दिग्बोई : आसाम राज्यातील खनिज तेलासाठी प्रसिद्ध असलेले शहर. लोकसंख्या १६,५३८ (१९७१) दिग्बोई तेल–शहर (१५,८५०). हे लखिमपूर जिल्ह्यात दिब्रुगडच्या पूर्वेस ७२ किमी. दिब्रुगड–लिखपानी लोहमार्गावर व महामार्गावर असून लखिमपूरशी सडकेने जोडले आहे. दिग्बोईच्या सभोवती अर्धवर्तुळाकार पर्वतश्रेणी असून तिच्यातील विभंग उद्वलींमध्ये तेल सापडते. हे तेलक्षेत्र भारतातील सर्वांत जुने आणि जगातील जुन्या तेलक्षेत्रांपैकी एक आहे. १८८९ आसाम रेल्वे व ट्रेडींग कंपनी यांनी प्रथम येथे तेल विहिरी खोदल्या. १८९९ मध्ये आसाम तेल कंपनीने हे तेलक्षेत्र आपल्या ताब्यात घेऊन याच ठिकाणी तेलशुद्धीकरणाचा एक मोठा कारखाना उभारला. १९७४ पर्यंत आसाम तेल कंपनीच्या १,००१ तेल विहिरी होत्या. त्यांपैकी ३६९ विहीरींतून वर्षाला ८३ हजार मे. टन अशुद्ध तेलाचे उत्पादन होते, तर येथील तेलशुद्धीकारखान्यात ५·३ लक्ष टन अशुद्ध तेलावर प्रक्रिया होते. पेट्रोल, ग्रीज, घासलेट, डीझेल, वंगणे, मेण, गंधकाम्ल (तेजाब) यांचे येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.
कांबळे, य. रा.