द ला मेअर, वॉल्टर: (२५ एप्रिल १८७३–२२ जून १९५६). ब्रिटिश कवी व लेखक. शार्लटन, केंट येथेजन्म.लंडनच्या ‘सेंट पॉल्स स्कूल’ मध्ये शिक्षण घेतल्यानंतर लंडनमध्येच अँग्लो-अमेरिकन ऑइल कंपनीच्या कार्यालयात त्याने नोकरी केली (१८९०–१९०८). कविता, कथा, कादंबरी इ. विविध प्रकारचे लेखन त्याने केलेले असले, तरी मुख्यतः कवी म्हणूनच तो विशेष प्रसिद्ध आहे. साँग्ज ऑफ चाइल्डहूड हा त्याचा पहिला काव्यसंग्रह १९०२ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. बालसुलभ जिज्ञासेने भोवतालच्या जगाचे केलेले निरीक्षण त्याच्या कवितेतून अभिनव कल्पनांच्या द्वारे अवतरते अनुभवांवर उमटणारा अद्भुताचा ठसा न्याहाळण्याची प्रवृत्ती त्यांतून प्रत्ययास येते त्यामुळे जीवनातील काव्यात्म, जादूमय क्षण त्याच्या कवितांतून समर्थपणे साकार झालेले आहेत. स्वप्न व वास्तव यांच्या सीमारेषेवर त्याचे मन वावरताना दिसते. द ला मेअरने लिहिलेली शिशुगीते लहान मुलांना आवडतात हे खरे पण त्यांतील आशयाचे धागे अनेकदा गूढार्थसूचक असल्यामुळे ती सर्वार्थाने शिशुगीते ठरत नाहीत. काही समीक्षकांच्या मते द ला मेअर हा इंग्रजी स्वच्छंदतावाद्यांच्या परंपरेतील अखेरच्या कवींपैकी एक होय. काव्यशैलीच्या संदर्भात नवी दिशा शोधण्याचा फारसा प्रयत्न त्याने केलेला नसला, तरी त्याच्या कवितांत ताजेपणा जाणवतो. त्याच्या गद्यकृतींतूनही त्याच्यातील कवीच प्रकर्षाने व्यक्त झालेला आहे. मेम्वार्स ऑफ अ मिजिट (१९२१) यात उत्कट काव्यात्मकतेची त्याने गाठलेली उंची लक्षणीय आहे. क्रॉसिंग्ज (१९२१) ह्या त्याच्या नाट्यकृतीत पऱ्यांचे जग त्याने उभे केले आहे. द रिड्ल अँड अदर स्टोरीज (१९२३), ऑन द एज (१९३०) हे त्याचे काही उल्लेखनीय कथासंग्रह. लंडन जवळील टि्वकेनहॅम येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. McCrosson, Doris Ross, Walter de la Mare, New York, 1966.
2. Reid, Forrest, Walter de la Mare, London, 1929.
बापट, गं. वि.