थोर : (हिं. शकर पितन, सुली लॅ. यूफोर्बिया रॉयलियाना कुल–यूफोर्बिएसी). सु. ५ मी. उंचीचे काटेरी शाखायुक्त झुडूप किंवा लहान वृक्ष. याचा प्रसार हिमालयात सु. १,८६० मी. उंचूपर्यंत, सिंधू नदी ते कुमाऊँ या प्रदेशात आहे. उपहिमालयी पट्ट्यात व लगतच्या सखल भागात सामान्यपणे याची कुंपणासाठी लागवड करतात. फांद्या त्रिधारी निवडुंगाप्रमाणे,पण ५–७ कोनी, ५ सेंमी. व्यासाच्या मंडलित व काटेरी असतात. पाने एकाआड एक, बिनदेठाची (१०–१५ सेंमी. लांब), सपाट व चमच्यासारखी, मांसल, जाड व लवकर गळणारी त्यांच्या तळाशी दोन काटे (उपपर्णे) असतात. फुलोरा तीन पुष्पांची वल्लरी छदमंडले (१·५ सेंमी.) पिवळी [⟶ फूल] १·५ सेंमी. व्यासाची बोंडे करडी व त्रिखंडी असून त्यांचे भाग (कुड्या) दबलेले असतात. इतर सामान्य लक्षणे एरंड कुलात [⟶ यूफोर्बिएसी] वर्णिल्याप्रमाणे. ह्या वनस्पतीच्या ताज्या चिकाला खूप गोड वास येतो तो चीक कडू, विरेचक व कृमिनाशक आहे. त्याने कातडीवर फोड येतात व डोळ्यांत गेल्यास इजा होते. दुधी चिकात काउछुक (एक प्रकारचे रबर) १–५·४% आणि पाणी व त्यात विरघळणारे पदार्थ ६४·१–८०·५% असतात. ही वनस्पती मत्स्यविष आहे. अभिवृद्धी (संवर्धन) फांद्यांचे तुकडे लावून करतात.
जमदाडे, ज. वि.