दिङ्नाग : (पाचवे शतक). बौद्ध न्यायशास्त्राचा मुख्य प्रवर्तक. तिबेटी परंपरेप्रमाणे दिङ्नाग हा दक्षिण भारतात कांची शेजारच्या सिंहवक्त्रा नावाच्या गावी ब्राह्मण कुळात जन्मला पण त्याचे अध्ययन वसुबंधूजवळ झाले. त्याने ओरिसा, महाराष्ट्र वगैरे भागांत परिभ्रमण केले होते. बिहार प्रांतात नालंदा येथे गेला असता त्याने सुदुर्जय नावाच्या ब्राह्मण नैयायिकाचा वादात पराभव केला. प्रथम तो हीनयानपंथी होता पण पुढे तो महायानपंथी झाला. न्यायशास्त्रावर त्याने संस्कृतमध्ये लहानमोठे सु. १०० ग्रंथ लिहिले. त्यांत प्रमाणसमुच्चय, न्यायप्रवेश, हेतुचक्रडमरू, प्रमाणशास्त्र न्यायप्रवेश इत्यादींचा प्रामुख्याने निर्देश करता येईल. न्यायप्रवेश ह्या एका ग्रंथाचा अपवाद सोडल्यास त्याचे अन्य ग्रंथ मूळ स्वरूपात उपलब्ध नाहीत तथापि त्यांतील बरेच ग्रंथ तिबेटी वा चिनी अनुवादरूपाने उपलब्ध आहेत. दिङ्नागाचे ग्रंथ त्यावेळी भारतातील सर्व विद्याकेंद्रातून पाठ्यपुस्तकांप्रमाणे अभ्यासिले जात असल्याचा निर्वाळा इत्सिंगने दिला आहे.
दिङ्नागाने आपल्या ग्रंथांतून वात्स्यानाच्या न्यायभाष्याच्या काही सिद्धांतावर टीका केली आहे. उद्योतकराने उलट वात्स्यानाचे समर्थन करण्याकरिता न्यायवार्तिक लिहिले. दिङ्नाग हा पारंपरिक न्यायदर्शन आणि बौद्ध न्यायशास्त्र यांतील महत्त्वाचा दुवा म्हणता येईल. तमिळ भाषेत मणिमेखले नावाचे जे महाकाव्य आहे, त्यावर दिङ्नागाच्या न्यायपद्धतीची छाप दिसते, असे तमिळ विद्वानांचे मत आहे. ओरिसाच्या वनात त्याचे निधन झाल्याचे सांगितले जाते.
बापट, पु. वि.