दुग्गल, कर्तारसिंग : (३ जानेवारी १९१७– ). प्रसिद्ध पंजाबी लघुकथाकार व कादंबरीकार. जन्म रावळपिंडी जिल्ह्यातील धमियाल येथे. पंजाब विद्यापीठातून इंग्रजी घेऊन ते एम्. ए. झाले. दिल्ली आकाशवाणीवर केंद्र संचालक, नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक, नियोजन आयोगाचे सल्लागार इ. महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. पीस फाउंडेशन, नॅशनल बुक डेव्हलपमेंट बोर्ड, राजा राममोहन लायब्ररी फाउंडेशन इ. अनेक संस्थांचे ते सदस्य आहेत.
कर्तारसिंगांनी विपुल लेखन केले आहे. त्यात १८ कथासंग्रह, ४ कादंबऱ्या, ६ नाटके, ५ एकांकिकासंग्रह, २ काव्यसंग्रह, १ समीक्षाग्रंथ इत्यादींचा अतर्भाव होतो. विविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले असले, तरी पंजाबीत कथाकार म्हणूनच ते विशेष प्रसिद्ध आहेत. पंजाबी कथेला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. सुरुवातीस ‘कलेसाठी कला’ ह्या दृष्टिकोनातून त्यांनी आपले कथालेखन केले तथापि स्वातंत्र्योत्तर काळात मात्र त्यांचा हा दृष्टिकोन बदललेला दिसतो. देशाच्या फाळणीमुळे सर्वसामान्य माणसास ज्या सामाजिक–राजकीय समस्यांना तोंड द्यावे लागले, त्यांचे उत्कृष्ट चित्रण त्यांच्या कथांत आढळते.
त्यांच्या कथालेखनावर फ्रॉइड, मोपासां, मिंटो यांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या कथांतील बहुतेक व्यक्तिरेखा काम व मोह यांनी झपाटलेल्या दिसतात. त्यांच्या कथांच्या यशाचे रहस्य त्यांच्या भाषेवरील, विशेषतः पोथोहारी बोलीवरील, असामान्य प्रभुत्वात आहे. त्यांनी ग्रामीण व विशेषतः नागर जीवनाचे मनोहर दर्शन आपल्या कथांत घडविले. त्यांच्या बहुतांश व्यक्तिरेखा समाजाच्या कनिष्ठ आणि मध्यम वर्गातील आहेत. मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा ते आपल्या कथांत कौशल्याने वापर करतात. अनेक प्रसंगांची मालिका विणून त्यांचा एकात्मक परिणाम घडविण्यात ते सिद्धहस्त आहेत. नेमक्या आणि आणि मोजक्या शब्दांत ते अपेक्षित वातावरण निर्मिती करतात. एक यशस्वी व श्रेष्ठ कथाकार म्हणून त्यांचे स्थान पंजाबीत महत्त्वपूर्ण मानले जाते.
त्यांच्या कादंबऱ्यांवर इंग्रजीतील विविध प्रकारच्या कादंबऱ्यांचा संमिश्र प्रभाव आहे. आद्राँ आणि नहूँ ते मास ह्या त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या असून आद्राँमध्ये त्यांनी पोथोहार विभागातील एका जमीनदाराचे जीवन चित्रित केले आहे. फ्रॉइडवादी दृष्टिकोनामुळे त्यांच्या कादंबऱ्याच्या कलात्मक विकासास बाध येतो, असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. त्यांच्या कादंबऱ्या मूलतः स्वच्छंदतावादी वृत्तीच्या निदर्शक आहेत. १९६१ मध्ये पंजाब सरकारने त्यांच्या साहित्यसेवेबाबत त्यांचा सन्मान केला. १९६५ मध्ये त्यांच्या इक छित चनाँ दी ह्या कथासंग्रहास साहित्य अकादेमीचा पुरस्कारही मिळाला.
त्यांच्या उल्लेखनीय कृतींची नावे अशी : कथासंग्रह-पिप्पल पत्तियाँ (१९४१), स्वेर सार (१९४२), कुडी कहाणी करदी गई (१९४३), अग खान–वाले (१९४८), लडाई नही (१९५३), फूल तोडना मना है (१९५४), करामात (१९५७), इक छित चनाँ दी कादंबऱ्या–आद्राँ (१९४८), नहूँ ते मास (१९५१) एकांकिकासंग्रह–इक सिफर सिफर (१९४९), सत नाटक (१९५) इत्यादी.
के. जगजीत सिंह (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)
“