दुर्गापूर : पश्चिम बंगाल राज्याच्या बरद्वान जिल्ह्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या २,०७,२३२ (१९७१). हे दामोदर नदीच्या डाव्या काठावर असून आसनसोल–बरद्वान रेल्वेफाट्यावर, राणीगंजच्या आग्नेयीस २४ किमी. आहे. कलकत्ता, बरद्वान व आसनसोल या शहरांशी हे रस्त्यांनी व लोहमार्गांनी जोडलेले आहे. याच्या आसमंतात तांदूळ, गहू, ऊस, बटाटे इ. पिके होतात. ग्रेट ब्रिटनच्या साहाय्याने येथे १९६२ मध्ये सरकारी लोखंड व पोलाद कारखाना निघाला असून झरिया व राणीगंज कोळसा क्षेत्र, कलकत्ता बंदर, बिहार–ओरिसाचा लोहधातुकाचा पुरवठा, दामोदर नदीवरील दुर्गापूर बंधाऱ्याचे पाणी व वाहतुकीच्या आधुनिक सोयी इत्यादींचा यास लाभ होतो.
येथे धातू व विशेषतः पोलाद, कोळसा खाणींची यंत्रे, विटा व कौले, दगडी कोळसा–शुद्धीकरण हे इतर प्रमुख कारखाने आहेत. येथे दोन मोठी औष्णिक विद्युत् केंद्रेही आहेत. येथे तयार होणारा कोल गॅस कलकत्त्यास नळाने पाठविण्यात येतो. बरद्वान विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कलकत्त्याच्या रविंद्र भारती विद्यापीठाशी संलग्न संगीत शाळा येथे आहे.
कांबळे, य. रा.