दहशतवाद : दहशतवाद हा खऱ्या अर्थाने ‘वाद’ म्हणजे तत्त्वप्रणाली नाही पण एका विशिष्ट तत्त्वप्रणालीतील एका पंथाने पुरस्कारिलेली आचारप्रणाली, असे त्याचे वर्णन करता येईल. तात्त्विक दृष्टीने ⇨  अराज्यवादाच्या एका शाखेचा तो कृतिरूप आविष्कार होय.

कोणत्याही प्रकारचा कायदा आणि शासन यांपासून मुक्त असलेली समाजव्यवस्था अराज्यवादाचे ध्येय आहे. कायदा आणि शासन हे आक्रमक असून सर्व प्रकारच्या सामाजिक दुष्परिणामांचे मूळ त्यात असते, अशी अराज्यवाद्यांची धारणा आहे. समाजात व्यवस्था असावी पण ती केवळ व्यक्तींनी स्वेच्छेने केलेल्या सहकारातून निर्माण झालेली असावी असे प्रतिपादन करणारा अराज्यवाद हा व्यक्तिवादाचा परमोत्कर्ष आहे. अराज्यवादाच्या म्यिखएल बकून्यिन या रशियन भाष्यकाराने प्रथम ‘कृतीने प्रचार’ हे सूत्र मांडले. भीती आणि दहशत निर्माण होईल अशी कृती करून सामाजिक प्रगती वा राज्यक्रांतीसुद्धा घडवून आणावी, असा त्या सूत्राचा अर्थ होतो. १८०० मध्ये रशियात बकून्यिन या तत्त्वज्ञाप्रमाणे दहशतीच्या मार्गाने क्रांती करू पाहणारे बरेच क्रांतिकारक निर्माण झाले होते.

भारतीय राजकारणात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस हे दहशतवादाचे अथवा सशस्त्र क्रांतिवादाचे राजकारण जन्माला आले. बंगालच्या फाळणीच्या काळात दहशतवादाला अधिक वाव मिळाला. अरविंदांचे बंधू बारिंद्रकुमार घोष व विवेकनंदांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त यांनी १९०५–०६ मध्ये बंगाली तरुणांत या सशस्त्र क्रांतिवादाचा प्रसार केला. याच सुमारास महाराष्ट्रात नासिक येथे वि. दा. सावरकर यांनी ‘अभिनव भारत’ही संस्था काढून तरुणांना सशस्त्र क्रांतिवादाची दीक्षा देण्यास सुरुवात केली. १८९७ मध्ये पुण्यास दामोदर चाफेकर याने कमिशनर रँड याचा खून केला. रशिया व इटली विशेषतः इटलीतील मॅझिनी, गॅरिबॉल्डी वगैरेंच्या उदाहरणांपासून स्फूर्ती घेऊन दहशतवादी तरुणांनी ⇨ गुप्तसंघटना  काढल्या. पहिल्या महायुद्धाच्या वेळी यूरोप–अमेरिकेतही भारतीयांनी अशा क्रांतिकारक संस्था स्थापन केल्या होत्या. लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत हिंदी क्रांतिकारकांचा ‘गदर’पक्ष स्थापन केला. १९११ मध्ये लॉर्ड हार्डिंग यांच्या दिल्ली प्रवेशाच्या मिरवणुकीवर झालेली बॉबफेक, कलकत्त्याचा माणिकतला बाँब कट, चितगाँग शस्त्रागारावरील दरोडा, नासिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा खून, लाहोरमध्ये झालेला साँडर्सचा खून आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी मध्यवर्ती विधिमंडळात फेकलेला बाँब इ. दहशतवादी तरुणांची काही गाजलेली कृत्ये आहेत. त्यांच्यापैकी फासावर गेलेले खुदिराम बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू त्याचप्रमाणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेले चंद्रशेखर आझाद हे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात राष्ट्रवीर म्हणून गौरविले जातात.

वैयक्तिक दहशतवादाच्या हिंसक मार्गांपासून तरुणांना परावृत्त करून त्यांना निःशस्त्र प्रतिकाराच्या सामुदायिक लढ्यात आणण्याचे कार्य महात्मा गांधींनी केले. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन १९२८ च्या पुढे भारतीय राजकारणातून ही प्रवृत्ती जवळजवळ लुप्त झाली.

साक्रीकर, दिनकर