थिओरेल (टेओरल), आक्सल हूगो टेऑडॉर : (६ जुलै १९०३–  ). स्वीडिश जीवरसायनशास्त्रज्ञ. १९५५ च्या वैद्यकाच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म लिनकोयपिंग, स्वीडन येथे झाला. १९२१ मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन १९२४ मध्ये त्यांनी पदवी मिळविली. त्यानंतर काही महिने ते पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक होते. विख्यात सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ एल्. सी. ए. कालमेट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सूक्ष्मजंतुशास्त्राचा अभ्यास केला. १९३० मध्ये त्यांनी ‘रक्तरसातील (रक्तातील घन पदार्थविरहीत पिवळसर द्रवातील) लिपिडे’ या विषयावर प्रबंध लिहून स्टॉकहोम विद्यापीठाची एम्. डी. पदवी मिळविली. त्यापूर्वी ई. हॅमरस्टीन यांच्याकडे शिकत असतानाच १९२६ मध्ये त्यांनी रक्तरसातील लिपोप्रथिनांचा शोध लावून त्यांचे वर्णनही केले होते.

मध्यंतरी काही काळ त्यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसाय केला, परंतु पोलिओने आजारी पडल्यामुळे त्यांना अपंगावस्था आली व त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ संशोधन कार्यास वाहून घेण्याचे ठरविले. १९३२ मध्ये मायोग्लाेबिन (स्‍नायूतील हीमोग्‍लोबिन) स्फटिकी स्वरूपात मिळविणारे ते पहिलेच शास्त्रज्ञ ठरले. त्यांनी या पदार्थाच्या वर्णिलेल्या गुणधर्मांत ऑक्सिजन व कार्बन मोनॉक्साइड यांच्या बरोबरच्या विक्रिया, चुंबकीय गुणधर्म आणि रेणुभार यांचा समावेश होता.

इ. स. १९३२–३६ या काळात ते अप्साला विद्यापीठात काम करीत होते व त्याचबरोबर ते बर्लिन–डालेम येथे रॉकफेलर फेलो होते. तेथे ओटो वॉरबर्ग यांच्याबरोबर कार्य करीत असताना ऑक्सिडीकारक [ऑक्सिडीकरणास मदत करणारे पदार्थ ⟶ ऑक्सिडीभवन] एंझाइमांकडे (सजीव कोशिकांमध्ये रासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या पदार्थांकडे) त्यांचे लक्ष ओढले गेले. पुढे तोच विषय त्यांच्या संशोधनाचे क्षेत्र बनला. स्वीडनला परतल्यानंतर ते कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये काम करू लागले. १९३६ मध्ये नव्याने स्थापिलेल्या नोबेल मेडिकल इन्स्टिट्यूटच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे ते प्रमुख झाले.

त्यांनी ‘यलो एंझाइम’ हे त्या गटातील ज्ञात झालेले पहिले एंझाइम १९३३ मध्येच घरगुती उपकरणे वापरून अलग करण्यात यस मिळविले. त्यानंतरच्या संशोधन कार्यात त्यांनी त्यांचे प्रथिन व प्रथिनरहित असे भाग पाडले. प्रत्येक भाग स्वतंत्र वापरल्यास तो पूर्णपणे अक्रिय असल्याचे परंतु पुन्हा त्यांचे मिश्रण केल्यास ते एंझाइम क्रियाशील असल्याचे म्हणजेच जिवंत कोशिकांना ऑक्सिजन वापरण्यास मदत करणारे असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्यावरून हे दोन भाग क्रियाशीलतेकरिता एकमेकांवर अवलंबून असल्याचे सिद्ध झाले. अशाच प्रकारचे प्रयोग त्यांनी इतर ऑक्सिडीकारक एंझाइमांवरही केले. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले.

स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, फ्रान्स, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, भारत इ. देशांतील शास्त्रीय संस्थांचे ते सदस्य आहेत. ते स्वीडिश मेडिकल सोसायटी (१९४७–५८, १९५७–५८), ॲसोसिएशन ऑफ स्वीडिश केमिस्ट्स (१९४७–४९) या संस्थांचे अध्यक्ष होते व इतर अनेक वैद्यकीय संस्थांचे सदस्य आहेत. ते नोबेल कमिटीचे १९५८ पासून सदस्य आहेत. पॅरिस, पेनसिल्व्हेनिया, ब्रुसेल्स इ. विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिलेल्या असून त्यांना सीबा व झेमेलव्हाइस (१९७१) आणि इतर अनेक पदकेही मिळाली आहेत. १९५४ पासून ते नॉर्डिस्क मेडिसिन  या नियतकालिकाचे संपादक आहेत.

भालेराव, य. त्र्यं.