थुलियम : आवर्त सारणीतील [मूलद्रव्यांच्या कोष्टकरूपाने केलेल्या विशिष्ट मांडणीतील ⟶ आवर्त सारणी] ३ ब गटातील ⇨ विरल मृत्तिका समूहातील एक धातुरूप मूलद्रव्य. चिन्ह Tm अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ६९ अणुभार १६८·९३४ वि. गु. ९·३४६ वितळबिंदू सु. १,५४५° से. उकळबिंदू सु. १,८००° से. स्थिर समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेला त्याच मूलद्रव्याचा प्रकार) १६९ अणुभाराचा असून फक्त तोच नैसर्गिक रीत्या आढळतो संयुजा (अणूंची परस्परांशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) ३ विद्युत् विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणूमधील मांडणी) २, ८, १८, १८, १३, ८, २ पृथ्वीच्या कवचातील प्रमाण २ X १०–५ %.
पेअर टिऑडॉर क्लेव्हे यांनी १८७८ मध्ये थुलियमाचा शोध लावला. १९११ मध्ये चार्ल्स जेम्स यांनी शुद्ध स्वरूपातील त्याचे ऑक्साइड तयार केले. १९३३ मध्ये थुलियम धातू शुद्ध स्वरूपात वेगळी करण्यात आली. थूली (Thule म्हणजे अती उत्तरेकडील) या ग्रीक वा लॅटिन शब्दावरून क्लेव्हे यांनी मूलद्रव्याच्या ऑक्साइडाला थुलिया हे नाव दिले व त्यावरूनच मूलद्रव्याला थुलियम हे नाव पडले आहे.
समर्स्काइट, मोनॅझाइट, बॅस्टनासाइट, झेनोटाइम व यूक्झेनाइट या खनिजांत थुलियम अत्यल्प प्रमाणात असते. सर्व विरल मृत्तिकांमध्ये ती सर्वांत अत्यल्प प्रमाणात सापडते.
निर्जल थुलियम फ्ल्युओराइडाचे कॅल्शियमाच्या साहाय्याने उष्णतेने ⇨ क्षपण करून किंवा थुलियम ऑक्साइड व लँथॅनम धातू यांचे निर्वातात ऊर्ध्वपातन (तापवून वाफ करून व मग ती थंड करून पदार्थ वेगळा करण्याची क्रिया) करून थुलियम मिळवितात.
थुलियमाच्या उकळबिंदूला तिचा बाष्पदाब अति–उच्च असतो. –२६३° से. पेक्षा कमी तापमानाला ती लोहचुंबकीय असते [⟶ चुंबकत्व]. हवा व पाणी यांनी तिचे ⇨ ऑक्सिडीभवन होते. पाण्याबरोबर तिची मंद गतीने विक्रिया होते. विरल अम्लात ती विरघळते. थुलियमाची संयुगे फिकट हिरवी असून त्यांच्या विद्रावांना हिरवट छटा येते.
थुलियम (१६९) वर न्यूट्रॉनांचा भडिमार केला असता थुलियम (१७०) हा किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर फेकण्याचा गुणधर्म असणारा) समस्थानिक मिळतो. याचा अर्धायुकाल (किरणोत्सर्गाची कार्यप्रवणता निम्मी होण्यास लागणारा काळ) १२९ दिवसांचा आहे. थुलियम (१७०) मधून ८४ Kev ऊर्जेचे क्ष–किरण उत्सर्जित होतात. यामुळे त्याचा उपयोग सुवाह्य क्ष–किरण यंत्रात करतात. हे यंत्र चालविण्यास विजेची गरज लागत नाही. या यंत्राचा उपयोग यंत्राचे अतिशय कमी जाडीचे भाग तपासणे, पुरातन वस्तूंचे परीक्षण करणे, वैद्यकशास्त्र इत्यादींमध्ये करतात.
संदर्भ: 1. Hampel, C. A. Rare Metals Handbook, London, 1961.
2. Topp, N. E. The Chemistry of the Rare Earth Elements, Amsterdam, 1965.
ठाकूर, अ. ना.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..