दशमुळी: (हिं. गुलशम लॅ. एरँथीमम रोझियम, डीडॅलॅकँथस रोझियस कुल–ॲकँथेसी). या ओषधीय [⟶ ओषधि] वनस्पतीच्या वंशातील इतर सर्व जाती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ओषधी किंवा क्षुपे (झुडपे) असून आशियातील उष्ण व उपोष्ण प्रदेशांत त्यांचा प्रसार आहे. ए. बायकलर ही जाती बागेत आकर्षक पाने व फुले यांकरिता लावतात हिची फुले पांढरी असून खालच्या पाकळीवर जांभळे ठिपके असतात. दशमुळी सु. २ मी. उंच वाढते व भारताच्या दक्षिण द्वीपकल्पाच्या पश्चिम आणि दक्षिण (कोकण, दख्खन, उत्तर व दक्षिण कारवार इ.) भागांत आढळते. हिची पाने साधी, मोठी, समोरासमोर, दातेरी व आयत–कुंतसम (भाल्यासारखी) असून त्यांच्या बगलेतून आलेल्या किंवा अग्रस्थ (टोकावरच्या) व लांबट कणिशावर प्रथम निळी अगर गुलाबी व नंतर जांभळी किंवा लाल, सच्छद (पानासारखी किंवा खवल्यासारखी फुलाच्या तळाशी असलेली उपांगे असणारी) व तीव्र दर्पाची फुले नोव्हेंबर ते जानेवारीत येतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲकँथेसी कुलात (वासक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. छदे पांढरी, केसाळ व त्यांवर हिरव्या शिरा असतात. पुष्पमुकुट खाली लांब नळीसारखा व वर पसरट असून पाच पाकळ्या असतात केसरदले दोन [⟶ फूल]फळे (बोंडे) लहान, गदेसारखी लांबट (१·३ सेंमी.) व टोकदार असून बिया (३–४ मिमी.) चार व केसाळ असतात. मुळे जाड, मध्ये फुगीर आणि दोन्हीकडे टोकदार असतातती दुधात उकळून स्त्रियांना पांढऱ्या धुपणीवर आणि गुरांना गर्भाची वाढ चांगली होण्यास देतात.
परांडेकर, शं. आ.
“