दलाल व दलाली : व्यापारी देवघेवीत दोन किंवा अधिक व्यक्तींची मध्यस्थी करणाऱ्यास ‘दलाल’ म्हणतात. मध्यस्थी करण्याबद्दल त्याला जो मोबदला मिळतो, त्यास ‘दलाली’ हे नाव आहे. दलाल ज्या वस्तूची, मालाची किंवा मालमत्तेची खरेदी–विक्री करतो, त्याचा मालक वेगळाच असतो. त्या मालकाच्या वतीने व्यवहार करून दलाल बाजारात एक आवश्यक सुविधा पुरवितो.

दलाल बहुतेक सर्व बाजारांत आढळतात. विशेषेकरून शेतमालाची खरेदी–विक्री, आयात व निर्यात व्यापार, सोने, चांदी व परकीय चलन बाजार, वाहतूक व विमा व्यवसाय, रोखेबाजार व निरनिराळे वायदेबाजार यांसारख्या क्षेत्रांत दलाल व्यापारी उलाढाल कार्यक्षमतेने पार पाडण्यास मदत करतात. बाजाराची अद्ययावत माहिती, बाजारभावांतील संभाव्य चढउतारांचे ज्ञान, मालाची उत्कृष्ट पारख, व्यवहार तंत्राचा अभ्यास, व्यापाऱ्याच्या उलाढालींची आणि आर्थिक स्थितीची पुरेपूर माहिती इ. साधनांचा उपयोग करून दलाल आपले कार्य पार पाडतात व त्यासाठी दलाली आकारतात. त्यांचे व व्यापाऱ्‍यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे व परस्परविश्वासावर आधारलेले असतात. दलालाच्या मध्यस्थीमुळे खरेदीदार आणि विक्रेते ह्याचा बराच वेळ व त्रास वाचतो. त्यामुळे होणारा त्यांचा फायदा हा दलालीच्या मानाने कितीतरी अधिक असल्यानेच ते दलालांचा उपयोग करतात.

प्रत्येक बाजाराचे तंत्र व त्यातील उलाढालींवर परिणाम करणारे घटक हे वेगवेगळे असतात म्हणून ह्या धंद्यात विशेषीकरणास अत्यंत महत्त्व आहे. विशिष्ट बाजारातसुद्धा काही दलाल केवळ खरेदीदारांचे दलाल म्हणून काम करतात, तर काही केवळ विक्रेत्यांचे दलाल म्हणून व्यवहार करतात. काही दलाल खरेदी व विक्री असे दोन्ही व्यवहार करतात परंतु अशा वेळी ते क्रेता व विक्रेता या उभयतांचे हित सारखेच सांभाळू शकतील, अशी खात्री देता येणे कठीण आहे. विशेषतः शेतमालाची खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा व्यापाऱ्यांच्या हिताचीच ते अधिक काळजी घेतात, असे अनेक ठिकाणी आढळते.

पहा : अडत्या कृषिउत्पादन विनिमय केंद्रे.

धोंगडे, ए. रा.