देवगड : रत्नागिरी जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण. हे विजयदुर्गच्या दक्षिणेस १९ किमी. आणि मुंबईपासून २९० किमी.वर कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या नैर्ॠत्येस १२९ किमी. समुद्रकिनारी वसले आहे. लोकसंख्या २,३९७ (१९७१). हे पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील कारवार ते जयगड दरम्यानचे एकमेव सुरक्षित बंदर आहे. जगप्रसिद्ध हापूस आंबे या बंदरातून निर्यात होतात. देवगडचा ‘तामर’ असा १५३८ मधील उल्लेख आढळून येतो. १८१८ मध्ये हे बंदर ब्रिटिशांनी घेतले. या गावाच्या दक्षिणेस १७२९ मध्ये दत्ताजीराव आंग्रे यांनी बांधलेला किल्ला आहे. या किल्ल्याचा उपयोग दीपगृह व वेधशाळेसाठी इंग्रजांनी केला होता. देवगडला आधुनिक पद्धतीचे दीपगृह आहे. येथे दोन ग्रंथालये, डाक व तारगृह, गुरांचा दवाखाना इ. सोयी तसेच प्राथमिक आरोग्यकेंद्र, प्रवासी बंगला व दोन धर्मशाळाही आहेत.
गाडे, नामदेव