दुर्बल : (स्विफ्ट). चिमणीएवढ्या आणि पंख भराभर हालवून उडणाऱ्या पुष्कळ पक्ष्यांना महाराष्ट्रात पाकोळ्या म्हणतात. त्याचप्रमाणे संध्याकाळी उडणाऱ्या एका लहान वटवाघळालाही पुष्कळ लोक पाकोळी म्हणतात. पण वटवाघळे सस्तन प्राणी आहेत, पक्षी नाहीत. ज्यांना पाकोळ्या म्हणतात त्या पक्ष्यांपैकीच दुर्बल हा एक असून दुसरा ⇨ भांडीक आहे. दुर्बल आणि भांडीक यांत वरकरणी थोडे साम्य असते.
दुर्बल मायक्रोपोडिडी पक्षिकुलातील आहे. यांच्या सहा–सात जाती भारतात आढळतात, त्यांपैकी एकीला सामान्य दुर्बल अथवा भारतीय दुर्बल असे म्हणतात. यांचे शास्त्रीय नाव एपस ॲफिनिस असे आहे. हा भारतात सगळीकडे आणि हिमालायात १,८३० मी. उंचीपर्यत आढळतात.
हा चिमणीपेक्षा लहान असतो डोक्याचा माथा भुरा शरीराचा रंग धुरकट काळा हनुवटी व गळा पांढरा कंबर पांढरी शेपटी आखूड पण दुभागलेली पंख अरुंद, लांब, शेपटीच्या बरेच पलीकडे गेलेले चोच काळी व अगदीच लहान, पण जिवणी बरी रुंद पाय अतिशय आखूड, तपकिरी, पायांवर चार बोटे असून ती पुढच्या बाजूला असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात.
हे पक्षी मनुष्यवस्तीच्या आसपास जमावाने राहतात जमावानेच उडत असतात. जुनाट किल्ले, पडक्या मशिदी, ओसाड हवेल्या व देवळे अशा ठिकाणी हे राहतात.
उडणारे किडे हे यांचे भक्ष्य होय. हवेत उडत असतानाच ते आपले भक्ष्य पकडतात. जवळजवळ सगळा दिवस ते उडण्यात घालवितात, पायाची बोटे पुढे असल्यामुळे त्यांना झाडावर किंवा तारेवर बसता येत नाही. विश्रांती घेण्याकरिता ते भिंतीला, खडकाला किंवा अशाच आधाराला चिकटतात किंवा लकटतात अथवा सरळ घरट्यात जाऊन बसतात.
ह्यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारीपासून सप्टेंबरपर्यंत असतो. घरटी वाटीसारखी आणि मुख्यतः मऊ पिसे व गवत लाळेने चिकटवून बनविलेली असतात. भिंतीचे कोपरे, छते, पुलांच्या कमानी, घुमट वगैरे ठिकाणी ती चिकटविलेली असतात. हे पक्षी जमावाने राहणारे असल्यामुळे ५०–६० घरीटी एके ठिकाणी असतात. मादी दोनचार पांढरी अंडी घालते दोघेही पिल्लांचे संगोपन करतात. घरट्यांचा उपयोग रात्री झोपण्याकरिता व विश्रांतीकरिता होतो.
कर्वे, ज. नी.
“