दमिल, सेसिल ब्लंट: (१२ ऑगस्ट १८८१–२१ जानेवारी १९५९). अमेरिकन चित्रपटनिर्माता व दिग्दर्शक. ॲशफील्ड येथे जन्म. त्याचे वडील हेन्री चर्चिल दमिल हे नाटककार होते. पेनसिल्व्हेनिया मिलिटरी कॉलेज व अमेरिकन अकॅडेमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या संस्थांमधून सेसील दमिलने शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर १९०० मध्ये नट म्हणून रंगमंचावर प्रवेश केला आणि अनेक नाटकांतून कामे केली. पुढे त्याने आपला बंधू विल्यम चर्चिल याला नाट्यलेखनातही साहाय्य केले. १९०२ मध्ये त्याचा विवाह कॉन्स्टन्स ॲडम्स हिच्याबरोबर झाला. १९१३ मध्ये तो चित्रपटांकडे वळला व द स्क्वॉव्ह मॅन हा पहिला चित्रपट त्याने तयार केला. त्याच्या सुरूवातीच्या चित्रपटांत नाट्यकथानकांना चित्रपटीय तंत्रात नेटकेपणा बसविण्याचा प्रयत्न दिसतो. पहिल्या महायुद्धानंतर त्याने स्वतः दिग्दर्शित केलेली सामाजिक चित्रपटांची मालिकाच निर्माण केली. तथापि बायबलवर आधारित द टेन कमांडमेंट्स (१९२३) व द किंग ऑफ किंग्ज (१९२७) हे त्याचे खरे प्रभावी चित्रपट होत. अशा प्रकारच्या भव्य देखाव्यांनी संपन्न असलेल्या, धार्मिक–ऐतिहासिक चित्रपटनिर्मितीबद्दल दमिलची विशेष प्रसिद्धी आहे. द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ या चित्रपटाला १९५३ साली सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ॲकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेकडून सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला होता. दमिलने इतरही अनेक उद्योग केले. त्याची मर्क्युरी ॲव्हिएशन कंपनी (१९१९) ही तर जगातील पहिलीच व्यापारी विमानवाहतुकीची कंपनी होती. त्याचप्रमाणे लक्स रेडीओ थिएटरही त्याने १९३६ ते १९४५ या काळात चालविले होते. १९४६ मध्ये फौंडेशन फॉर पोलिटिकल फ्रिडम या संस्थेचा तो अध्यक्ष होता. हॉलिवुड येथे त्याचे निधन झाले. त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे (१९५९).
जोशी, चंद्रहास