दमास्कस : सिरियाच्या राजधानीचे शहर. हे अत्यंत पुरातन असून अरबी भाषेत याला एशाम असे म्हणतात. लोकसंख्या ८,३५,००० (१९७० अंदाजे). हे सिरियाच्या नैर्ऋत्य भागात अँटी–लेबानन डोंगराच्या पूर्वेकडील उतारावर बारड नदीकाठी वसले असून स. स. पासून ७०४ मी. उंचीवर आहे. शहराला ‘पूर्वेकडील मोती’ (द पर्ल ऑफ द ईस्ट), ‘अनेक स्तंभांचे शहर’ व ‘मक्केचे प्रवेशद्वार’ असे म्हणतात.
इ. स. पू. ७३३ मध्ये हे शहर ॲसिरियन राज्याला जोडण्यात आले. त्यानंतर ४०० वर्षांनी ह्या शहराचा ताबा अलेक्झांडरकडे गेला. रोमन साम्राज्यात या शहराचा समावेश झाल्यापासून शहराची भरभराट होऊ लागली. इ. स ६३५ मध्ये अरबांनी हे शहर जिंकल्यापासून दमास्कस हे मुसलमानांचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. येथे पूर्वी असलेली ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे उद्ध्वस्त करून मोठ्या मशिदी बांधण्यात आल्या. इ. स. १२६० मध्ये हे शहर मोगलांनी, १५१६ मध्ये तुर्कांनी, तर १९१८ साली इंग्रजांनी काबीज केले. अशा प्रकारे दमास्कस शहर आजपर्यंत रोमन, अरब, मुस्लिम, ग्रीक, इराणी, तुर्की, यहुदी व इंग्रज लोकांनी ताब्यात घेतले होते. १९४१ मध्ये सिरियाचे स्वातंत्र जाहीर करून दमास्कस ही त्याची राजधानी निश्चित करण्यात आली.
ह्या शहराचा आसमंत अत्यंत सुपीक असून उत्कृष्ट प्रतीची फळे व भाजीपाला पिकविला जातो. फळांमध्ये विशेषतः जरदाळूचे उत्पादन महत्त्वाचे आहे. ह्या भागाला आणि शहराला बारड व ॲवॅज नदीचे पाणी पुरविले जाते. तांब्या–पितळेची भांडी व त्यांवरील नक्षीकाम, जवाहीर, फर्निचर, सिमेंट, कापड, तंबाखू, रेशीम, साबण इत्यादींच्या उत्पादनांसाठी दमास्कस प्रख्यात आहे. मध्ययुगीन काळात येथे लढाईची हत्यारे विशेषतः तलवारी तयार होत असत. भिषग, न्याय, औषधी, दंतशास्त्र वगैरे निरनिराळ्या शाखा असलेले नामांकित सिरियन विश्वविद्यालय येथे फार वर्षांपासून स्थापन झाले आहे. येथे एक आकर्षक वस्तुसंग्रहालय तसेच लहान मोठ्या अनेक मशिदी व ख्रिस्ताची प्रार्थनामंदिरेही आहेत. सुएझ कालवा सुरू झाल्यापासून दमास्कस व त्याच्या आजूबाजूच्या खुष्कीच्या मार्गांचे महत्त्व कमी झाले असले, तरी अजूनही वाळवंटातील खुष्कीच्या मार्गाचे तसेच पूर्व–पश्चिम व दक्षिणोत्तर जाणाऱ्या लोहमार्गांचे दमास्कस हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. भूमध्य समुद्रालगतच्या पूर्व किन्याऱ्यावरील सर्व भागांशी व पूर्वेकडे इराकची राजधानी बगदादशी हे शहर लोहमार्ग व सडका यांनी जोडले आहे. शहराच्या पूर्वेस ३० किमी. वर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
लिमये, दि. ह. चौधरी, वसंत
“