या वेळी आपद्ग्रस्तांचे पुनर्वसनकार्य त्यांनी केले. पुण्याजवळच खेड–शिवापूर या खेड्यात एक ग्रामीण सेवा केंद्र त्यांनी सुरू केले. भारतीय समाजाच्या दृष्टीने सहकारी चळवळीची गरज त्यांनी त्या वेळीच ओळखली होती व एक सहकारी पतपेढी त्यांनी १९०९ मध्ये हडपसर येथे स्थापनही केली होती. त्यासाठी प्रशिक्षित सेवकवर्ग तयार करण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘बाँबे को–ऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट’ सुरू केली. १९२७ ते १९३५ या काळात ते ‘भारत सेवक समाजा’ चे अध्यक्ष होते. लखनौ (१९२९) आणि मद्रास (१९३३) येथील ‘ऑल इंडिया सोशल कॉन्फरन्स’चेही ते अध्यक्ष होते. १९१८ ते १९१९ या कालावधीत त्यांनी यूरोप खंडाचा प्रवास केला.

‘भारत सेवक समाजा’च्या ज्ञानप्रकाश या दैनिकाचे व शेती आणि शेतकरी या नियतकालिकांचे संपादनकार्य त्यांनी केले. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यताविरोधी संघटनेचे ते प्रांतिक अध्यक्ष होते. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

विशुद्ध सेवाभावाने व राष्ट्रीय उद्धाराचे भान राखून आमरण लोकसेवा करणारा एक थोर भारत सेवक म्हणून देवधरांचे नाव कायम राहील. ‘सेवासदन’ संस्था ही तर त्यांच्या समाजसेवेचे मूर्तिमंत प्रतीक होय.

जाधव, रा. ग.