दरियासाहब : (सु. १७३४–१७८०). एक हिंदी संतकवी. बिहारचे ते सर्वश्रेष्ठ निर्गुणी संतकवी मानले जातात. त्यांच्या जन्मतिथीसंबंधी मतभेद आहेत. १६३४, १६६४ आणि १६७४ या तीन तिथी त्यांच्या जन्मतिथी म्हणून पुढे आल्या आहेत पण १७३४ मध्ये त्यांचा जन्म झाला असावा. असे धर्मेंद्र ब्रह्मचारी यांनी अनेक पुरांव्यावरून सिद्ध केले आहे. त्यांचा जन्म बिहारमध्ये शाहबाद जिल्हातील धरकंधा नावाच्या गावी झाला. दरियासाहब स्वतःला कबीराचा अवतार समजत. त्यांच्या मतांवर व काव्यावर कबीराचा खूपच प्रभाव दिसून येतो. कबीराशिवाय सूफी व सतनामी संप्रदायांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विसाव्या वर्षी ते विरक्त झाले पण त्यांची पत्नी शाहमती ही नेहमी त्यांच्याजवळ व्रतस्थपणे राहत होती. त्यांच्या अनुयायांत हिंदू व मुसलमान दोन्ही धर्मांचे लोक होते. त्यांच्या संप्रदायात विरक्त साधू व गृहस्थ या दोघांनाही स्थान होते. साधू टोपी वापरत नाहीत, गृहस्थ वापरतात एवढाच फरक.
त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. ते सर्व उपलब्ध नाहीत. उपलब्ध ग्रंथांत अग्रज्ञान, अमरसार, भक्तिहेतु, ब्रह्मचैतन्य, ब्रह्मविवेक, दरियानामा, दरियासागर, ज्ञानदीपक, ज्ञानमूल, ज्ञानरत्न, गणेशगोष्टी, ज्ञानस्वरोदय, कालचरित्र, निर्भयज्ञान, प्रेममूल, मूर्ति उखाड, शब्द या बीजक, सहसरानी, विवेकसागर, यज्ञसमाधि यांचा अंतर्भाव होतो. ब्रह्मचैतन्य हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे, तर दरियानामा फार्सी भाषेत लिहिला आहे. बाकीचे ग्रंथ हिंदीत आहेत. भाषेची अनेक रूपे त्यांच्या ग्रंथांत आढळतात. फार्सी, संस्कृत, भोजपुरी, खडीबोली इ.भाषांनी मिश्रित अशी अवधी भाषा त्यांनी वापरली आहे. भाषेवरचे व्याकरणाचे बंधन त्यांनी फारसे मानले नाही. त्यांनी प्रबंधरचना केली आहे त्याचप्रमाणे स्फुट रचनाही विपुल केली आहे. सु. ४० छंदांचा उपयोग त्यांनी केला असून अलंकारयोजनेवर त्यांचे चांगले प्रभुत्व दिसून येते.
सत्पुरुषाचे स्वरूप, नाममहिमा, सद्गुरू महत्त्व, जीवस्वरूप विवेचन, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, योगवर्णन, भक्ती व प्रेम निरूपण हे त्यांचे विषय असून नामस्मरण व आत्मशुद्धीला त्यांनी खूपच महत्त्व दिले. रामायण व महाभारतातील किंवा पौराणिक कथांचे संतमताप्रमाणे स्पष्टीकरण अथवा भाष्य त्यांनी केले आहे. हिंदी निर्गुण संतपरंपरेतील ते प्रमुख विचारवंत व प्रभावशाली प्रचारक होते.
संदर्भ : ब्रह्मचारी, धर्मेंद्र, संतकवि दरिया–एक अनुशीलन, पाटणा, १९५४.
बांदिवडेकर, चंद्रकांत