दुरियन : (इं. सिव्हेट, फ्रूट लॅ. डुरियो झिबेथिनस कुल–बॉम्बॅकेसी). सु. २८ मी. उंचीचा हा मोठा, शोभिवंत व सदापर्णी वृक्ष मूळचा इंडो–मलायातील असून मलेशिया, इंडोनेशिया येथे तसेच भारतात निलगिरी व प. किनाऱ्यावर काही ठिकाणी लागवडीत आहे. पाने साधी, एकाआड एक, अखंड, चिवट, लंबगोल व लांबट टोकाची असून खालच्या बाजूवर सोनेरी लव असते. फुले ७·५ सेंमी. व्यासाची, मोठी व पांढरट असून बाजूच्या वल्लरीवर वा झुबक्याने मार्च–एप्रिलमध्ये येतात. ती अरसमात्र असून छदमंडलावर सवंर्त घंटाकृती व पंचखंडी असतो. पुष्पमुकुट त्रिखंडी केसरदले अनेक असून पाकळ्यांसमोर त्यांची ४–६ झुबक्यांची नलिका बनते. परागकोश एक किंवा अनेक व एकाच कप्प्याचा किंजपुट ऊर्ध्वस्थ व ४–५ कप्प्यांचा बीजके अनेक [→ फूल]. फळ मांसल, गोलसर, मोठे, १५–२० सेंमी. असून बाह्यावरण कठीण, फणसासारखे काटेरी असते जुलै ते सप्टेंबरात फळे पिकतात नंतर फळाची पाच शकले होतात त्यातील घट्ट पिवळट मगजात (गरात) अनेक अध्यावरणयुक्त (जादा वेष्टन असलेल्या) बिया असतात त्यांचे वजन सु. २·५ किग्रॅ असते. मगजाला चीज, कुजकाकांदा व टर्पेंटाइन यांसारखा उग्र वास येतो तो कित्येकांना आवडत नाही. त्याला सिव्हेट (झिबेट) मांजरासारखा वास असल्याने त्यावरून इंग्रजी नाव पडले आहे. काही इतर जाती बोर्निओत असून त्यांच्या फळांना वास नसतो. नवीन लागवड बियांनी वा छाट कलमांनी करतात. बिया आठ दिवसांत रुजतात. याला खोल, सकस, गाळाची किंवा दुमट जमीन लागते. भारतात ९–१२ वर्षांनी फळे लागतात. सवयीने फळ आवडू लागते. त्यात क जीवनसत्त्व आणि स्टार्च व शर्करा प्रत्येकी १२% असतात. कच्च्या फळांची भाजी करतात. बिया भाजून ⇨ चेस्टनटाप्रमाणे खातात. मलेशियात पाने, मुळे व फळांची साल औषधात वापरतात. फळ पौष्टिक मुळांचा काढा ज्वरनाशी जावामध्ये फळाची साल त्वचारोगांवर बाह्योपचारार्थ वापरतात. प्रसूतीनंतर या सालीची राख देतात. लाकूड नरम, न टिकणारे व वाळवीने नष्ट होणारे असल्याने झोपड्यांना फक्त आतील बाजूस वापरतात.
पहा : बॉम्बॅकेसी.
संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. III, New Delhi, 1952.
परांडेकर, शं. आ.
“