दिव्य : एखाद्या आरोपीने म्हणजे शोध्याने गुन्हा केला आहे की नाही, हे ठरविण्यासाठी किंवा एखाद्या व्यवहारातील सत्यासत्य जाणण्यासाठी उपयोगात आणली जाणारी न्यायदानाची एक प्राचीन दैवी पद्धत. या पद्धतीत प्रतिवादीला (व क्वचित वादीला) आपली बाजू सिद्ध करण्यासाठी दुःसह व धोकादायक अशी एखादी गोष्ट करावी लागे. म्हणूनच ‘दिव्यातून जाणेʼ (कठीण प्रसंगातून जाणे) हा वाक्‌प्रचार रुढ झाला आहे. दिव्यक्रिया जगातील बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये होती.

कधीकधी न्यायदानासाठी कागदपत्र (लेख्य), साक्षीदार, भोगवटा किंवा वहिवाट यांसारखा पुरावा मिळत नाही. अशा प्रसंगी दिव्यक्रियेने निर्णय केला जातो. सर्वसाक्षी देवांना सत्यासत्य ठाऊक असल्यामुळे ते निरपराध व्यक्तीचे संरक्षण करतात व तिला कोणतीही इजा पोहोचू देत नाहीत उलट अपराधी व्यक्तिला हे देवतासंरक्षण मिळत नाही, या तत्त्वानुसार दिव्य करावयास लावणे म्हणजे देवतांचा न्यायनिर्णय मागणे, असे समजले जाते. देवांनी स्वर्गात (‘दिवʼ म्हणजे स्वर्ग) याचा प्रयोग केला होता म्हणून याला ‘दिव्य’ हे नाव मिळाले, असेही मानले जाते. मानवी साक्षीदाराप्रमाणे देवता क्रोध, स्नेह, मत्सर, लोभ याच्या आहारी जाऊन असत्य सांगत नाही, हे दिव्याचे माहात्म होय. परिस्थितिजन्य असा मानवी पुरावा मिळत नसेल, तरच दिव्याचा अवलंब करावा असा दंडक असे. दिव्य करणारी व्यक्ती दोषी ठरल्यास शिक्षेस पात्र होईनिर्दोष ठरल्यास विरुद्ध पक्षाची व्यक्ती शिक्षेस पात्र होई. कित्येकदा निर्दोष व्यक्ती दिव्याला अनुकूल असते परंतु दोषी व्यक्ती भीतीमुळे त्यास तयार होत नाही व गुन्हा कबूल करते किंवा त्या व्यक्तीची टाळाटाळ पाहूनच तिचे अपराधित्व ओळखता येते. दिव्याची ही न्यायदान प्रथा या भावनेतून सुरू झाली असावी. काही वेळा दिव्यामध्ये फसवणुकीचे प्रकार झाले असल्यामुळे निरपराध व्यक्तीस शासन होते व अपराधी व्यक्ती काहीतरी युक्ती करून सहीसलामत सुटते, असा आक्षेप या प्रथेवर घेण्यात आला. अग्नी, पाणी इ. निसर्गतः अचेतन असल्यामुळे त्यांच्याकरवी निर्णय घेणे चुकीचे आहे, असाही आक्षेप दिव्यावर घेतला जाई. निरपराध व्यक्तीच्या विरुद्ध निर्णय झाल्यास, पूर्वजन्मातील पाप हे त्यास कारण होय अग्नी, जल इ. तत्त्वांत चेतन अशा अधिष्ठात्री देवता वसत असतात, अशा वरील आक्षेंपाना उत्तरे देण्यात आली आहे. दिव्यातून विजयी होणाराची सामाजिक प्रतिष्ठा वाढत असते. कित्येकदा अशा घटनांभोवती पुराणकथाही गुंफल्या जात. काही दिव्यांत योगायोगाचा भाग असे. दिव्याप्रमाणेच शपथेचाही उपयोग सत्यशोधण्यासाठी केला जातो आणि शपथ शब्दाचा दिव्य असा अर्थही आहे. परंतु शपथ शाब्दिक असते, तर दिव्य हे शारीरिक असते. अपराध क्षुल्लक असेल, तर शपथ आणि गंभीर असेल तर दिव्य, असा फरक केला जाई.

दिव्यक्रिया भारतात प्राचीन काळापासून रूढ होती. ऋग्वेदअथर्ववेद यांत दिव्याचा पुरस्कार केला आहे, की नाही यांविषयी मतभेद आहेत. तांड्य आणि पंचविश ही ब्राह्मणे, छांदोग्योपनिषद तसेच आपस्तंब धर्मसूत्र यांत मात्र दिव्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. याज्ञवल्क्यनारद ह्या स्मृती तसेच शुक्रनीतिसार यांत दिव्यांची चर्चा आहे. मिताक्षरा, स्मृतिचंद्रिका, व्यवहारमयुख, दिव्यतत्त्व, व्यवहारप्रकाश इ. धर्मनिबंधांत दिव्यांचे सविस्तर विवेचन आहे. शिवाजी महाराज, पेशवे, गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज इत्यादींच्या काळातील कागदपत्रे व प्राचीन शिलालेख यांवरून त्या त्या काळात दिव्ये झाल्याचे समजते. मराठी राज्यात अठराव्या शतकापर्यंत आणि भारतीय न्यायसंस्थेत एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत दिव्यक्रियेला वैध मानले जाई. दिव्याचे नऊ मुख्य प्रकार होते. हातात अग्नी धरणे किंवा अग्नीतून चालत जाणे हे अग्नीदिव्य होय. जलदिव्य करताना विवक्षित काळ पाण्यात बुडून रहावे लागे. उकळत्या तेला–तुपांतून सोन्याचा तप्त तुकडा काढणे म्हणजे तप्तमाषक (किंवा रवा काढणे) दिव्य होय. तापलेला फाळ जिभेने चाटणे हे तप्तफाल दिव्य होय. विषदिव्यात विषाची ठराविक मात्रा तीसपट मिसळून दिली जाई. तुला उर्फ धट या दिव्यात शोध्याचे वजन दोन वेळा करीत व दोषी असल्यास अपराधाच्या भाराने वजन वाढते असे मानत. कोशपानदिव्यात देवाचे तीर्थ प्यावयास दिल्यानंतरच्या चौदा दिवसांत काही संकट शोध्यावर कोसळले, तर त्यास दोषी मानत. तंडुल दिव्यात गिळलेले मंत्रित तांदूळ थुंकल्यानंतर थुकींत रक्त आढळल्यास दोषी मानले जाई. धर्मदिव्यात मातीच्या दोन गोळ्यांत लपविलेल्या धर्म व अधर्म यांच्या प्रतिमांपैकी धर्माची उचलल्यास निर्दोष मानले जाई. नाग असलेल्या भांड्यातून अंगठी काढणे डोळ्यावर लाल मिरची घासणे तसेच नदीत उभे राहून, मुलाच्या डोक्यावर हात ठेवून बेल–भंडार घेऊन हरिवंश ग्रंथ डोक्यावर ठेवून, गायीचे शेण वा तुळसीपत्र हातात घेऊन शपथ घेणे इ. दिव्यक्रियाही रूढ होत्या.

राजा, ब्राह्मण, मंत्री, धर्मशास्त्रवेत्ते इत्यादींच्या साक्षीने दिव्यक्रिया करीत. देवतेसमोर, चव्हाट्यावर किंवा पवित्र नदीपाशी सभा भरे. क्रियेच्या आरंभी न्यायसभेतील सभासदांनी उपवास, स्नान इ, विधी करावेतनंतर दिव्याची देवता व धर्म आणि आठ दिक्पाल, आठ वसू, बारा आदित्य, अकरा रुद्र, आठ मातृका, गणेश, सात मरुत, दुर्गा इ. देवदेवतांना आवाहन करुन त्यांना स्थाने द्यावीत वादी व प्रतिवादी यांनी उपवास, स्नान करावे. नंतर ऋत्विजांनी आहुती देण्यासारखे विधी करुन शोध्याला दिव्य करावयास लावावे, असे नियम असत. दिव्याचा प्रकार वादीप्रतिवादींच्या संमतीने निश्चित केला जाई.


दिव्याचे अधिष्ठान जरी दैवयोग व चमत्कार होते, तरीही दिव्याचा निर्णय दोघांनाही ग्राह्य वाटे, असे ऐतिहासिक कागदपत्रांवरून निश्चित म्हणता येते. आरोपीचा वर्ण, जात, धंदा, अधिकार व त्याच्या अपराधाचे स्वरूप लक्षात घेऊन त्याने कोणते दिव्य करावे, हे ठरविले जाई तसेच दिव्यप्रकार लक्षात घेऊन दिव्य करण्याची वेळ, ऋतू इ. ठरविले जात. शास्त्राविरुद्ध व अयोग्य स्थलकाली केलेले दिव्य अवैध मानले जात असे. स्त्री, अज्ञान, म्हातारे, आंधळे, पंगू, रोगी व ब्राह्मण यांनी तुलादिव्य क्षत्रियांनी अग्निदिव्य वैश्यांनी जलदिव्य आणि शूद्रांनी विषदिव्य करावे त्याचप्रमाणे लोहारांना अग्निदिव्य, नावाड्यांना जलदिव्य, ब्राह्मणाना विषदिव्य देऊ नये असे दंडक होते. कोशपान सर्व विवादांत करण्यास मुभा होती. मद्यपी, विषयासक्त जुगारी यांना कोशपानदिव्य देऊ नये, असाही दंडक होता. वर्णबाह्य लोकांना त्यांच्यात रूढ असलेली दिव्ये करू दिली जात. काही वेळा दिव्य स्वतः करावयाचे नसल्यास आपले नातेवाईक अथवा मित्र यांना दिव्य करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून नेमता येई. भारतीय दिव्यविचारात सापेक्षतया शोध्याबद्दल अधिक सहानुभूती व सुजाणपणा जाणवतो, असे म्हणता येईल.

बॉबिलोनियन (सुमेर, अक्कड वगैरे) संस्कृतीत जलदिव्ये केली जात. दिव्याचा निर्णय विरुद्ध गेल्यास मृत्युदंड मिळे. हामुराबीच्या कायद्यांत दिव्यक्रिया दिल्या आहेत. पारशी धर्मात ३३ दिव्ये मानली आहेत. जरथुश्त्रांनी अनेक दिव्ये केली. त्यांच्या अवेस्ता धर्मग्रथांत दिव्यविषयक उल्लेख संदिग्ध असले, तरी पेहलवी साहित्यातील अग्नी, विष, तप्तमाषक इ. दिव्यांचे उल्लेख निःसंदिग्ध आहेत. हिब्रूंच्या जुन्याकरारात व्यभिचाराचा आरोप असलेल्या स्त्रीला प्रार्थनामंदिरातील धूळ मिसळलेले पाणी प्यावयास देण्याचे दिव्य सांगितले आहे. इस्लामपूर्व अरबांत दिव्यप्रथा होती, परंतु इस्लामच्या उदयानंतर ती बंद झाली. स्लाव्ह लोकांतही दिव्यप्रथा होती. रशियातील प्रथेवर स्कँडिनेव्हियन प्रथेचा प्रभाव होता. ग्रीकांमध्ये शोध्याने विशिष्ट मंदिरात प्रवेश केल्यावर तो वेडा झाला, तर त्याला दोषी मानावे तसेच शोध्याने हॉर्‌कॉस नदीच्या काठी खोटी शपथ घेतली, तर नदी त्याला भोवऱ्‍याकडे ओढते. इ. दिव्यविषयक कल्पना होत्या. द्वंद्वयुद्धदिव्यसुद्धा ग्रीकांना मान्य होते. ट्यूटॉनिक लोकांत तप्तमाषक, तप्तफाल यांसारखी दिव्ये तसेच द्वंद्वयुद्धही प्रचलित होते. चिनी कायद्यात दिव्यांना जरी स्थान नसले, तरी नैर्ऋत्य चीनमधील काही लोक (चिनी नसलेले) दिव्ये करीत, केल्टिक लोकांत (आयरिश, वेल्श, गॉल) द्वंद्वयुद्धावर भर असे. औरसरता ठरविण्यासाठी तेथे उदकदिव्य केले जाई. यूरोपीय ख्रिश्चनांत द्वंद्वयुद्ध, उंच पसरलेल्या हातांत जास्त वेळ क्रॉस धरून ठेवणे, क्रॉसयुक्त काठी व साधी काठी पुरून त्यांतील क्रॉसयुक्त काठी काढणे इ. दिव्ये होती. त्यांच्यात खून झालेल्या व्यक्तीच्या प्रेताला आरोपीने स्पर्श केल्यावर जर प्रेताच्या शिरा फुटून रक्त वाहिले, तर गुन्हा सिद्ध होई. इंग्लंडमध्ये १२१५ साली दिव्यांवर बंदी घातली, तरी एकोणिसाव्या शतकापर्यंत तेथे द्वंद्वयुद्धे चालू होते.

मादागास्कर बेटांत दिव्यानंतर अपराधी ठरणारांना दगडकाठ्यांनी मारून हिंस्त्र प्राण्यांपुढे टाकत आणि त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्या बायकामुलांना गुलाम बनवत. ब्रह्मदेशात दोघांनी पेटविलेल्या मेणबत्त्यांपैकी ज्याच्या आधी विझत तो दोषी ठरे. आदिम जमातींत शामानच्या देखरेखीखाली दिव्ये केली जातात. मेलानेशियन मांत्रिक कायदेशीर दिव्ये घडविण्याचा धंदाच करतात. न्यू गिनीमध्ये लाल रंगाचे विशिष्ट पाणी प्यावयास देतात आणि दोषी ठरल्यास त्याला दगडांनी ठेचून व फरफटत ओढून ठार मारतात.जपानमध्ये द्वंद्वयुद्ध दिव्य प्रामुख्याने केले जाई.

संदर्भ­­: 1.Gune, V. T. The Judicial Of Marathas, Poona, 1953,

          2. Kane, P. V. History Of Dharmasastra, Vol. IIl, Ordeals, Poona, 1973.

          ३. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. धर्मकोश, व्यवहारखंड, पूर्वार्ध, वाई, १९३७.

साळुंखे, आ. ह. दीक्षित, हे. वि.