दामोदर पंडित : (तेरावे आणि चौदावे शतक). महानुभाव मराठी कवी आणि विद्वान. त्याचे जन्मग्राम कोणते ह्याविषयी काही माहिती मिळत नाही. हिराइसा किंवा हिरांबा हे त्याच्या पत्नीचे नाव महानुभाव पंथीय नागदेवाचार्यांच्या सहवासात हे दांपत्य आले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि विचारांनी प्रभावित होऊन ह्या दांपत्याने महानुभाव पंथाचा उपदेश घेतला. त्यानंतर काही काळ उपदेशी वासनिक म्हणून ती दोघे संसारात होती. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्येही होती, असे दिसते. मुलीच्या निधनानंतर हिराइसेने संन्यास घेतला. मुलाचा विवाह केल्यानंतर आपण संन्यास घेऊ असे दामोदर पंडिताने हिराइसेस सांगितले होते. तथापि तो विवाह झाल्यानंतरसुद्धा दामोदर पंडित संन्यास घेईना, तेव्हा हिराइसेने ‘जीय चुलीची खीर खादली तिये चुलीची काइ राख खाल ? असा निरोप त्यांना पाठविला. हा निरोप आला त्याच दिवशी दामोदर पंडिताने संन्यास घेतला. नागदेवाचार्यांच्या सान्निध्यात ह्या दांपत्याचा काळ गेला.

दामोदर पंडित हा मोठा विद्वान. संस्कृत भाषेचे त्याला चांगले ज्ञान होते. गायनकलाही त्याला उत्तम प्रकारे अवगत होती. पंथात त्याची योग्यताही मोठी. दामोदरपंडित आणि ⇨केशवराज सूरि (केसोबास) ह्यांना नागदेवाचार्य स्वतःचे डोळे समजत, असा उल्लेख स्मृतिस्थळात आलेला आहे. दामोदरपंडिताचा उल्लेख फक्त  ‘पंडित’ असाच पंथीयांत होई.

महानुभावांच्या ⇨ साती ग्रंथांत समाविष्ट असलेला वछाहरण हाग्रंथ दामोदर पंडिताचाच. या काव्यातील अंतिम ओवीखेरीज अन्यत्र ग्रंथकर्ता म्हणून ‘म्हणे मुनि केशिराजु’ असा उल्लेख आढळतो. तथापि ग्रंथकर्ता दामोदर पंडितच, हे निःसंशय. मद्य पिऊन तर्र झालेल्या एका रजपुताने आपल्या तलवारीचा वार दामोदर पंडितावर केला. तो वार केसोबासाने आपल्या अंगावर झेलला. त्यामुळे केसोबास मृत्यू पावले. या आपल्या गुरुबंधूच्या उपकाराचे प्रतीक म्हणून दामोदर पंडिताने वछाहरणात केसोबासचे नाव घातले, अशी आख्यायिका आहे. ह्या ग्रंथाची रचना इ. स. १३११ ते १३१६च्या दरम्यान कधीतरी झाली असावी. एकूण ५०३ ओव्यांचे हे काव्य भागवताच्या दशम स्कंधात (अध्याय १२ ते १४) आलेल्या वत्सहरणाच्या प्रसंगावर आधारलेले आहे. भागवतातील मूळ कथेच्या आराखड्यातही त्याने फारसा बदल केलेला नाही. तथापि दामोदर पंडिताने ह्या कथेचा अनुवाद वा रूपांतर केलेले नसून एक स्वतंत्र काव्यच तीतून उभे केले आहे. त्यासाठी आवश्यक तेथे संक्षेप–विस्तार करण्याचे कलात्मक भान त्याने ठेवले. मुळात नसलेली वृंदावनवर्णन आणि यमुनावर्णन ह्यांसारखी प्रकरणे निर्माण करून त्याने आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा यथातथ्य चित्र साकार करण्याचे सामर्थ्य दामोदर पंडिताच्या ह्या काव्यातून अनुभवास येते. आपले हे काव्य ‘सकलै लोकां’ साठी नसून ‘संता’ साठी आहे, श्रीकृष्णगुणवर्णन हा त्याचा हेतू आहे, हे त्याने स्पष्ट केले आहे. वछाहरण हे काव्य डॉ. वि. भि. कोलते ह्यांनी आपल्या विवेचक प्रस्तावना–टीपांसह संपादिले आहे (१९५३).

वछारणाच्या खालोखाल त्याने विविध रागांत लिहिलेल्या ६० चौपद्या महत्त्वाच्या आहेत. ह्या चौपद्यांपैकी काही मराठीमिश्रित हिंदीत आहेत. महानुभाव पंथात ह्या चौपद्यांना एके काळी मोठी मान्यता असली पाहिजे, असे त्यांवर लिहिल्या गेलेल्या काही टीकांवरून जाणवते.

ह्यांखेरीज ‘धुवा’ ह्या प्रकारातील काही रचना (‘धुवा’ म्हणजे ‘धावा’. परमेश्वराच्या किंवा श्रेष्ठ व्यक्तीच्या गुणवर्णनपर किंवा प्रार्थनापर रचनेला ‘धुवा’ असे म्हणतात.) ‘प्रातः सुप्तोत्थितः’ हे संस्कृत स्तोत्र, रूद्धपूरच्या लीळांचे स्तोत्र, नामावली स्तोत्र अशी काही स्फुट रचना त्याने केली होती.

सुर्वे, भा. ग.