दक्षिण येमेन : (जम्हूरिजा–अल्‌–यमन–अल्‌–दिमुक्रतिया–अल्‌–शअबिजा). अरबस्तान द्वीपकल्पाच्या द. किनारपट्टीवर एडन व त्याभोवतीचा प. एडन संरक्षित प्रदेश आणि पूर्व एडन संरक्षित प्रदेश मिळून ३० नोव्हेंबर १९६७ रोजी निर्माण केलेला देश. हा देश १२° उ. ते १९° उ. व ४२° पू. ते ५४° पू. यांदरम्यान असून क्षेत्रफळ २,८८,००० चौ.किमी. व लोकसंख्या १६,३३,००० (१९७४ अंदाज) आहे. अरबी समुद्रातील सोकोत्रा, तांबड्या समुद्रातील पेरिम व कामारान या बेटांवरही या देशाचा हक्क आहे. याच्या वायव्येस येमेन,उत्तरेस सौदी अरेबिया, पूर्वेस ओमान हे देश आणि दक्षिणेस एडनचे आखात आहे. देशाची एडन ही अनधिकृत व मेडिनेत अल् शाब ही प्रशासकीय राजधानी आहे.

भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या देशाचे चार भाग पडतात : (१) पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेश–हे पर्वत येमेनमधील उंच पर्वतांचेच भाग असून त्यात पठारे व जास्तीत जास्त २,४३२ मी. उंचीची शिखरे आहेत. (२) दक्षिणेकडील मैदानी किनारपट्टी–ही किनारपट्टी तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यापासून एडनच्या आखातावरील रास धारबैत ॲली भूशिरापर्यंत पसरली असून शेतीयोग्य आहे. (३) उत्तरेकडील वाळवंटी प्रदेश–हा प्रदेश सौदी अरेबियाच्या रब–अल्–खली या प्रसिद्ध वाळवंटाचाच भाग असून त्याची स. स. पासून सरासरी उंची ७६२ मी. आहे. (४) पूर्वेकडील जोल पठाराचा प्रदेश–हे पठार ९१४ ते १,२१९ मी. उंच असून लांब व सुपीक दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. देशातील नद्यांचे प्रवाह आखुड व आंतरिक असून फक्त वाडी हाजर हा प्रवाह सर्वांत लांब, बारमाही वाहणारा आहे. वाडी मसीलाह या प्रवाहाचा काही भागच बारमाही वाहणारा आहे. वाडी हड्रामाउत ही पठारावरील सर्वांत लांब व सुपीक खोरे असलेली नदी आहे. हा प्रदेश सर्वसामान्यपणे अग्निजन्य खडक, चुनखडीचा खडक व वाळूचा खडक यांनी बनलेला आहे.

हवामान : पश्चिमेकडील पर्वतमय प्रदेश व पठारी प्रदेश वगळता देशात सर्वत्र उष्ण व विषम हवामान आहे. हिवाळ्यात पर्वतीय भागात गोठण बिंदूपर्यंत तपमान खाली येते. नैर्ऋत्य मोसमी हवामानाच्या काळात तपमान कधीकधी ३८° से. पेक्षा जास्त असते, त्यावेळी हवेत आर्द्रतेचे प्रमाण सु. ८०% असून धुलिकण असलेला सोसाट्याचा वारा वाहतो. किनारी प्रदेशात पाऊस विशेषतः हिवाळ्यात पडतो, तर अंतर्गत डोंगराळ प्रदेशात पाऊस मुख्यतः उन्हाळ्यात पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात ३० सेंमी. आणि पूर्वेकडील पठारी प्रदेशात सु. २० सेंमी. असते.

वनस्पती व प्राणी : द. येमेनमध्ये विविध प्रकारची वनस्पती आढळते. किनारपट्टी व डोंगरपायथ्याशी माडाची झाडे विपुल असून कोरफड व निवडुंग बऱ्याच प्रमाणात वाढतात. कॅक्टेसीसदृश असणारे पुष्कळ प्रकारांचे निवडुंग येथे आहेत. डूम ताड, बोर, झाऊ, बाभळ, खजूर ही मोठ्या वृक्षांपैकी असून मुख्यतः पूर्वेकडील पठार व वाडी हड्रामाउत खोऱ्यात वाढतात. इतरत्र ऊद, कण्हेर, लाजाळू, निवडुंग, काटेरी झुडुपे, काही विरळ गवत व हिराबोळ ह्या वनस्पती मुख्य आहेत. सोकोत्रा बेटावर कोरफड, ताड, पाइन, डाळिंब, काकडी इ. वनस्पती मुख्य असून दगडफूल व शेवाळेही आहे.

वन्य प्राण्यांमध्ये रान बकरा (आयबेक्स) व आफ्रिकन काळवीट हे दोन प्राणी अतिशय महत्त्वाचे आहेत. सोकोत्रा बेटावर कस्तुरी मांजर आढळते. द. किनाऱ्यावर सार्डिन व शार्क मासे विपुल प्रमाणावर सापडतात. सरडे व घोरपडीसारखे काही सरपटणारे प्राणीही आढळतात. कुत्रा, मांजर, शेळ्या–मेंढ्या, गाढव, घोडा व उंट हे पाळीव पशू आणि गरुड, माळढोक, ससाणा, हुप्पी (सुतार पक्ष्यासारखा), चंडोल, कबूतर, तित्तिर इ. पक्षी सर्वत्र आढळतात.


इतिहास व राज्यव्यवस्था : येथे मानवी वस्ती प्राचीन काळापासून आहे. वाडी हड्रामाउत खोऱ्यातील लोकांचा आग्नेय आशियाशी व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे. त्याकाळी अनेक छोटी राज्ये उदयास आली होती त्यात सबियन, मिनियन, हिम्यराईट इ. महत्त्वाची होती. शिवाय गाट्‌टूम या गावात तत्कालीन प्रेक्षणीय अवशेष आजही पहावयास मिळतात. सातव्या शतकात इस्लामचे आगमन झाले व बराच काळ या प्रदेशावर येमेनच्या इमामाची नामधारी सत्ता होती. १८३४ मध्ये ब्रिटिशांनी एडन जिंकले. १८६९ साली सुएझ कालवा सुरू होताच एडनची भरभराट झाली. १९६० मध्ये एडन जगातील चवथ्या क्रमांकाचे बंदर होते. पहिल्या महायुद्धानंतर या भागात राजकीय हालचाली सुरू झाल्या. तुर्कस्तानचे ऑटोमन साम्राज्य लयास गेल्यानंतर येमेन स्वतंत्र झाला व त्यापासून एडनला धोका उत्पन्न होणार, हे पाहताच ब्रिटनने पूर्वेस व पश्चिमेस संरक्षित प्रदेश निर्माण केले व स्थानिक छोटी राज्ये एकत्र आणली. १९५० मध्ये ब्रिटनने त्यांचे एक राज्य बनवण्याचा प्रस्ताव मांडला. सुरुवातीस पूर्व व पश्चिम संरक्षित प्रदेशातील राज्ये साशंक असल्याने त्यांनी हा प्रस्ताव मानला नाही पण जेव्हा येमेनने ईजिप्तशी हातमिळवणी केली तेव्हा ही राज्ये एकत्र येण्यास तयार झाली. अशा राज्यांत सामील होण्यास एडनवासियांचा विरोध होता पण तो न जुमानता ब्रिटिशांनी १९६३ मध्ये एडनचे त्या राज्यात सामिलीकरण केले. १९६३ ते १९६७ पर्यंतचा काळ अशांततेचा होता. नॅशनल लिबरेशन फ्रंट व फ्रंट फॉर लिबरेशन ऑफ साउथ येमेन हा दुसरा पक्ष ब्रिटिशांशी स्वातंत्र्यासाठी व आपसात राजसत्तेसाठी संघर्ष करीत होते. त्यांत नॅशनल लिबरेशन फ्रंट हा पक्ष विजयी होऊन ३० नोव्हेंबर १९६७ रोजी द. येमेन स्वतंत्र झाला. आजचे नाव १९६९ मध्ये स्वीकारण्यात आले. आज देशात एकपक्षीय सत्ता असून नॅशनल लिबरेशन फ्रंट हा एकमेव पक्ष वैध आहे. अध्यक्ष हा देशाचा कारभार पहात असून तोच सैन्यदलांचा प्रमुख आहे. १९७१ मध्ये नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या आदेशानुसार देशामधील पहिली पीपल्स सुप्रीम असेंब्ली स्थापन करण्यात आली. कायमस्वरूपी परिषद निवडून येईपर्यंत सध्या १०१ सदस्यांची हंगामी सर्वोच्च जनता परिषद हीच वैधानिक कारभार पहात आहे. प्रशासनाच्या दृष्टीने देशाचे सात गव्हर्नरशासित विभाग करण्यात आले आहेत. सलीम रूबायी अली हे राष्ट्राध्यक्ष व अली नाझेर मुहंमद हसानी हे पंतप्रधान आहेत (जानेवारी १९७६).

संरक्षण : १९७६ मध्ये एकूण सेनाबल १८,००० असून त्यांपैकी १५,२०० भूसेनेत, ३०० नौसेनेत व २,५०० वायुसेनेत होते. १९७० पासून सोव्हिएट रशिया व चीन यांच्या साहाय्याने सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. १९७२ मधील संरक्षण खर्च १ कोटी दिनार होता.

आर्थिक स्थिती : शेती हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया असून बव्हंशी निर्वाह शेती आहे. देशात शेतीखाली सु. २,५२,११९ हे. जमीन असून मुख्यतः वाडी किनारे व वाडी त्रिभुज प्रदेश, मरूद्याने आणि डोंगरउतारांवर शेती केली जाते. ज्वारी, बाजरी, गहू, तीळ ही प्रमुख पिके असून लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन हे प्रमुख नगदी पीक आहे. १९७४ साली पुढीलप्रमाणे उत्पादन झाले (मे.टनात) : ज्वारी–बाजरी ७६,००० गहू १५,००० बार्ली ४,००० तीळ ३,९०० शणवस्त्राचा कापूस (कॉटन लिंट) ५,००० सरकी १५,०००. ज्वारी–बाजरी व तिळाचे तेल हे प्रामुख्याने देशात वापरण्यात येते. देशात भिन्नभिन्न प्रकारचे हवामान आढळून येत असल्याने देशात वर्षभर बहुविध फलोत्पादन होत असते. पीच, आलुबुखार, जरदाळू, केळी, पॉपॉ, लिंबू जातीची फळे, कलिंगडे, द्राक्षे आणि खजूर ही महत्त्वाची फळे होत. खजूर हे मुख्य फळपीक असून त्याखाली ६,०७० हे. क्षेत्र आहे. १९७२ मध्ये खजुराचे ८,००० मे.टन उत्पादन झाले. १९७३–७४ मध्ये पशुधन खालीलप्रमाणे होते : गुरेढोरे ९९,००० मेंढ्या २·३० लक्ष बकऱ्या ९·१५ लक्ष गाढवे ३०,००० उंट ४०,०००. निकृष्ट दर्जाची व अपुरी चराऊ जमीन असल्याने साहजिकच पशुपालन व संवर्धन उद्योगाच्या विकासाला मर्यादा पडते. गेल्या काही वर्षात गुरांच्या जाती सुधारणे तसेच कुक्कुटपालन व संवर्धन यांचे मार्गदर्शी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची अशी वनसंपत्ती देशांत नाही. १९७४ मध्ये देशात खालीलप्रमाणे पशुजन्य पदार्थांचे उत्पादन झाले (हजार मे. टनांत) : मांस ११ गाईचे दूध ६ मेंढीचे दूध ७ शेळीचे दूध २७ कोंबड्यांची अंडी १,४१८.

मत्स्योद्योग : सार्डिन, शार्क, अँकोव्ही, किंगफिश व ट्यूना हे माशांचे प्रमुख प्रकार सापडतात. अल्‌ मुकल्ला हे सर्वात मोठे मत्स्यक्षेत्र आहे. प्रतिवर्षी सु. ४६,००० मे. टन मत्स्योत्पादन होते. यांपैकी बरेच उत्पादन खारवून वा वाळवून श्रीलंका किंवा पूर्व आफ्रिकेला निर्यात केले जाते. सार्डिनांपासून तेल काढतात. सोकोत्रा बेटाच्या किनाऱ्यांवर शार्क, ट्यूना, किंगफिश सापडतात. मत्स्योद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेमधील जलद विकास पावणारा उद्योग असून त्यामध्ये सु. १२ हजार लोक गुंतले आहेत. १९७३ मध्ये सागरी माशांचे उत्पादन १,२६,८०० मे. टन व इतर जलचर उत्पादन ६,७०० मे. टन झाले.

खनिजसंपत्ती : देशात लिग्नाइट, तांबे, हेमॅटाइट, मँगॅनीज, लोह, सोने, पोटॅशियम व बॉक्साइट या खनिजांचे साठे असल्याचे ज्ञात आहे. सैंधवाचे उत्पादन १९७२ मध्ये ७५,००० मे. टन झाले. परकी स्पर्धा व उच्च उत्पादनखर्च यांमुळे मिठागरांचा उद्योग उत्पादनदृष्ट्या घसरला आहे.


उद्योग : लिटल एडन येथे १९५४ साली उभारण्यात आलेला तेलशुद्धीकरण कारखाना हाच काय तो देशातील महत्त्वाचा उद्योग होय. त्यामध्ये २,००० कामगार असून उत्पादनक्षमता ८० लक्ष टन अशुद्ध तेल एवढी आहे. सु. ६० टक्के उत्पादन निर्यात केले जाते. येथे पेट्रोरसायनोद्योग नाहीत. छोट्या उद्योगांमध्ये मद्यार्कविरहित पेयांचे उत्पादन (सॉफ्ट ड्रिंक्स), जहाजे व बोटी बांधणे, कातडी कमावणे, कापड रंगविणे, विटा बनविणे, सिमेंट ठोकळे तयार करणे, ॲल्युमिनियमची भांडी, फर्निचर, ट्यूना मासे डबाबंद करणे इ. उद्योग येतात. ॲब्यॅन व लाहज येथे वटणगिरण्या तसेच तीळतेल गिरण्या आहेत. काही हस्तोद्योगही आहेत. नोव्हेंबर १९६९ मध्ये ब्रिटिश पेट्रोलियम तेलशुद्धी कारखाना वगळून, इतर सर्व परदेशी उद्योगधंद्यांचे व व्यवसायांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ‘जनरल कॉन्फेडरेशन ऑफ वर्कर्स ऑफ द पीपल्स डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ येमेन’ ही प्रमुख कामगार संघटना असून ती ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ आणि ‘इंटरनॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ या दोन जागतिक कामगारसंघटनांशी संबद्ध आहे. हिचे ३५,००० कामगार सदस्य आहेत.

व्यापार : सुएझ कालवा काही वर्षे बंद राहिल्यामुळे (१९६७–७५) एडन या बंदराचे व्यापार व निर्यातव्यापाराची उतारपेठ म्हणून स्वातंत्र्यापूर्वी असलेले महत्त्व पुष्कळच कमी झाले होते. परंतु जून १९७५ पासून सुएझ कालवा वाहतुकीस पुन्हा खुला झाल्यामुळे एडनचे व्यापारी महत्त्व वाढू लागल्याचे दिसते. आयात व्यापारात अन्नपदार्थ, मांसाकरिता पशुधन, कापड, पेये व तंबाखू, बांधकाम–सामग्री, यंत्रे व हत्यारे, वाहतुकीची वाहने, गृहोपयोगी उपकरणे व साधने ह्यांचा समावेश होतो निर्यात व्यापारात पेट्रोलियम पदार्थ, कापूस, मासे, कातडी व चामड्याच्या वस्तू, मीठ व तंबाखू यांचा अंतर्भाव होतो, तर पुनर्निर्यातीत कॉफी, सुती कापडाचे तागे, बांधकाम साहित्य, यंत्रे व उपकरणे येतात. १९७३ मधील आयात व निर्यात अनुक्रमे ५९८ लक्ष दिनार व ४२४ लक्ष दिनार झाली.

अर्थकारण : देशामध्ये येमेनी दिनार हे अधिकृत चलन असून एका दिनाराचे १,००० फिल होतात. १, २ १/२, ५, २५, व ५० फिलची नाणी २५० व ५०० फिलच्या तसेच १,५ व १० दिनारांच्या नोटा प्रचारात आहेत. डिसेंबर १९७५ मध्ये विदेश विनिमय दर १०० येमेनी दिनार = १४३·२६ पौंड = २८९·५२ अमेरिकी डॉलर असा होता. बँक ऑफ येमेन ही देशाची मध्यवर्ती बँक असून नॅशनल बँक ऑफ येमेन ही प्रमुख व्यापारी बँक आहे. सर्व परदेशी बँकांचे तसेच विमाव्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाले आहे. देशात शेअर बाजार नाही. १९७४–७५ च्या अर्थसंकल्पानुसार महसूल व खर्च यांचे आकडे अनुक्रमे १४५ लक्ष दिनार व २६० लक्ष दिनार होते. देशाच्या १९७४–७५ ते १९७८–७९ ह्या पंचवार्षिक योजनेचा खर्च ७५० लक्ष दिनार एवढा आहे.

वाहतूक व संदेशवहन : देशात लोहमार्ग नाहीत. देशात सु. ४,१८४ किमी. लांबीचे कच्चे रस्ते असून त्यांवरून मोटर व प्राणी यांच्या द्वारा वाहतूक केली जाते. बहुतेक वाहतूक ही उंट व गाढवे यांच्या द्वाराच होते. ‘येमेन लँड ट्रॅन्सपोर्ट कंपनी’  ह्या शासकीय वाहतूक संस्थेची स्थापना करण्याची योजना आहे. तीमध्ये सध्याची ‘एडन बस कंपनी’ संमीलित करण्यात येणार आहे. १९७२ साली देशात नोंदणीकृत एकूण १९,३७३ वाहने होती. अनुकूल भौगोलिक स्थान व उत्कृष्ट बंदरसुविधा यांमुळे एडन बंदर हे पूर्वीपासून तेल, कोळसा घेणाऱ्या जहाजांच्या दृष्टीने जगातील उत्कृष्ट बंदरांपैकी एक समजले जाते. साधारणतः प्रतिमासी ५५० बोटींची या बंदरात ये–जा होत असते. १९६९ मधील परकीय जहाज वाहतूक कंपन्यांच्या राष्ट्रीयीकरणानंतर पाच परदेशी जहाज कंपन्यांनी ‘नॅशनल शिपिंग कंपनी’ नावाची वाहतूक कंपनी उभारली आहे. ‘पोर्ट ऑफ एडन ऑथॉरिटी’  या शासकीय संस्थेद्वारा एडन बंदराचा कारभार पाहिला जातो. सुएझ कालवा वाहतूक जून १९७५ पासून पुन्हा खुली झाल्यानंतर पोर्ट ऑफ एडन ऑथॉरिटीने ३०७ लक्ष अमेरिकी डॉलर खर्चाची एडन बंदराचा सर्वागीण विकास करण्याची एक योजना आखली आहे. एडन हे देशाचे एकमेव व सर्वोत्कृष्ट बंदर आहे. ‘डेमॉक्रॅटिक येमेन एअर लाइन्स कंपनी’  हा १९७१ मध्ये स्थापन झालेला सरकारी मालकीचा हवाईवाहतूक निगम हवाईवाहतूक करीत आहे. खोर्माकसार येथे एडनचा मुलकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असून तो एडनपासून ११ किमी. दूर आहे. नऊ परदेशी विमानकंपन्या एडनशी नियमित हवाईवाहतूक करतात. एडन हे संदेशवहनाचे प्रमुख केंद्र असून तेथे सार्वजनिक दूरध्वनी, तारायंत्रव्यवस्था व रेडिओ–दूरध्वनी व टेलेक्सपद्धती यांच्या सुविधा आहेत. देशात सु. दीड लक्ष रेडिओ व २५,००० दूरचित्रवाणीसंच असून ९,८७६ दूरध्वनी यंत्रे होती (१९७३).


लोक व समाजजीवन : १९७४ च्या अंदाजानुसार देशाची एकूण लोकसंख्या १६,३३,००० असून ९०% लोक सूफी पंथीय सुन्नी मुस्लिम आहेत. इतरांमध्ये भारतीय, इथिओपियन, मलेशियन व यूरोपीय आहेत. इस्लाम हा प्रमुख धर्म असून इतर धर्मीयांमध्ये हिंदू, ख्रिस्ती, ज्यू हे धर्म आहेत. देशाच्या पश्चिम भागात यफाई, जाऊदी व औलाकी ह्या प्रमुख टोळ्या असून, पूर्व भागात अल्–वाहिदी, सेबान,अल–हुमूम, बानी यामानी, अल्–जाबीर, अल्–काथीरी या टोळ्या तसेच नहद, सायार, अवामिर, मानाहील या भटक्या टोळ्या आहेत. बिगर जमाती समूहांमध्येही सैय्यद (प्रतिष्ठित वर्ग), शेख (धर्मोपदेशक वर्ग) आणि मांक्काद (न्याय प्रदानक वर्ग) हे वर्ग आढळतात. स्वातंत्र्यपूर्व काळी व स्वातंत्र्योत्तर काळातही देशात मुस्लिम कायदा (शरियत) व स्थानिक देशविधी (कॉमन लॉ–उर्फी) प्रचलित आहेत. न्यायाचे प्रशासन सर्वोच्च न्यायालय व दंडाधिकारी न्यायालये यांद्वारा केले जाते.

सांस्कृतिक दृष्ट्या दक्षिण येमेन हा अरब–इस्लामी संस्कृतीचा एक भाग असून, त्याने कित्येक वर्षे या संस्कृतीमध्ये मोलाची भर घातली आहे. एडनमध्ये दोन व अल्–मुकल्ला येथे एक अशी तीन प्राचीन वस्तुसंग्रहालये आहेत. अरबी ही देशाची प्रमुख शासकीय भाषा असून तीच बहुतेक सर्व लोकांची मातृभाषा आहे. काही बोलीभाषाही आहेत. देशामध्ये प्राथमिक शिक्षण सर्वांना मोफत असून माध्यमिक शिक्षण मात्र नागरी भागांपुरते मर्यादित आहे. एडन व अल्–मुकल्ला येथे माध्यामिक शिक्षणाच्या सोयी आहेत. एडनमध्ये मुलींच्या शिक्षणाने चांगली प्रगती केली असून इतरत्रही ते विकासाच्या मार्गावर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्थांद्वारे शिक्षक–प्रशिक्षण महाविद्यालय, उच्च प्रशिक्षण महाविद्यालय आणि विद्यापीठ स्थापण्याचे प्रयत्न चालू आहेत. १९७२–७३ मध्ये देशात प्राथमिक शाळा ९६०, माध्यमिक शाळा ७७, उच्च माध्यमिक शाळा १९, पुरुषांची प्रशिक्षण महाविद्यालये दोन व महिलांचे प्रशिक्षण महाविद्यालय एक, तांत्रिक संस्था एक असून १९७५ मध्ये एडन येथे एडन विद्यापीठ स्थापन झाले. १९७२–७३ मधील सर्व प्रकारचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाखाच्या घरात होती. १९७४ च्या अखेरीस शिक्षण फी रद्द करण्यात आली.

देशामध्ये कुशल वैद्य आणि प्रशिक्षित परिचारिका यांची तीव्र टंचाई असल्यामुळे सार्वजनिक आरोग्याची प्रगती कुंठित झाली आहे. दारिद्र्य व कुपोषण यांचा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर फैलाव आहे. देशात मलेरिया, क्षय, देवी, आमांश, आंत्रशोथ, यकृतविकार, डांग्या खोकला व गोवर हे सर्वसाधारण रोग आहेत. क्वात ह्या अंमली पदार्थाच्या सेवनाचे फार मोठे प्रमाण आहे. देशात एक प्रमुख रुग्णालय, इतर १६ रुग्णालये, अनेक चिकित्सालये, वैद्यकीय विभाग व दवाखाने असून खाटांची एकूण संख्या सु. १,३०० आहे. बर्मा पेट्रोलियम कंपनी आणि मिशन संस्था ह्यांच्याकडून आरोग्यसेवा पुरविल्या जातात. अद्याप देशात व्यापक अशी सामाजिक विमापद्धती प्रचलित झालेली नाही. आजारी, अपंग, विधवा आणि अनाथ यांना साहाय्य करण्याची पूर्वापार परंपरा आजही प्रचलित आहे. फक्त एडनमध्येच बेकारी, सेवानिवृत्ती, विमा व समाजकल्याण या बाबींसंबंधीचे कार्यक्रम विकसित झाले आहेत.

एडनमध्ये आधुनिक गृहरचना दिसते, तर इतर भागांत पारंपरिक पद्धतीचीच घरे आहेत. देशात चार अरबी भाषेतील दैनिके, पाच साप्ताहिके (इंग्रजी व अरबी) आणि दोन मासिके आहेत. एडनमधील मिस्वात ग्रंथालय हे सर्वांत मोठे असून त्याच ग्रंथालयाने दहा हजार ग्रंथांचे फिरते वाचनालय सुरू केले आहे. दक्षिण येमेनच्या स्वातंत्र्यपूर्व काळात एडन हे खुल्या व्यापाराचे बंदर असल्याने पर्यटकांचे आकर्षणकेंद्र झाले होते. देशात एडनव्यतिरिक्त अन्य पर्यटन केंद्र नाही.

कांबळे, य. रा. गद्रे, वि. रा. डिसूझा, आ. रे.



अस्फाल्टची वाहतूक, डांबर सरोवरपरिसर, त्रिनिदाद

ऊसतोडणी व पार्श्वभागी खत कारखाना, साव्होनेत्ता, त्रिनिदाद

आनंदोत्सवातील झगमगते नृत्यप्रदर्शन, त्रिनिदाद

पर्जन्यसंचयन कालवा, एडन, द. येमेन

बंदरमार्गावरील तेलटाक्या, एडन

पोर्ट ऑफ स्पेनजवळील हिंदू मंदिर, त्रिनिदाद.

तेलशुद्धीकरण कारखाना, प्वँतातीअर, त्रिनिदाद.

बेदुइन कुमारांची सैनिकी कवायत, द. यमेन.

एडन बंदराचे दृश्य

मोहरमच्या मिरवणुकीचे दृश्य, त्रिनिदाद.