दुर्गाबर कायस्थ : (सोळावे शतक). एक असमिया कवी. कोच राजा विश्वसिंग (१५१०–४०) याच्या कारकीर्दीत दुर्गाबर होऊन गेला. आपल्या एका काव्यात त्याने विश्वसिंगाची स्तुती केली आहे. नीलाचल पर्वतावर कामाख्या देवीच्या सान्निध्यात दुर्गाबराचे वडील चंद्रधर कायस्थ राहत होते. दुर्गाबर शिवशक्तीचा उपासक असल्याचे दिसते. दुर्गाबराने बहुबल सिकदार याचे आपण फार ऋणी असल्याचा उल्लेख केला आहे. बहुबलाला त्याने साक्षत गंधर्वाचा अवतार म्हटले आहे. बहुबलाकडून दुर्गाबराने संगीताचे शिक्षण घेतले असावे. दुर्गाबर हा एक पट्टीचा संगीतकार व प्रतिभासंपन्न कवी होता. त्याचे दोन प्रसिद्ध काव्यग्रंथ म्हणजे गीतिरामायण आणि बेउला आख्यान हे होत. गीतिरामायणात त्याने गीते व आख्यानपर रचनेतून मोठ्या कौशल्याने रामकथा चित्रित केली आहे. यातील गीते शास्त्रीय रागदारीत आहेत. प्रमुख पात्रांच्या जीवनातील कसोटीच्या व नाट्यमय प्रसंगी, त्यांच्या मनातील भावभावनांचे मार्मिक व सूक्ष्म विश्लेषण कवीने त्यात केले आहे. बेउला आख्यानात नागदेवता मनसा ऊर्फ पद्मा व चांद नावाचा शैव व्यापारी यांच्यातील संघर्षाची, तसेच आपल्या मृत पतीस पुन्हा जिवंत करणारी चांद व्यापाऱ्याची सून बेउला हिची कथा वर्णन केलेली आहे. दुर्गाबराची रचना भावगीतात्मक व संगीताच्या मधुर लयीने संपन्न आहे. त्याने आपले गीतिरामायण हे काव्य मुख्यत्वे आसाममधील ‘ओजापाली’ नावाच्या लोकनाट्यासाठी लिहिले आणि ते अत्यंत लोकप्रियही झाले.
सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)